अकरा अभियंत्यांवर पालिकेची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

पिंपरी - गैरव्यवहारांच्या एकेका प्रकरणात पिंपरी- चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. विठ्ठलमूर्ती खरेदी, सीएनजी गॅस दाहिनी, एचबीओटी मशिन खरेदी प्रकरणात आजवर नऊ अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असतानाच आता विद्युत विभागातील ११ अभियंत्यांवर केबल गैरव्यवहार प्रकरणात कारवाई करण्यात आली. 

पिंपरी - गैरव्यवहारांच्या एकेका प्रकरणात पिंपरी- चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. विठ्ठलमूर्ती खरेदी, सीएनजी गॅस दाहिनी, एचबीओटी मशिन खरेदी प्रकरणात आजवर नऊ अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असतानाच आता विद्युत विभागातील ११ अभियंत्यांवर केबल गैरव्यवहार प्रकरणात कारवाई करण्यात आली. 

महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय हद्दीतील आणि वाकड परिसरातील रस्ता रुंदीकरण व शहर सुशोभीकरणात अडथळा ठरणाऱ्या उच्च व लघुदाब वीजवाहिन्या हलविण्याच्या कामात अनियमितता केल्याप्रकरणी या अभियंत्यांवर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कारवाई केली. यामध्ये दोन निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे.महापालिका विद्युत विभागातील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता मिलिंद कपिले, विकास अभियंता अशोक सुरगुडे यांच्यासह कार्यकारी अभियंता संदेश चव्हाण, उपअभियंता एकनाथ पाटील, माणिक चव्हाण, नितीन देशमुख, कनिष्ठ अभियंता प्रकाश कातोरे, दमयंती पवार, महेश कावळे, अकबर शेख, अशोक अडसुळे अशी कारवाई केलेल्या ११ अभियंत्यांची नावे आहेत.

‘क’ क्षेत्रीय हद्दीतील, तसेच वाकड परिसरातील रस्ता रुंदीकरणात आणि शहर सुशोभीकरणात अडथळा ठरणाऱ्या उच्च व लघुदाब वीजवाहिन्या हलविण्याचे काम घेतलेल्या ठेकेदाराने केबल गायब केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली होती. त्यानंतर काही अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली. त्यानुसार चौकशी करून प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांकडून पालिकेने झालेले नुकसान वसूल केले होते.

वेतनवाढ रोखणार
आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी निवृत्त विकास अभियंता अशोक सुरगुडे यांच्यावर ठपका ठेवला आहे. केबल गायब होण्याच्या प्रकरणात सुरगुडे यांनी निष्काळजीपणा आणि कर्तव्यात कसूर केल्याने त्यांच्या सेवा पुस्तकात नोंद करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. मिलिंद कपिले यांच्या निवृत्तिवेतनातील पाच टक्के भाग एक वर्षापर्यंत रोखून ठेवला जाणार आहे. तर, उर्वरित नऊ उपअभियंता व कनिष्ठ अभियंत्यांच्या दोन वेतनवाढी रोखून ठेवण्यात येणार आहेत.

Web Title: pimpri news pcmc engineers