‘ईएसआय’च रुग्णशय्येवर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

पिंपरी - सुमारे पाच लाख कामगारांच्या शहरातील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाचे (ईएसआय) कामकाज केवळ दोन पूर्णवेळ डॉक्‍टरांवर सुरू असून, केवळ पाच अर्धवेळ तज्ज्ञ डॉक्‍टर कार्यरत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून पूर्णवेळ तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या १२ रिक्त जागा भरण्यास राज्य सरकारला मुहूर्त सापडलेला नाही. 

पिंपरी - सुमारे पाच लाख कामगारांच्या शहरातील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाचे (ईएसआय) कामकाज केवळ दोन पूर्णवेळ डॉक्‍टरांवर सुरू असून, केवळ पाच अर्धवेळ तज्ज्ञ डॉक्‍टर कार्यरत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून पूर्णवेळ तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या १२ रिक्त जागा भरण्यास राज्य सरकारला मुहूर्त सापडलेला नाही. 

मोहननगर येथील या रुग्णालयासाठी १४ तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या पूर्णवेळ जागा मंजूर आहेत. यात दोन फिजिशियन, बालरोग तज्ज्ञ, कान-नाक-घसा तज्ज्ञ, शल्यचिकित्सक, भूलतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, अस्थिरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि वैद्यकीय अधीक्षक यांच्या प्रत्येकी एक जागेचा समावेश आहे. याला पर्याय म्हणून अर्धवेळ तज्ज्ञ डॉक्‍टरांची नेमणूक करण्यात आली असून, त्यात कान-नाक-घसा, भूलतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ यांची एक वर्षाच्या कंत्राटी पद्धतीने नेमणूक केली आहे. डॉक्‍टरांची संख्या अपुरी असल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. 

रुग्णालयातील एक्‍स-रेची यंत्रणा, हाडांच्या शस्त्रक्रियेसाठीची सी-आरएम यंत्रणा आणि लॅबसाठी आवश्‍यक असणारी सेमी ऑटो ॲनॅलिसिस यंत्रणा नसल्याने डॉक्‍टरांना शस्त्रक्रिया करताना अडचण येत आहे. याची मागणी वर्षभरापूर्वीच सरकारकडे केली आहे. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठीचा मायक्रोस्कोप अनेक दिवसांपासून नादुरुस्त झालेला आहे. त्यामुळे या शस्त्रक्रिया अनेक दिवसांपासून बंद आहेत. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नवीन यंत्रणा उपलब्ध करून देण्याची मागणी दीड वर्षापूर्वीच केली आहे. रुग्णालयामध्ये पाच बेडचे स्वतंत्र इंटेन्सिव्ह केअर युनिट (आयसीयू) सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव दिला आहे. मात्र त्यावर निर्णय झालेला नाही. तज्ज्ञ डॉक्‍टर नसल्यामुळे या ठिकाणचे बेडही रिक्‍त राहत आहेत. रुग्णालयात १०० बेड असून, वर्षाला त्यापैकी ४४ टक्‍केच बेड भरत आहेत.

रुग्णालयात रिक्‍त असणाऱ्या पूर्णवेळ तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या जागा भरण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरून सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे; तसेच अत्याधुनिक यंत्रणेसाठी पाठपुरावा सुरू आहे. येत्या काही दिवसांमध्ये हा प्रश्‍न मार्गी लागण्याची शक्‍यता आहे. 
- डॉ. श्रीकांत सरोदे, वैद्यकीय अधीक्षक (अतिरिक्‍त कार्यभार)

वर्षभरातील रुग्णांचे आकडे  (एप्रिल २०१६ ते मार्च २०१७)
बाह्यरुग्ण - ५९,२१०
आंतररुग्ण - ३,२८६
मोठ्या शस्त्रक्रिया - २३
किरकोळ शस्त्रक्रिया - ४१२
प्रसूती - ३६

Web Title: pimpri news ESI hospital