खरेदी-विक्री संघाच्या कामशेत कार्यालयाला टाळे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

कामशेत - कोट्यवधी रुपयांच्या कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या मावळ तालुका खरेदी-विक्री संघाच्या संचालक आणि सचिव यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. सचिवाच्या गैरकारभाराच्या निषेधार्थ संचालकांनी शुक्रवारी येथील कार्यालयाला टाळे ठोकले. 

कामशेत - कोट्यवधी रुपयांच्या कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या मावळ तालुका खरेदी-विक्री संघाच्या संचालक आणि सचिव यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. सचिवाच्या गैरकारभाराच्या निषेधार्थ संचालकांनी शुक्रवारी येथील कार्यालयाला टाळे ठोकले. 

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा, या साठी 1960 मध्ये कामशेतमध्ये संघाची स्थापना झाली. 55 वर्षांत या संस्थेची काहीच प्रगती झाली नाही. कोट्यवधी रुपयांची मालमत्ता धूळखात पडली असून, लाखो रूपयांच्या कर्जाच्या विळख्यात ही संस्था अडकली आहे. दीड वर्षापूर्वी संस्थेची निवडणूक झाली. संचालक होण्यासाठी लाखोंची उधळण केली. संस्थेच्या हिताचा एकही निर्णय अद्याप झालेला नाही. केवळ अध्यक्ष व उपाध्यपदाच्या निवडणुकीसाठी सर्वजण एकत्र येतात. 

खरेदी-विक्रीची मासिक सभा शुक्रवारी संस्थेच्या कार्यालयात आयोजित केली होती. या वेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांनी सचिव नंदकुमार पदमुले यांना संस्थेच्या कारभाराविषयी विचारणा केली. निवडणुकीच्या वेळी प्रत्येक उमेदवारांकडून दहा हजार घेतले होते. संस्थेच्या भाड्याने दिलेल्या इमारतीचे येणारे भाडे व अन्य प्रश्नांबाबत विचारणा केली असता ते सभा सोडून कार्यालयाच्या चाव्या घेऊन निघून गेले. संचालकांनी कार्यालयाला टाळे ठोकून पदमुले यांच्यावर कारवाईची मागणी सहायक निबंधक राजेश लव्हेकर यांच्याकडे केली. या बाबत सचिव पदमुले म्हणाले, ""गेल्या दीड वर्षात या संचालकांनी काहीच काम केले नाही. निवडणूक आली की माझा राजकीय बळी दिला जातो. संचालकाचे दहा हजार संस्थेत जमा आहेत. संचालकांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. 

""सन 2015-16 च्या आर्थिक वर्षात निवडणूक निधी खर्च केला आहे. त्याच्या लेखा परीक्षणात चुकीची रक्कम दाखविली आहे. त्यामुळे शासकीय फेरलेखापरीक्षण करावे, असा प्रस्ताव जिल्हा निबंधक कार्यालयाकडे पाठवला आहे. तोही चुकीचा आढळल्यास संचालक व सचिव यांच्यावर कारवाई केली जाईल.'' 
- राजेश लव्हेकर, सहायक निबंधक 

Web Title: pimpri news kamshet