राष्ट्रवादीच्या मोर्चाला ‘खो’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

पिंपरी - सत्ताधारी भाजपकडून रिंगरोडमधील घरे नियमित करण्याबाबत कोणतेही ठोस आश्‍वासन मिळत नसून दुसरीकडे रिंगरोडच्या प्रश्‍नावर आक्रमक होत राष्ट्रवादीने गुरुवारी (ता. ९) मोर्चाचे आयोजन केले आहे; मात्र राजकीय पक्षांच्या मोर्चात सहभागी न होण्याचा निर्णय घर बचाव संघर्ष समितीने घेतला आहे. यामुळे या मोर्चाला कितपत यश मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पिंपरी - सत्ताधारी भाजपकडून रिंगरोडमधील घरे नियमित करण्याबाबत कोणतेही ठोस आश्‍वासन मिळत नसून दुसरीकडे रिंगरोडच्या प्रश्‍नावर आक्रमक होत राष्ट्रवादीने गुरुवारी (ता. ९) मोर्चाचे आयोजन केले आहे; मात्र राजकीय पक्षांच्या मोर्चात सहभागी न होण्याचा निर्णय घर बचाव संघर्ष समितीने घेतला आहे. यामुळे या मोर्चाला कितपत यश मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता येऊन आठ महिन्यांहून अधिक काळ झाला. या काळात पारदर्शक कारभाराचा नारा देणाऱ्या भाजपने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू केला आहे, असा आरोप करत रिंगरोडसह शहरातील विविध प्रश्‍नांबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पालिकेवर ‘जवाब दो’ मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे व युवकचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी दिली. या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील करणार आहेत. चिंचवड येथील शनी मंदिरापासून गुरुवारी सकाळी दहा वाजता मोर्चाला सुरवात होईल. सिटी मॉलमार्गे हा मोर्चा पालिकेवर धडकणार आहे. विविध प्रलंबित प्रश्‍नांचे निवेदन पालिका आयुक्तांना देण्यात येणार आहे. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत होईल. 

रिंगरोडव्यतिरिक्त कचरा, मुबलक पाणी, मेट्रो निगडीपर्यंत नेणे, बीआरटीएसचे सर्व मार्ग सुरू करणे, शास्तीकर, अनधिकृत बांधकामांचा प्रश्‍न प्रलंबित आहे. विविध विकासकामांबाबत महापालिकेला जाब विचारण्यात येणार आहे. पारदर्शक कारभाराच्या नावाखाली ’खाबूगिरी’ सुरू असल्याचा आरोपही राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला.

घरे वाचविण्यासाठी प्राधान्य
राष्ट्रवादीच्या मोर्चाबाबत घर बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘घर बचाव संघर्ष समिती ही राजकीय पक्षविरहित आहे. आम्हाला आमची घरे वाचवायची आहेत. यामुळे राजकीय पक्षांच्या मोर्चामध्ये सहभागी होणार नाही, अशी आमची ठाम भूमिका आहे. मात्र वैयक्तिकरीत्या ज्यांना मोर्चाला जायचे आहे ते जाऊ शकतात.’’ राष्ट्रवादी काँग्रेसने रिंगरोडच्या प्रश्‍नावर आक्रमक भूमिका घेत ठिकठिकाणी मोर्चाचे फलक लावले आहेत. गेल्या महिन्यातही महागाई व इतर प्रश्‍नांबाबत राष्ट्रवादीने आक्रोश मोर्चा काढला होता. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला होता; मात्र घर बचाव संघर्ष समिती मोर्चात सहभागी होणार नसल्याने मोर्चाच्या यशाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: pimpri news NCP PCMC