खड्डे बुजविण्यासाठी जेट पॅचर पोथॉल मशिन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

शहराच्या विविध भागांत आठ दिवस जेट पॅचर पोथॉल मशिनद्वारे खड्डे बुजविण्याचा प्रयोग केला जाणार आहे. दररोज 25 खड्डे बुजविण्याची क्षमता मशिनची आहे. या मशिनद्वारे बुजविलेल्या खड्ड्यांवरून वाहने गेल्यानंतर काय परिणाम होत आहे, हे पाहण्यात येईल. आठ दिवसांनंतर त्याचा अभिप्राय घेतला जाईल. 
- राजन पाटील, सहशहर अभियंता 

पिंपरी - शहराच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे महापालिका आता हे खड्डे बुजविण्यासाठी "जेट' पॅचर पोथॉल मशिनचा अवलंब करणार आहे. या आधुनिक मशिनद्वारे खड्डे बुजविण्यास शुक्रवारी (ता. 22) नाशिक फाटा येथून सुरवात झाली. 

शहरातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मॉन्सूनपूर्व डागडुजी करण्यात न आल्याने रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात डांबर उपलब्ध होत नाही. त्यामुळे खड्डे बुजविताना पालिकेकडून शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब झाला नाही. त्यामुळे खड्ड्यांची समस्या दिवसेंदिवस उग्र बनत आहे. खड्ड्यांच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने खड्डे बुजविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निश्‍चित केले आहे. त्यानुसार शुक्रवारी नाशिक फाटा येथून जेट पॅचर पोथॉल मशिनद्वारे खड्डे बुजविण्यास सुरवात केली आहे. 

...असा बुजविला जातो खड्डा 
अगोदर रस्ता स्वच्छ केला जातो. खड्ड्याची समपातळी करून त्यावर मशिन ठेवली जाते. खड्ड्याच्या जागेवर जाळी ठेवून त्याचे तापमान उष्ण केले जाते. त्यानंतर रासायनिक प्रक्रिया केली जाते. थंड डांबराचे गोळे त्यावर टाकले जातात. पुन्हा त्यावर मशिन ठेवली जाते. त्यामुळे डांबराचे गोळे वितळतात आणि डांबराचे मिश्रण एकजिनसी होते. त्यामुळे ते पुन्हा रस्त्याला घट्ट बसते. पुन्हा त्यावर दाब मशिन फिरविली जाते. या प्रक्रियेला 30 ते 35 मिनिटांचा कालावधी लागतो. 

Web Title: pimpri news Jet Pachter Pothol Machine