मोशी कचरा डेपो धुमसतोय

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

पिंपरी - महापालिकेच्या मोशी येथील आणि खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या वल्लभनगर येथील कचरा डेपोला गुरुवारी सायंकाळी आग लागली. त्यामुळे दोन्ही डेपोंच्या परिसरातील नागरिकांना धुराचा त्रास होत आहे. मोशी डेपोची आग शुक्रवारी सायंकाळपर्यंतही धुमसतच होती.

पिंपरी - महापालिकेच्या मोशी येथील आणि खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या वल्लभनगर येथील कचरा डेपोला गुरुवारी सायंकाळी आग लागली. त्यामुळे दोन्ही डेपोंच्या परिसरातील नागरिकांना धुराचा त्रास होत आहे. मोशी डेपोची आग शुक्रवारी सायंकाळपर्यंतही धुमसतच होती.

गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सॅनिटरी लॅण्डफील टप्पा एकमध्ये आग लागल्याचे कचरा डेपोतील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी पावणेआठ वाजता महापालिकेच्या अग्निशामक दलास कळविले. त्यानंतर भोसरी अग्निशामक केंद्रातील एक बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र, आगीचे स्वरूप पाहून आणखी बंब मागविले. महापालिकेचे सहा, एमआयडीसी, टाटा मोटर्स व पुणे महापालिकेचा प्रत्येकी एक असे नऊ बंब घटनास्थळी दाखल झाले. खासगी टॅंकरचीही मदत घेतली. घटनास्थळी महापौर नितीन काळजे, आयुक्‍त श्रावण हर्डीकर, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी आणि मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे यांनी भेट दिली.

आग शमविण्यात अडचणी
- आगीच्या ठिकाणापर्यंत पोचण्यासाठी एक वाहन जाईल एवढाच रस्ता
- विद्युत दिवे नसल्याने नेमका मार्ग सापडत नव्हता
- वाऱ्यामुळे आग झपाट्याने पसरत होती
- अवघ्या दहा मिनिटांत अग्निशामकच्या बंबामधील पाणी संपत होते
- पाणी संपलेला बंब मागे घेतल्यानंतरच दुसरा बंब घटनास्थळी नेता येत होता, तोपर्यंत आग इतर ठिकाणी पसरत होती 

आग पसरण्याचे कारण
कचऱ्याखालून मिथेन वायू बाहेर पडत आहे. तो ज्वलनशील आहे. तसेच, कचऱ्यामध्ये प्लॅस्टिक व थर्माकोलचा समावेश आहे. त्यामुळे आग झपाट्याने पसरली.
 
मोशी कचरा डेपोच्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी खासगी कंपन्या व पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलाची मदत घेतली आहे. आग पुन्हा लागू नये, यासाठी दक्षता घेण्याचे आदेश पर्यावरण विभागाला दिले आहेत.
- नितीन काळजे, महापौर 

- धुमसणाऱ्या ठिकाणी माती आणि पाणी पसरण्याचे काम प्रगतिपथावर आहे. उन्हाळा व वाढते तापमान लक्षात घेऊन यापुढे अशी आग लागू नये, यासाठी आवश्‍यक दक्षता व खबरदारी घेतली जाईल.
- श्रावण हर्डीकर, आयुक्‍त

- मोशी कचरा डेपोस आमचा विरोध आहे. प्रभागातच कचरा जिरवावा, अशी मागणी आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आग लागली आहे. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या ठेकेदाराला अनुभव नाही. ठेका देताना गैरव्यवहार झालेला आहे. 
- खासदार शिवाजीराव आढळराव पाटील

मोशी डेपोला गुरुवारी सायंकाळी आग लागली नसून एक- दोन दिवसांपूर्वी लागली असावी. एका तासात आग एवढ्या लवकर पसरणे शक्‍यच नाही. सहा वर्षांपूर्वीही कचरा डेपोला आग लागली होती.
- किरण गावडे, मुख्य अग्निशामक अधिकारी

खडकी बोर्डाच्या डेपोलाही आग
खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाचा कचरा डेपो वल्लभनगर येथे आहे. या कचरा डेपोलाही गुरुवारी (ता. २९) सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. दोन तासांनी म्हणजे पावणे सात वाजता आग आटोक्‍यात आली. शुक्रवारीही तिथे आग लागली होती.

पाण्यासाठी विहिरीचा आधार
अग्निशामक दलाच्या बंबांनी पाण्यासाठी सुमारे ४० फेऱ्या मुख्यालयात मारल्या. यामुळे मुख्यालयातील पाणी संपले. मोशी कचरा केंद्राजवळील विहिरीवरून टॅंकरद्वारे पाणी घेऊन आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते.

दृष्टिक्षेपात मोशी डेपो
८१ एकर एकूण क्षेत्र
८०० टन रोजचे संकलन

नागरिक म्हणतात...
रात्री दुर्गंधी अधिक असते. झोपणेही अवघड होऊन बसते. आगीमुळे धूर घरात साचल्याने डोळ्यांची जळजळ आणि श्‍वसनाचे आजार वाढले आहेत.
- शंकरराव ढेकळे, गंधर्वनगरी

दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. किड्यांचा त्रास अधिक होतो. पालिका केवळ रस्ते स्वच्छ करते, सोसायटी परिसरातील कचऱ्याकडे दुर्लक्ष करते.
- लता पाटील, गंधर्वनगरी

दुर्गंधीमुळे दारे-खिडक्‍या बंद करूनच जेवण करावे लागत आहे. त्यामुळे डोकेदुखीचा त्रास वाढला आहे. 
- कैलास लांडगे, संतनगर

कचरा गाड्या रस्त्याने जाताना कचराही रस्त्यावर पडत असल्याने माश्‍या व डासांचा त्रास होत आहे. डेपो परिसरात कीटकनाशकाची फवारणी केली जात नाही.
- अनिता गायकवाड, आदर्शनगर

परिसरात उग्र दुर्गंधी पसरलेली असते. सकाळी आणि संध्याकाळी त्याची तीव्रता अधिक असते. हा कचरा डेपो इतरत्र हलविणे गरजेचे आहे. 
- मारुती गायकवाड, पेठ क्रमांक ४

Web Title: pimpri news moshi garbage depo fire