‘आंतरराष्ट्रीय सल्लागार समिती’ कागदावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

पिंपरी - देशाच्या आर्थिक उन्नतीमध्ये कररूपाने सर्वाधिक हातभार लावणाऱ्या हिंजवडीतील वाढती रहदारी आणि वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय सल्लागार समिती’ नेमून, त्या माध्यमातून आगामी दहा वर्षांच्या वाहतुकीचे नियोजन करण्यात येईल, असे आश्‍वासन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २०१२ मध्ये दिले होते. त्यानंतरही अनेक नेत्यांनी अशा ‘वल्गना’ केल्या. मात्र, आजतागायत त्या केवळ कागदावरच राहिल्या. परिस्थिती चिघळतच गेली. 

‘एमआयडीसी’, ‘पीएमआरडीए, ‘पिंपरी-चिंचवड पालिका’, ‘हिंजवडी- माण- मारुंजी ग्रामपंचायत’ आदी संस्थांमध्ये हा परिसर विभागला गेला. परिणामी, हद्दीचे वाद आणि समन्वयाचा अभाव अशा विचित्र कचाट्यात हिंजवडीचा विकास अडकला आहे. हे ‘कलह’ सोडविण्यासाठी कर्नाटक व गुजरातच्या धर्तीवर ‘स्वतंत्र औद्योगिक नगर परिषद’ स्थापण्याचा प्रस्ताव ‘हिंजवडी इंडस्ट्रीअल असोसिएशन’ने राज्याकडे पाठविला होता. तोही ‘लाल फिती’त अडकला. वाहतूक समस्येवर ठोस उपाययोजना राबविण्यात सरकार ‘सपशेल’ अपयशी ठरले. ‘एमआयडीसी’ची अतिक्रमण विरोधी मोहीमही ‘नकली’च ठरत आहे.

हिंजवडी पुलाचे दुखणे
चुकीच्या पद्धतीने बांधलेला ‘हिंजवडी उड्डाण पूल’ हे हिंजवडी रस्त्यावरील वाहतुकीचे मूळ दुखणे. हा पूल उत्तर-दक्षिण बांधावा अशी मागणी, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी केली होती. मात्र, ‘एमआयडीसी’कडून तो पूर्व-पश्‍चिम बांधण्यात आला. तुलनेने पुलावरील वाहतुकीपेक्षा पुलाखालील वाहतूक मोठी असल्याने वाहतूक कोंडीत भर पडली. त्यामुळे सर्वप्रथम हा पूल हटविणे आवश्‍यक आहे; अथवा प्रायोगिक स्वरूपात पुलावरील वाहतूक एकेरी ठेवावी, असे मत ‘फ्री अप हिंजवडी’चे सुदेश राजे यांनी व्यक्त केले.

हिंजवडी पूल हटविण्याऐवजी त्याला समांतर दुसरा पूल उभारण्याचा प्रस्ताव ‘असोसिएशन’ने सरकारसमोर ठेवला आहे. केवळ ‘मेट्रो’मुळे त्याचा विकास प्रलंबित आहे.
- दत्तात्रेय पाटील, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग

अरुंद रस्ते ही मुख्य समस्या आहे. हे रस्ते लोकवस्तीतून जात असल्याने ते रुंद करणे आजच्या घडीला शक्‍य नसले तरी, त्याला पर्यायी रस्ते विकसित करणे आवश्‍यक आहे. दररोजच्या या वाहतूक समस्येचा शारीरिक, मानसिक आरोग्यावरही परिणाम होत आहे.
- अनिल शिर्के, हिंजवडी

महिला कर्मचारी वर्गाला वाहतूक समस्येचा विशेष त्रास होतो. ‘बडिकॉप’सारखे उपक्रम राबवून महिलांना संरक्षण देताना, त्यांचा प्रवासही सुखकर कसा होईल, याकडेही लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे.
- इंदिरा थोपटे, हिंजवडी

Web Title: pimpri news hinjewadi traffic