लपून-छपून होतोय कॅरिबॅगचा वापर

पितांबर लोहार
सोमवार, 2 एप्रिल 2018

पिंपरी - प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदीमुळे नागरिक बाजारात जाताना घरूनच कापडी किंवा कागदी पिशव्या घेऊन जात असले तरी लपून-छपून कॅरिबॅगचा वापर सुरूच आहे; विक्रेतेही ‘कॅरिबॅग नाही’, असे सांगत आहेत, अशी स्थिती रविवारी (ता. १) शहरात बघायला मिळाली. त्यामुळे प्लॅस्टिकबंदीबाबत प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

पिंपरी - प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदीमुळे नागरिक बाजारात जाताना घरूनच कापडी किंवा कागदी पिशव्या घेऊन जात असले तरी लपून-छपून कॅरिबॅगचा वापर सुरूच आहे; विक्रेतेही ‘कॅरिबॅग नाही’, असे सांगत आहेत, अशी स्थिती रविवारी (ता. १) शहरात बघायला मिळाली. त्यामुळे प्लॅस्टिकबंदीबाबत प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

राज्य सरकारने प्लॅस्टिक पिशव्यांसह अन्य वस्तूंवर बंदी घातली आहे. त्याची अंमलबजावणी रविवारपासून सुरू झाली; मात्र प्लॅस्टिकबंदीविरोधात शहरातील व्यापाऱ्यांनी गेल्या आठ दिवसांपासून बंद पुकारला आहे. त्यांची दुकाने बंद असली, तरी काही किरकोळ विक्रेत्यांकडे प्लॅस्टिक कॅरिबॅग रविवारी आढळून आल्या. काहींनी त्या साठवून ठेवल्या होत्या, तर काहींनी उल्हासनगर येथून आणल्या जात असल्याचे खासगीत सांगितले. 

महापालिकेकडून कार्यवाही
सरकारच्या आदेशानुसार, महापालिका प्लॅस्टिकबंदीबाबत उपाययोजना करत असल्याचे सहआयुक्त दिलीप गावडे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘प्लॅस्टिकबंदीबाबत रूपरेषा ठरविण्याचे काम सुरू आहे. व्यावसायिक, विक्रेते व नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. सरकारचा अध्यादेश लागू झाला, तेव्हापासून प्लॅस्टिक उत्पादनावर बंदी घातली आहे. त्यापूर्वी उत्पादित केलेल्या मालाची तीन महिन्यांत विल्हेवाट लावायची आहे. मोशी कचरा डेपोच्या आवारात प्लॅस्टिक पिशव्या व अन्य वस्तूंची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था आहे.’’ 

बंदी घातलेल्या वस्तू
थर्माकॉल व प्लॅस्टिकची ताटे, कप, प्लेट, ग्लास, चमचे, वाटी, स्ट्रॉ, कटलरी, स्प्रेड शीट्‌स, पाउच, वेष्टने.

बंदी कशावर?
उत्पादन, साठवणूक, वितरण, विक्री, आयात व वाहतूक

कायदा काय सांगतो?
प्लॅस्टिकबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना आर्थिक दंड व तीन महिने कारावासाची शिक्षा.

बाजारात गेल्यावर किमान दहा रुपयांची कापडी पिशवी घ्यावी लागेल किंवा कारवाई होईल, या भीतीने लोक घरूनच कापडी पिशव्या घेऊन येतात. काही जण आमच्याकडून कापडी पिशव्या घेतात; पण त्यांचे प्रमाण कमी आहे. 
- रफिकभाई अत्तार, कापडी पिशव्या विक्रेते, पिंपरी कॅम्प

ग्राहकांना कॅरिबॅग देण्याऐवजी कापडी पिशव्याच विकायला ठेवल्या आहेत. काही जण कॅरिबॅग मागतात, नाही म्हटले की पुढे निघून जातात. सकाळपासून किमान २० जण भाजीपाला न घेताच निघून गेल्यामुळे नुकसान झाले.
- आशिष सोनके, भाजीपाला विक्रेता, पिंपरी मंडई

प्लॅस्टिक पिशव्याबंदीचा निर्णय योग्य आहे. त्यामुळे मी भाजीपाला व अन्य साहित्य घेण्यासाठी घरूनच पिशव्या घेऊन आले. चांगल्या गोष्टीची सुरवात स्वतःपासूनच केली पाहिजे. कापडी पिशव्या वापरण्याची सवय लावून घेतली पाहिजे. 
- रेवती शिंदे, गृहिणी, निगडी-प्राधिकरण

विक्रेते व व्यापाऱ्यांनी प्लॅस्टिक पिशव्या ग्राहकांना देण्याऐवजी कापडी पिशव्या विक्रीस ठेवाव्यात. ग्राहकांना पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे. याविषयी व्यापारी, विक्रेते व ग्राहकांमध्ये जागृती करण्याचे काम सुरू आहे. 
- दिलीप गावडे, सहआयुक्त, महापालिका. 

Web Title: pimpri news Hiding use plastic Carry Bag