गुटखाबंदी फक्त कागदावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

पिंपरी - राज्य सरकारने राज्यात गुटखाबंदीचा कायदा केलेला आहे, मात्र, ही बंदी नावालाच असून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री खुलेआम सुरू आहे.

पिंपरी - राज्य सरकारने राज्यात गुटखाबंदीचा कायदा केलेला आहे, मात्र, ही बंदी नावालाच असून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री खुलेआम सुरू आहे.

शहरातील गुटख्याच्या खरेदी-विक्रीचे मोठे केंद्र पिंपरी आहे. सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन विभागावर आहे. पोलिस यंत्रणेचाही यात सहभाग असला तरी, तो त्या-त्या वेळचे गुन्हे दाखल करून घेण्यापुरताच दिसतो. त्यामुळे गुटखाबंदी केवळ कागदावरच राहिली आहे. शुद्ध पाणी मिळणार नाही, पण गुटखा मिळेल अशी अनेक दुकाने, पानटपऱ्या गल्लोगल्ली आहेत. बंदीचा निर्णय होण्यापूर्वी गुटखा उघडपणे डिस्प्लेकरून विकला जायचा, आता तो छुप्या पद्धतीने सर्रास विकला जात आहे. कोणत्याही पानटपरीवर गुटख्याचा कोणताही ब्रॅण्ड मागितला, तर टपरीचालक पुडी कुठून काढतो हे लक्षात येण्याआधीच ग्राहकाच्या हातात गुटख्याची पुडी ठेवलेली दिसते. 

संभ्रम निर्माण करणारा व्यवहार
बंदी असूनही गुटखा नेमका कोठून येतो?, हा माल कुठे उतरविला जातो?, त्याचे डीलर-डिस्ट्रीब्युटर कोण?, ठोक स्वरूपात येणाऱ्या मालाची विक्री कशी होते?, त्याचे पानटपऱ्यांपर्यंत व छोट्या-मोठ्या ठेल्यांपर्यंत वितरण कसे होते?, असे प्रश्‍न सर्वसामान्यांना पडतात. शहरात गुटख्याच्या व्यवहारातून कोट्यवधींची उलाढाल होत आहे. मात्र, हा व्यवहार नेमका कसा चालतो? याबाबत कमालीचा संभ्रम आहे. या व्यवहाराच्या मुळाशी शासकीय यंत्रणा पोचू शकत नाही?, ही वस्तुस्थिती आहे. 

गुटख्याच्या आहारी तरुणाई 
गुटख्यालाच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानालाही बंदी असताना सर्रास धूम्रपान होते, हेदेखील लपून राहिलेले नाही. त्याचप्रमाणे सार्वजनिक जागी, रस्त्यावर, व्यापारी संकुलांमध्ये चार-चौघे गुटखा केवळ खातच नाही, तर एकमेकांमध्ये उघडपणे ‘शेअर’ही करतात. गुटखा सहजपणे मिळत असल्याने या व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना तर गुटखा विक्रीवर बंदी आहे, हेदेखील माहीत नाही. याबाबत त्यांना छेडले असता, ‘विक्रीवर बंदी आहे, खाण्यावर आहे का?’ असा प्रतिप्रश्‍न त्यांच्याकडून उपस्थित केला जातो. तरुणवर्ग या व्यसनाच्या सर्वाधिक आहारी गेल्याचे चित्र दिसून येते.

परिणामांकडे तरुणाईचे दुर्लक्ष
गुटख्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांकडे तरुणवर्गाने दुर्लक्ष केले आहे. गुटखा खाल्ल्याने घसा, तोंडाचा कर्करोग होण्याची शक्‍यता बळावते. त्याशिवाय, फुफ्फुस व यकृतही निकामी होण्याची शक्‍यता असते. गुटख्यामुळे अनेकांना कर्करोग होऊन त्यांचा बळी गेल्याची उदाहरणे आहेत.

अन्न व औषध प्रशासन खात्याच्या पिंपरी-चिंचवड विभागाला फक्त पाच जणांचेच मनुष्यबळ आहे. त्यामुळे कारवाईत अडचणी येतात. गुटखा विक्रीबाबत नागरिकांनी १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
- संजय नारगुडे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

Web Title: pimpri news Gutka ban