लक्ष्मण जगताप यांचे बारणेंना आव्हान 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

पिंपरी - हिंमत असेल तर खासदार श्रीरंग बारणे यांनी आगामी लोकसभेची निवडणूक शिवसेनेतर्फे लढवून दाखवावी. भारतीय जनता पक्षाचे आणि शिवसेनेचे नाराज कार्यकर्ते त्यांना निवडणुकीत पराभूत करतील, असे आव्हान देत भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी मंगळवारी या वादात उडी घेतली. 

पिंपरी - हिंमत असेल तर खासदार श्रीरंग बारणे यांनी आगामी लोकसभेची निवडणूक शिवसेनेतर्फे लढवून दाखवावी. भारतीय जनता पक्षाचे आणि शिवसेनेचे नाराज कार्यकर्ते त्यांना निवडणुकीत पराभूत करतील, असे आव्हान देत भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी मंगळवारी या वादात उडी घेतली. 

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मुंबईत घेतलेल्या बैठकीत बारणे आणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यात वाद झाल्याची बातमी मंगळवारी प्रसिद्ध झाली. जगताप यांना शिवसेनेकडून लोकसभेची निवडणूक लढविण्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सुचविल्याचा आरोप बारणे यांनी केल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातील बारणे आणि जगताप यांच्यातील लढत रंगली होती. बारणे यांनी नाव घेतल्यामुळे जगताप यांनी आज पत्रक प्रसिद्धीला देत त्यांना थेट आव्हान दिले. "मावळ'मधून लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी जगताप करीत असल्याची चर्चा भाजपच्या कार्यकर्त्यांत सुरू आहे. 

जगताप यांनी पत्रकात म्हटले आहे, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे गेल्या निवडणुकीत बारणे खासदार होऊ शकले. त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बारणे यांचा सर्वत्र पराभव झाला. ते राहत असलेल्या थेरगाव परिसरातूनही त्यांना शिवसेनेचे उमेदवार महापालिकेवर निवडून आणता आले नाहीत. पक्षासाठी आणि जनतेसाठी अपयशी ठरल्यामुळे ते शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते खोटे आरोप करीत आहेत.'' 

डॉ. गोऱ्हे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी भेटलो होतो. त्या वेळी त्यांच्याशी कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झाली नाही, असे जगताप यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना स्पष्ट केले. या संदर्भात बारणे यांच्याशी संपर्क साधला असता, जगताप यांच्या आव्हानाविषयी काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला. "या संदर्भात नंतर बोलेन', असे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी काल घेतलेल्या बैठकीत राज्यातील शिवसेनेच्या मंत्र्यांविरुद्ध आमदार, खासदारांनी आक्रमक भूमिका घेतली. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये येत्या पंधरवड्यात फेरबदल होण्याची जोरदार चर्चा आहे. शिवसेनेतर्फे पिंपरी-चिंचवडसाठी संपर्कप्रमुख नियुक्त होण्याची शक्‍यता असून, शहराध्यक्षही नवीन नियुक्त करण्याबाबत पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या अंतर्गत घडामोडींना वेग आला असतानाच जगताप यांनी थेट बारणे यांना आव्हान दिल्यामुळे, या दोन नेत्यांतील संघर्षाचे पडसाद शहरातील या दोन्ही पक्षांमध्ये उमटण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

Web Title: pimpri news laxman jagtap shrirang barne