‘मध्यावधी’च्या चर्चेने इच्छुकांच्या हालचाली

मिलिंद वैद्य
सोमवार, 19 जून 2017

पिंपरी - शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे तापलेले वातावरण आणि शिवसेनेची ताठर भूमिका, यामुळे राज्यात निर्माण झालेली राजकीय अस्थिरता पाहता विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील काही इच्छुकांनी त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.

पिंपरी - शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे तापलेले वातावरण आणि शिवसेनेची ताठर भूमिका, यामुळे राज्यात निर्माण झालेली राजकीय अस्थिरता पाहता विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील काही इच्छुकांनी त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.

महापालिकेवर भारतीय जनता पक्षाने आपला झेंडा फडकविल्यानंतर विधानसभेसाठी इच्छुकांची संख्या या पक्षाकडे अधिक असेल. शहरात भाजपचे दोन, तर शिवसेनेचा एक आमदार आहे. अगदी २०१४ पर्यंत हे तीनही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे गड मानले जात; पण ‘डिव्हाईड ॲण्ड रूल’ या काँग्रेसनीतीचा वापर करत मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने येथे सत्ता मिळवली.

पिंपरी विधानसभा 
निवडणूक झालीच तर पिंपरी विधानसभा मतदारसंघात भाजपकडून महापालिका स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, खासदार अमर साबळे यांची कन्या वेणू साबळे, नॉव्हेल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अमित गोरखे यांची नावे चर्चेत आहेत. रिपाइंच्या चंद्रकांता सोनकांबळे या पुन्हा उमेदवारीवर दावा सांगण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादीकडून माजी आमदार अण्णा बनसोडे हेच प्रबळ दावेदार मानले जातात, तशी इच्छाही त्यांनी ‘सकाळ’कडे बोलून दाखविली. त्यांनी मतदार नोंदणी अभियानसुद्धा हाती घेतले आहे. याशिवाय शिवसेनेकडून विद्यमान आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार हे पुन्हा निवडणूक लढवू शकतात. 

चिंचवड विधानसभा 
चिंचवड मतदारसंघातून भाजपकडून स्वतः शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप हेच प्रबळ दावा सांगू शकतात. मात्र, त्यांना लोकसभेसाठी संधी देण्याचा विचार भाजपच्या प्रदेश नेत्यांच्या मनात आहे. तसे झाल्यास त्यांच्याऐवजी एखादा जगतापसमर्थक नवा चेहरा आयत्या वेळी पुढे येण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. राज्य लोकलेखा समिती अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांच्या नावाचीही पुन्हा चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून चिंचवडसाठी भाऊसाहेब भोईर हे मुख्य दावेदार असतील, त्यांच्यापाठोपाठ नाना काटे यांच्याही नावाला पसंती मिळू शकते. शिवसेनेकडून राहुल कलाटे हेच एकमेव नाव शर्यतीत असेल.

भोसरी विधानसभा 
भोसरी मतदारसंघातून भाजपतर्फे विद्यमान आमदार महेश लांडगे हेच पुन्हा उमेदवार असू शकतात; परंतु त्यांनाही जगताप यांच्याप्रमाणे शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा पक्षाचा विचार आहे. त्या दृष्टिकोनातून महेश लांडगे हे आधीपासूनच साखरपेरणी करीत आहेत. त्यांच्याऐवजी महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार यांचे नाव पुढे येऊ शकते. महापौर नितीन काळजे यांना विधानसभेसाठी उमेदवारी मिळवून देण्याकरिता लांडगे प्रयत्न करू शकतात. याशिवाय आणखीही नवा चेहरा समोर येऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार विलास लांडे हे प्रबळ दावेदार आहेत. भोसरी मतदारसंघ आतापासूनच पिंजून काढण्यास सुरवात केल्याचे त्यांनी स्वतःच स्पष्ट केले. त्यांच्याशिवाय माजी महापौर मंगला कदम व नगरसेवक दत्ता साने हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत. साने यांनीही अगोदरपासूनच तयारी सुरू केली आहे. शिवसेनेकडून माजी नगरसेविका सुलभा उबाळे यांचे एकमेव नाव पक्षाकडे आहे.

Web Title: pimpri news election politics pcmc