घट, गरब्याची उत्सवी तयारी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

पिंपरी - गुरुवारपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील वातावरण उत्सवमय झाले आहे. घराघरात घट बसविण्याची तसेच गरब्याची जय्यत झाली असून, बाजारपेठांमध्ये साहित्य खरेदीसाठी महिलांची लगबग सुरू आहे. 

पिंपरी - गुरुवारपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील वातावरण उत्सवमय झाले आहे. घराघरात घट बसविण्याची तसेच गरब्याची जय्यत झाली असून, बाजारपेठांमध्ये साहित्य खरेदीसाठी महिलांची लगबग सुरू आहे. 

नवरात्रोत्सवात भक्ती, शक्ती, संयम यांचा संगम अनुभवयास मिळतो. सार्वजनिक मंडळे आणि घरांमध्ये मोठ्या भक्तिभावाने घटाची स्थापना करतात. त्यानंतर नऊ दिवसांच्या या उत्सवाला सुरवात होते. उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून ते नवव्या दिवसापर्यंत देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. तर घटाच्या माध्यमातून देवीचा जागर सुरू होतो. त्यासाठी आकर्षक सजावट केली जाते. घटस्थापनेसाठी काळ्या रंगाच्या मातीच्या घटाचा वापर केला जातो. अलीकडे मातीच्या नक्षीच्या घटांचाही वापर केला जातो. या घटात नऊ प्रकारची कडधान्ये टाकली जात असल्याने या कडधान्यांची पाकिटेही बाजारात उपलब्ध आहेत. त्यांच्या किमती पाच रुपयांपासून वीस रुपयांपर्यंत आहेत. त्याव्यतिरिक्तही आसने, वस्त्रे, टोपली, दिवे, माती, फुले, धूप आणि तत्सम पूजा साहित्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत आहे. यंदा घटांच्या किमती 20 ते 50 रुपयांपर्यंत आहे, तर टोपलीची किमती 40 पासून शंभर रुपयांपर्यंत आहेत. 

दांडियाची रेलचेल  
रास गरबा आणि दांडियामुळे तरुणवर्गाला नवरात्रोत्सवाचे विशेष आकर्षण असल्याने दांडिया खरेदी करण्यासाठी तरुणांची लगबग सुरू झाल्याचे चित्र बाजारात पाहायला मिळत आहे. बाजारात विविध प्रकारच्या दांडिया दाखल झाल्या आहेत. यात लाकडी, मेटल, लाइटवाली, ऍक्रेलिकपासून तयार केलेल्या दांडिया, बांधणी टिपरी, चुनरी दांडिया, डिस्को टिपरी, बेअरिंगवाली दांडिया यांचा समावेश आहे. विविध रंगांच्या लेस, डायमंड, कुंदन, गोंडे, आरशांनी आकर्षक सजावट केलेल्या लाकडी दांडिया मिळत आहेत. बाजारात खास लाइटिंगवाल्या दांडिया दाखल झाल्या आहेत. या दांडियांची किंमत दहा रुपयांपासून 120 रुपयांपर्यंत आहेत. यात बांधणी टिपरी लहान आकार 16 रुपये, मोठा आकार 25 रुपये, डिस्को दांडिया 35 रुपये, ऍक्रेलिक दांडिया 25 रुपये, बेअरिंगवाली दांडिया 55 रुपये, चुनरी दांडिया 21 रुपये, तीनरंगी दांडिया 20 रुपये, लाकडी-मेटल कोटिंग दांडिया 60 ते 80 रुपये, त्याचप्रमाणे लाइटवाली दांडिया 120 रुपये जोडी अशा किमतीत उपलब्ध आहेत. त्याव्यतिरिक्तही गरब्याचे विविधरंगी आणि आकर्षक पोषाखही नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. 

Web Title: pimpri news Navratri garba