‘लोकल’ लोकांसाठी लोकल हवीच

मंगळवार, 12 डिसेंबर 2017

पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहराची सर्वांत गहन समस्या कोणती असेल तर ती म्हणजे सार्वजनिक वाहतूक. दोन्ही शहरांमध्ये मिळून सुमारे ६० लाखांवर लोकसंख्या आहे. केवळ सार्वजनिक वाहतूक कमकुवत असल्याने आज घरटी किमान दोन खासगी वाहने आहेत. दैनंदिन पुणे-पिंपरी प्रवास करणाऱ्यांची संख्या तब्बल पाच लाख आहे. त्यात पीएमपीचा वापर करणारे दोन लाख, पुणे-लोणावळा लोकलने एक लाख आणि उर्वरित प्रवासी स्वतःचे वाहन वापरतात. परिणामी, रस्ते गच्च भरून वाहतात, रोजचे अपघात आहेतच. प्रदूषणाने धोकादायक पातळी केव्हाच ओलांडली आहे. या सर्व समस्येवर उपाय म्हणजे पीएमपी अधिक मजबूत करणे. लोणावळा ते दौंड लोकलच्या फेऱ्या वाढविणे.

पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहराची सर्वांत गहन समस्या कोणती असेल तर ती म्हणजे सार्वजनिक वाहतूक. दोन्ही शहरांमध्ये मिळून सुमारे ६० लाखांवर लोकसंख्या आहे. केवळ सार्वजनिक वाहतूक कमकुवत असल्याने आज घरटी किमान दोन खासगी वाहने आहेत. दैनंदिन पुणे-पिंपरी प्रवास करणाऱ्यांची संख्या तब्बल पाच लाख आहे. त्यात पीएमपीचा वापर करणारे दोन लाख, पुणे-लोणावळा लोकलने एक लाख आणि उर्वरित प्रवासी स्वतःचे वाहन वापरतात. परिणामी, रस्ते गच्च भरून वाहतात, रोजचे अपघात आहेतच. प्रदूषणाने धोकादायक पातळी केव्हाच ओलांडली आहे. या सर्व समस्येवर उपाय म्हणजे पीएमपी अधिक मजबूत करणे. लोणावळा ते दौंड लोकलच्या फेऱ्या वाढविणे. त्याशिवाय सध्या बीआरटी आणि दोन वर्षांनी मेट्रो येतेच आहे. तुकाराम मुंढे यांच्यामुळे पीएमपी सेवा सुधारली. मात्र, दुसरीकडे लोकल सेवा खालावली. रात्रीच्या तीन लोकल कायमस्वरूपी रद्द केल्यात. त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसला. दुरुस्तीच्या नावाखाली लोकलच्या पाच फेऱ्या रद्द केल्याने परवा तळेगावच्या त्रस्त प्रवाशांनी जोरदार आंदोलन केले. एकीकडे भविष्याचा विचार करून लोकल सेवा वाढविण्याचे नियोजन सुरू आहे. फक्त लोकलसाठीची स्वतंत्र मार्गिका असावी, या दृष्टिकोनातून तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाची आखणी होत आहे. दुसरीकडे प्रवासी नाहीत, असे सांगत लोकलच्या फेऱ्या रद्द केल्या जातात. यात कुठेतरी विसंगती आहे. स्वस्त, मस्त आणि जलद प्रवासासाठी अर्ध्या तासाला एक लोकल कशी सुरू होईल, यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. रस्त्यावरची वाहतूक कोंडी, अपघात, प्रदूषणाचा ताण कमी करायचा असेल तर हाच एक रामबाण उपाय आहे. लोकांना जे खरोखर गरजेचे आहे ते द्या. लोकलच्या फेऱ्या कमी करून मुस्काटदाबी करू नका.

