चर्चेचे गुऱ्हाळ कुठवर?

चर्चेचे गुऱ्हाळ कुठवर?

पिंपरी  - पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह विविध शासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली खरी; पण ही बैठक म्हणजे निव्वळ देखावाच होता, असा सणसणीत आरोप ‘फ्री अप हिंजवडी’च्या समन्वयकांनी केला. पालकमंत्री म्हणून हिंजवडीतील प्रश्‍न सोडविण्याबाबत आपण किती गंभीर आहोत, हे दाखविण्याचाच या बैठकीतून प्रयत्न झाला. गेल्या आठ-दहा वर्षांत अशा बऱ्याच बैठका झाल्या. अनेक नेते, मंत्री, अधिकाऱ्यांनी दौरे केले. समस्या मात्र ‘जैसे थे’ राहिल्या. बापट यांनी घेतलेली ही बैठकही निष्फळ ठरण्याची खात्रीच सर्वांना अधिक वाटत आहे.

या बैठकीचे मुद्देही नेहमीचेच होते आणि योजनाही जुन्याच होत्या. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी सक्षम, सोईची आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करणे हाच एक पर्याय आहे, असे पारंपरिक चर्चेचे गुऱ्हाळही या बैठकीत रंगले. पीएमपीची बससेवा वाढविण्याची गरजही व्यक्त झाली. मात्र, नेहमीच्याच रस्त्यांवरून या बस धावणार असतील, तर केवळ वेळा आणि बससंख्या वाढवून कोणताही फायदा होणार नाही, असे मत ‘फ्री अप समन्वयकां’नी ‘सकाळ’जवळ व्यक्त केले. 

मेट्रोचे ‘पुनरावलोकन’ व्हावे
हिंजवडीतील ६० टक्के कर्मचारी पिंपरी- चिंचवड विशेषतः वाकड, कस्पटे वस्ती, जगताप डेअरी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव आणि सांगवी पट्ट्यात राहत असताना, ही ‘मेट्रो’ बाणेरमार्गे शिवाजीनगरला नेण्याचा घाट का घातला गेला, असा सवालही ‘आयटी’ प्रतिनिधींनी विचारला. नव्हे, तर पिंपरी- चिंचवडमधील स्थानिक नेत्यांनी ही ‘मेट्रो’ चिंचवड- औंधमार्गे नेण्याचा आग्रह धरायला हवा होता. येथील वाहतुकीची बदलती परिस्थिती पाहता ‘मेट्रो’ मार्गाचे ‘पुनरावलोकन’ करणे गरजेचे आहे. आवश्‍यक सुधारणा करून योग्य मार्गाची निवड करण्याच्या अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या. 

वाहतूक पोलिसांवरही नाराजी 
वाहतूक पोलिसांचे खरे काम वाहतुकीसंदर्भातील उपलब्ध कायदा व सुव्यवस्था पाहणे हे आहे. मात्र, वाहतुकीचे नियमन करण्याऐवजी नाक्‍यानाक्‍यांवर पावत्या फाडतानाच ते अधिक दिसत असल्याची तक्रार स्थानिकांसह आयटीयन्सनी केली. रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंग, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून होणारी वाहतूक, बेशिस्त वाहनचालक, हा त्याचाच परिपाक. ‘डेडिकेटेड बस लेन’ आणि ‘मोटारसायकल कॉन्ट्रा लेन’ सुरू करून वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचा पुरता फज्जा उडविल्याची टीका खासगी वाहतूकदार, स्थानिक नागरिक आणि आयटीयन्स अशा सर्वांनीच केली. 

वाहतूक पोलिस असेल तरच नियम पाळायचा, नाहीतर तोडायचा, ही प्रवृत्ती दिसून येते. परदेशात गेल्यावर काटेकोर नियम पाळणारे हेच ‘आयटीयन्स’ पुण्यात आल्यावर काहीही चालते, अशा भावनेतून वाहतुकीकडे पाहतात, त्यामुळे गुंतागुंत निर्माण होते.
- दत्तात्रेय पाटील, पोलिस निरीक्षक (वाहतूक विभाग)

सीसीटीव्ही बसवणार
१३ कोटी रुपये खर्चून हिंजवडी परिसरात नऊ ठिकाणी एकूण ४५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव एमआयडीसीने मंजूर केला आहे. त्यांचे नियंत्रण पोलिसांकडे असेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com