झीरो गार्बेजवर रोझलॅंडचा ‘आपले घर’ लघुपट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

पिंपरी - केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवत पिंपरी- चिंचवडमधील रोझलॅंड सोसायटीने ‘आपले घर’ ही संकल्पना राबविली आहे. स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी शर्वरी रानडे आणि अंजली मस्कर यांनी एक लघुपट तयार केला आहे. 

पिंपरी - केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवत पिंपरी- चिंचवडमधील रोझलॅंड सोसायटीने ‘आपले घर’ ही संकल्पना राबविली आहे. स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी शर्वरी रानडे आणि अंजली मस्कर यांनी एक लघुपट तयार केला आहे. 

पुढील वर्षीच्या गांधी जयंतीपर्यंत सोसायटीला झीरो गार्बेज करण्याचा संकल्प रोझलॅंडवासीयांनी केला आहे. सोसायटीने स्वच्छतेचे मानदंड तयार करून ते अमलात आणले आहेत. पिंपरी- चिंचवड महापालिकेने सोसायटीची स्वच्छतेप्रती आत्मीयता पाहून जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त शहरातील कचरा वर्गीकरणाची मोहीम रोझलॅंड सोसायटीमधूनच सुरू केली. सोसायटी आणि सोसायटीबाहेरचा परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी असून प्रत्येकाने त्याचे पालन करायलाच हवे, असे या लघुपटात दाखवण्यात आले आहे. सोसायटीमध्ये कचरा व स्वच्छता मोहिमेबद्दल कोणत्याही काल्पनिकतेचा आधार घेतलेला नाही. सोसायटीने कचऱ्याचे वर्गीकरण करण्यावर भर दिला आहे. ओला, सुका आणि ई-कचरा यांचे कशा प्रकारे वर्गीकरण केले जाते. ओल्या कचऱ्याचे घरीच कंपोस्ट खत बनविण्यात येते. पालापाचोळा किंवा नैसर्गिक सुका कचरा झाडांच्या बुंध्याला टाकून, तसेच खतनिर्मिती करून त्याची योग्य विल्हेवाट लावली जाते. तर, ई-कचरा कमिन्स इंडिया कंपनीला दिला जातो. स्वच्छतेच्या उपक्रमांमुळे सध्या सोसायटीमधून जाणारा कचरा ३०-४० टक्‍क्‍यांनी घटला आहे. पुढील वर्षी २ ऑक्‍टोबर २०१८ पर्यंत सोसायटीमधून कोणत्याही प्रकारचा कचरा बाहेर जाऊ न देता सर्व कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याचा संकल्प सर्वांनी केला आहे.

Web Title: pimpri news documentary Garbage