दादागिरी, गुन्हेगारी, फुकटे 
लोकलचा प्रवास अत्यंत स्वस्त आहे. उदाहरणच द्यायचे तर, पिंपरी-पुणे प्रवास वीस मिनिटांत आणि तोही फक्त पाच रुपयांत होतो. पीएमपीमध्ये त्यासाठी २५ रुपये मोजावे लागतात आणि वाहतूक कोंडीमुळे किमान पाऊण तास जातो. फक्त लोकांना त्यांच्या अपेक्षित वेळेत लोकल मिळत नाही, म्हणून प्रवाशांची संख्या काहीशी कमी आहे. या स्वस्त, मस्त लोकल सेवेचा पुरेपूर लाभ घेणाऱ्या फुकट्यांचीच संख्या किमान ३० ते ४० टक्के आहे. त्यामुळे ही सेवा घाट्यात गेली. रोज विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा कायमस्वरूपी राहिला पाहिजे, म्हणजे फुकट्यांची संख्या आपोआप कमी होईल. लोकलमध्ये पाकीटमारी नित्याची आहे. काही गल्लीतील गुंडांच्या टोळ्या त्यासाठी कार्यरत आहेत. पोलिसांना हे सर्व कळते पण वळत नाही. तृतीयपंथीयांचा त्रास असतोच. रात्री प्रवासी संख्या अत्यंत कमी आणि काही गुन्हेगारी घटनांमुळे फेऱ्या रद्द केल्याचे लटके कारण रेल्वे प्रशासन देते. गुन्हेगारांचा वावर असेल तर अशावेळी रेल्वे पोलिस काय झोपा काढतात का?, असा प्रश्‍न उपस्थित होतो. पंचक्रोशीत उद्योगधंद्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने दोन्ही शहरांतून रात्री ये-जा करणाऱ्यांची संख्याही वाढतेच आहे. अशा परिस्थितीत फक्त लोकल सेवाच थंड पडली आहे, हे मनाला पटत नाही. गुंडांचाच बंदोबस्त करायचाच तर जादा कुमक मदतीला घेऊन रात्री छापे टाका. प्रवाशांना त्रास देणाऱ्यांना बेड्या ठोका; पण फेऱ्या बंद करू नका.

खासदार, आमदार लक्ष देतील?
आज लोणावळा ते पुणे स्टेशन दरम्यान १७ स्टेशन आहेत. इथे नोकरदार, कामगार, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि पर्यटकांची रोजची वर्दळ असते. लोकलसेवा वेळेत मिळालीच तर आजची एक लाख प्रवाशांची संख्या उद्या दोन लाख होईल. देहूरोड, तळेगाव स्टेशन, वडगाव, कामशेत, लोणावळा या शहरांना आणखी महत्त्व येईल, उलाढालही दुप्पट होईल. तिसरा ट्रॅक सुरू करण्यासाठी सुमारे ९०० कोटींच्या प्रकल्प आराखड्याला मान्यता आहे. त्यातच चौथ्याही टप्प्याचे नियोजन करायचे आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यासाठी तीन वर्षे पाठपुरावा केला, फक्त आता त्याचे काम सुरू होईल तेव्हाच खरे. त्यात आणखी समाधानाची बाब म्हणजे आता चौथ्या टप्प्याचेही नियोजन करण्याचे आदेश निघाले. हे इतके सकारात्मक चित्र असताना लोकलच्या फेऱ्या रद्द करून नकार घंटा बरोबर नाही. ठरल्यानुसार झालेच तर कदाचित दोन वर्षांनी स्वारगेट ते पिंपरी मेट्रो सुरू होईल, पुढे ती निगडीपर्यंतही जाईल; पण लोकल प्रवासाचा दर मेट्रोला नसेल. पीएमपी, लोकल आणि मेट्रो अशी तीनही सेवा या मार्गावर असतील. उद्या त्यांची तुलना होईल त्या वेळी लोकलसेवा लाख पटीने बरी, असे लोक म्हणतील. म्हणूनच लोकलसेवा कमी करू नका, बंद तर करू नकाच नका. उलट सामान्य जनतेसाठी ही मावळची जीवनवाहिनी आणखी भक्कम करा. आताच्या सत्ताधारी खासदार-आमदारांनी मनात आणलेच तर ते सहज करू शकतात. त्यासाठी शुभेच्छा !

Web Title: pimpri news local train