भटक्‍या कुत्र्यांचा हल्ला; माणमध्ये बालकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

पिंपरी - भटक्‍या कुत्र्यांच्या साहिल भुट्टो अन्सारी (वय ५, रा. मोहिते वस्ती, माण, ता. मुळशी) याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास माण येथे घडली.

पिंपरी - भटक्‍या कुत्र्यांच्या साहिल भुट्टो अन्सारी (वय ५, रा. मोहिते वस्ती, माण, ता. मुळशी) याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास माण येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जनावरांना चारा घालण्यासाठी साहिल वडिलांसोबत गेला होता. वडिलांना न सांगता तो शौचास गेला. त्या वेळी भटक्‍या कुत्र्यांनी साहिलवर हल्ला चढविला. त्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून अन्सारी यांचे शेजारी सोडविण्यासाठी आले. तोपर्यंत कुत्र्यांच्या हल्ल्याने साहिल गंभीर जखमी झाला होता. त्याला खासगी दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर माणमधील सरकारी दवाखान्यात व तेथून पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले.

वेळीच उपचार झाले असते तर...
कुत्र्यांच्या हल्ल्यात साहिल गंभीर जखमी झाला आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. माणमधील दवाखान्यात त्याच्या आईने तेथील 

कर्मचाऱ्यांना डॉक्‍टरांना लवकर बोलवा, असा तगादा लावला. त्या वेळी ‘कुत्रे तर चावले आहे ना, काही होत नाही,’ असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. साहिलवर तब्बल एक तास उपचार केले नाहीत. अखेर रुग्णवाहिका बोलावून साहिलला वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. वेळीच उपचार झाले असते, तर साहिल दगावला नसता असे म्हणत त्याचे वडील भुट्टो अन्सारी यांनी माणमधील संबंधित दवाखान्यांतील कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

प्राथमिक केंद्रात उपचार - डॉ. लकडे
हिंजवडी - भटक्‍या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या साहिलच्या आईने केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर माण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी लकडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘सकाळी सव्वा सात वाजता मुलाच्या नातेवाईकांनी जखमी अवस्थेत उपचारासाठी त्यास आरोग्य केंद्रात आणले. त्या वेळी ड्युटीवर असलेल्या आरोग्य परिचारिका रंजना कडलग यांनी काही ॲन्टिबायोटिक्‍स व डाँग्ज बाईटचे इंजेक्‍शन त्याला दिले. येथील रुग्णवाहिका अन्य पेशंटला सोडायला बाहेरगावी गेल्याने थेरगाव येथील रुग्णवाहिका येण्यास अर्धा तासाचा विलंब झाला. त्यामुळे प्राथमिक सर्व उपचार आरोग्य केंद्रात केले.’’

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्ताची मागणी
मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकल्याचे प्राण जाण्याची माणमधील ही दुसरी घटना आहे. दोन वर्षांपूर्वी माण येथील बोडकेवाडी फाट्याजवळील वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुराच्या मुलावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून त्याचा जीव घेतला होता. त्यामुळे माण, मारूंजी, हिंजवडी परिसरांत मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. 

तक्रारीनंतर केवळ नसबंदी
पिंपरी-चिंचवड शहरात भटक्‍या कुत्र्यांची समस्या मोठी आहे. महापालिकेच्या सारथी संकेतस्थळावर सर्वाधिक तक्रारी भटक्‍या कुत्र्यांसंदर्भात आहेत. त्यांच्याबाबत तक्रार आल्यानंतर महापालिका केवळ नसबंदी न झालेल्या कुत्र्यांना पकडून नेते. नसबंदी केल्यानंतर तीन दिवसांनी पुन्हा त्या कुत्र्यास पूर्वीच्याच परिसरात सोडून दिले जाते.

आज बैठक 
मोकाट कुत्र्यांचा उपद्रव थांबविण्यासाठी सोमवारी (ता. २६) माण ग्रामपंचायतीच्या कार्यालयात पशुवैद्यकीय व आरोग्य विभागाची तातडीची बैठक बोलावल्याचे मुळशीचे उपसभापती पांडुरंग ओझरकर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘अशा घटना वारंवार घडू नये, यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी ही बैठक होणार आहे.’’

शहरातील श्‍वानदंशाची आकडेवारी
वर्ष       रुग्ण

२०१३-१४   ९,३६०     
२०१४-१५   ९,७९५
२०१५-१६   १०,१६५ 
२०१६-१७   १०,५३३
२०१७-१८   ९,५६२

Web Title: pimpri news dog attack child death