पिंपरीत "बंद'ला संमिश्र प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

पिंपरी - कोरेगाव भीमा येथे सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी पुकारलेल्या महाराष्ट्र "बंद'ला पिंपरी-चिंचवड शहरात काही किरकोळ दगडफेक व तोडफोडीचे प्रकार वगळता संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील बाजारपेठा, मंडई, हॉटेल्स, मॉल, सिनेमागृह दिवसभरासाठी पूर्णत: बंद ठेवण्यात आले. काही अपवाद वगळता अन्य शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली, तर शासकीय, नीमशासकीय कार्यालये, महापालिकेचे व्यवहार सुरळीत सुरू होते. काही ठिकाणी सुरक्षेच्या कारणावरून पिंपरी, चिंचवड आणि भोसरी एमआयडीसीतील काही कंपन्या बंद होत्या. काही नियमित सुरू होत्या. शहरात ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त होता.

पिंपरी - कोरेगाव भीमा येथे सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी पुकारलेल्या महाराष्ट्र "बंद'ला पिंपरी-चिंचवड शहरात काही किरकोळ दगडफेक व तोडफोडीचे प्रकार वगळता संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील बाजारपेठा, मंडई, हॉटेल्स, मॉल, सिनेमागृह दिवसभरासाठी पूर्णत: बंद ठेवण्यात आले. काही अपवाद वगळता अन्य शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली, तर शासकीय, नीमशासकीय कार्यालये, महापालिकेचे व्यवहार सुरळीत सुरू होते. काही ठिकाणी सुरक्षेच्या कारणावरून पिंपरी, चिंचवड आणि भोसरी एमआयडीसीतील काही कंपन्या बंद होत्या. काही नियमित सुरू होत्या. शहरात ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त होता. सकाळी सुरू असलेली पीएमपी बस सेवा दहाच्या सुमारास अचानक बंद केल्याने चाकरमान्यांचे मोठे हाल झाले. 

दुपारी चारपर्यंत शहराच्या सर्व रस्त्यांवर तुरळक खासगी वाहने फिरत होती. पीएमपी, लोकल आणि एसटी सेवा पूर्णत: बंद असल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. रिक्षासेवाही सायंकाळपर्यंत बंद होते. काही समाजकंटकांकडून वाहनांची तोडफोड तर काही दुकानांवर दगडफेक करण्यात आली. पिंपरी रेल्वे स्थानकावर दुपारी रेल रोको आंदोलन करण्यात आले. 

औद्योगिक परिसरात संमिश्र प्रतिसाद 
औद्योगिक परिसरात "बंद'ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. भोसरी, चिंचवड परिसरातील औद्योगिक पट्ट्यात काही उद्योगांचे काम सुरू होते. काही ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव सुटी देण्यात आली होती. "बंद'ची तीव्रता दुपारी वाढत गेली, त्यानंतर या भागातील काही कारखाने बंद करून कामगारांना सोडून देण्यात आले. बसने ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र, अडकून पडावे लागले. "बंद'चा परिणाम पीएमपी आणि लोकलवर झाला. अनेकांना अडकून पडावे लागले. "बंद'ची तीव्रता कमी होईपर्यंत काहींनी कंपनीच्या आवारातच थांबणे पसंत केले. 

पिंपरी-चिंचवडमधील एमआयडीसीच्या परिसरात सात ते आठ हजार लघू आणि मध्यम उद्योग आहेत. 

एसटी प्रवाशांचे हाल 
वल्लभनगर एसटी आगारातून बाहेरगावी जाणाऱ्या सर्व एसटी बस सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आल्या. एसटी बस सेवा बंद झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. विशेषतः शिवनेरी व शिवशाही बससेवा पूर्णपणे ठप्प झाली. सकाळपासून एसटी वाहतूक सुरळीत सुरू होती. मात्र, सकाळी अकरानंतर वाढता तणाव पाहता एसटीच्या फेऱ्या बंद करण्याचा निर्णय घेतला. परिणामी वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. अचानक सेवा बंद झाल्याने प्रवासी स्थानकात अडकून पडले. गाड्या बंद असल्याने काही प्रवाशांनी काढता पाय घेतला. काही प्रवाशांना एसटीची वाट पाहत ताटकळत बसावे लागल्याने तारांबळ उडाली. आगारात दीडशेहून अधिक एसटी उभ्या करण्यात आल्या. बाहेरून येणाऱ्या बसफेऱ्याही रद्द करण्यात आल्या. एसटी बंद असल्यामुळे बस स्थानकावर शुकशुकाट दिसत होता. 

रेल्वे रोखण्याचा प्रयत्न 
पिंपरी रेल्वे स्थानकावर जमावाने रूळावर उतरून रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला. दुपारी तासभर हे आंदोलन सुरू होते. दरम्यान, या वेळेत कोणतीही पुणे-लोणावळा लोकल नसल्याने रेल्वे सेवेवर त्याचा विशेष परिणाम झाला नाही. तथापि, कोईम्बतूर-मुंबई एलटीटी (कुर्ला) एक्‍स्प्रेस ही मुंबईला जाणारी रेल्वे पुणे येथून निघाल्यानंतर पिंपरीला आंदोलन सुरू असल्याने खडकीत थांबविण्यात आली. दुपारी दीड ते अडीच या वेळेत आंदोलकांनी घोषणाबाजी करीत लोहमार्गावर उतरून आंदोलन केले. पोलिसांनी तेथे येऊन नेत्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलक माघारी परतले. 

क्षणचित्रे 
* आंबेडकर गट, दलित संघटना, डावी आघाडी आणि एमआयएम कार्यकर्त्यांचा सहभाग 
* बंदोबस्तासाठी 1400 पोलिस अधिकारी व कर्मचारी तैणात 
* राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या बंदोबस्तात 
* किरकोळ तोडफोडीच्या अनेक घटना 
* पिंपरी मुख्य बाजार, डिलक्‍स चौकात दगडफेक 
* निगडीसह काही उपनगरांतील शैक्षणिक संस्था सुरू 
* पिंपरीकडे येणारी वाहतूक नाशिकफाटा व आकुर्डीतून वळविली 
* ग्रेडसेपरेटरमधील वाहतूक पोलिसांकडून दिवसभरासाठी बंद 
* "बंद'मध्ये व्यापारी, भाजी विक्रेतेही सहभागी 

द्रुतगती मार्ग व महामार्ग स्थिती 
- उर्से व सोमाटणे टोलनाक्‍यावर एक तास रास्ता रोको 
- दिवसभर मार्ग रस्ते ओस 
- वाहनचालकांनी घरी थांबणे केले पसंत 
- स्थानिक वाहने व अत्यावश्‍यक सेवा पुरवणारे वाहने सुरू 
- किरकोळ अपवाद वगळता कोणताही अनुचित प्रकार नाही 
- वाहनांची संख्या कमी असल्याने वाहनांचा फारसा खोळंबा नाही 
- स्थानिक वाहने व अत्यावश्‍यक माल वाहतूक दिवसभर सुरू

Web Title: pimpri news Maharashtra Bandh Koregaon Bhima Clash pimpri bandh