विस्मृतीमुळे हरवलेल्या माउलीची सुखद भेट

निगडी - मुलासमवेत लीलाबाई राजपूत, पोलिस आणि स्माईल प्लस संस्थेचे पदाधिकारी.
निगडी - मुलासमवेत लीलाबाई राजपूत, पोलिस आणि स्माईल प्लस संस्थेचे पदाधिकारी.

पिंपरी - माय माउली गांगरलेलीच होती. अंगावर फाटके, मळलेले कपडे. विस्कटलेले केस. कोणी क्षणभरही विसावा देत नव्हतं. अशाच अवस्थेत ती अनेक दिवस मुंबापुरीत भटकत राहिली. एक दिवस एका सामाजिक कार्यकर्त्याला आढळली. त्याने पिंपरी-चिंचवडमधील वृद्धाश्रमात तिच्या निवाऱ्याची सोय केली. विस्मृतीचा आजार असल्याने ती तेथून बाहेर पडली. दोन महिन्यांनी निगडीत दिसली. कार्यकर्त्याने मायेने चौकशी केली. तिने सांगलीतील घराचा पत्ता सांगितला. तिच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. ओळख पटली आणि तब्बल तीन वर्षांनी त्या माय माउलीला स्वतःच्या घराचा ऊबदार निवारा मिळाला. लीलाबाई राजपूत असे तिचे नाव. वय वर्षे ६०. राजपूत यांची घरची परिस्थिती हलाखीचीच. मुलगा रिक्षा चालवून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत होता. विस्मृतीमुळे लीलाबाई एके दिवशी घरातून बाहेर पडल्या. थेट रेल्वेत बसल्या. कल्याणला उतरल्या. काहीच आठवेना. तशाच भटकत राहिल्या. हळूहळू मनात घरच्या आठवणी ताज्या झाल्या. मात्र, कोणाकडे बोलावे? कळेना. त्यांची अवस्था पाहून कोणी त्यांना जवळही फिरकू देईना. अखेर त्यांनी आशा सोडली. 

त्याचदरम्यान त्यांची भेट पिंपरी- चिंचवडमधील ‘स्माईल प्लस सोशल फाउंडेशन’चे योगेश मालखरे यांच्याशी झाली. त्यांनी लीलाबाईंचे पुनर्वसन निगडीतील एका संस्थेत केले. मात्र, विस्मरणाने पुन्हा डोके वर काढले. त्या तेथूनही बाहेर पडल्या. दोन महिन्यांनंतर मालखरे यांना त्या निगडीत दिसल्या. त्यांनी आस्थेने चौकशी केली. त्या वेळी त्यांनी सांगलीतील घराचा पत्ता सांगितला. मालखरे व सहकाऱ्यांनी त्या पत्त्यावर शोध घेतला. लीलाबाईंचा मुलगा रिक्षाचालक. आई हरविल्याची तक्रार त्याने पोलिसांकडे दिली होती. तिचा बराच शोधही घेतला होता. मात्र, त्या सापडल्या नाहीत.

आईचा शोध लागल्याचे कळताच त्याने निगडीकडे धाव घेतली. आईला मिठी मारली. अश्रू अनावर झाले. अनवाणी मुलाकडे पाहत लीलाबाईंनी स्वतःच्या पायातील बूट काढून मुलाला घालायला दिले. उपस्थितांच्या पापण्या ओलावल्या. निगडीचे पोलिस निरीक्षक विजय पळसुले यांच्या उपस्थितीत वाल्मीक कुटे, सुमंत ठाकरे, विशाल चव्हाण, कार्तिक जाधव यांनी लीलाबाईंना मुलाच्या हवाली केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com