कैलास कदम यांच्या खुनाचा कट उधळला 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

पिंपरी - कॉंग्रेसचे माजी नगरसेवक आणि कामगार नेते कैलास कदम यांच्या खुनाचा कट पोलिसांनी उधळून लावला. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका गीता मंचरकर यांचे पती ऍड. सुशील मंचरकर यांच्यासह फरार झालेल्या दोन आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे. मंचरकर यांना न्यायालयाने मंगळवारपर्यंत (ता. 19) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

पिंपरी - कॉंग्रेसचे माजी नगरसेवक आणि कामगार नेते कैलास कदम यांच्या खुनाचा कट पोलिसांनी उधळून लावला. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका गीता मंचरकर यांचे पती ऍड. सुशील मंचरकर यांच्यासह फरार झालेल्या दोन आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे. मंचरकर यांना न्यायालयाने मंगळवारपर्यंत (ता. 19) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

ऍड. सुशील मंचरकर (वय 50, रा. पिंपरी), सुरेश स्वामिनाथ झेंडे (वय 29, रा. थेरगाव), राजू ऊर्फ काल्या महादेव पात्रे (वय 32, रा. चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संजय काशिनाथ चंदनशीव (रा. आंबेगाव, पुणे) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 10 एप्रिल रोजी मोरवाडी न्यायालयाजवळून काल्या ऊर्फ राजू महादेव पात्रे, संतोष मच्छिंद्र जगताप, लुभ्या ऊर्फ संतोष चिंतामण चांदिलकर हे आरोपी पळून गेले होते. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक चार करीत असताना आरोपी काल्या हा चिंचवड येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्यास अटक केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपींना पळून जाण्यास मदत करणारा सुरेश झेंडे याला अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये कैलास कदम यांच्या खुनाचा कट उघडकीस आला. 

क्षेत्रीय सभेत झालेल्या हाणामारीच्या प्रकरणामध्ये ऍड. मंचरकर हे तुरुंगात असताना त्यांची आरोपींशी ओळख झाली. तिथेच कैलास कदम यांच्या खुनाचा कट रचला गेला. त्यासाठी आरोपींना तुरुंगाबाहेर काढून पळून लावण्याचेही ठरले. त्यानुसार 10 एप्रिल रोजी आरोपी पळून गेले. आरोपी पळून गेल्यावरही ते ऍड. मंचरकर यांच्या संपर्कात होते. कैलास कदम यांचा खून करण्यासाठी मंचरकर यांनी पाच लाख रुपये दिले. त्यातून आरोपींनी तीन पिस्तुले आणि 30 राउंड खरेदी केले. याबाबत अधिक तपास करण्यासाठी ऍड. मंचरकर यांना पोलिस कोठडी देण्यात आली. 

रविवारी होता खुनाचा प्लॅन 
आरोपींनी यापूर्वी दोन वेळा माजी नगरसेवक कैलास कदम यांच्या खुनाचा प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी झाला नाही. रविवारी (ता. 17) पुन्हा कदम यांच्यावर हल्ला करण्याचा बेत आरोपींनी आखला होता. मात्र त्यापूर्वीच गुन्हे शाखेने आरोपींना बेड्या ठोकल्या.

Web Title: pimpri news kailas kadam crime