विनापरवाना रस्ते खोदल्यास दंड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

पिंपरी - विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी केलेले खोदकाम त्वरित बुजवावेत, नागरिकांची गैरसोय टाळावी, यासाठी महापालिकेने धोरण आखले आहे. त्यामुळे रस्त्याची विनापरवाना खोदकाम केल्यास खोदाई शुल्काच्या दुप्पट दंड आकारणी केली जाणार आहे. शिवाय सकाळी १० ते सायंकाळी पावणेसहा या वेळेतच खोदकाम करता येणार असून त्यानंतर ते त्वरित बुजवावे लागणार आहे. 

शहरात जलवाहिन्या, सांडपाणी नलिका, वीजवाहिन्या, मोबाईल कंपन्यांच्या वाहिन्या, गॅसवाहिन्या टाकण्याची कामे करण्यासाठी खासगी व्यक्ती, कंपन्या, संस्था व महापालिकेचे प्रत्येक विभाग आपापल्या सोयीनुसार खोदकाम करीत असतात. त्यांच्यातील समन्वयाअभावी वारंवार रस्ते खोदले जातात. मात्र, ते वेळेवर बुजविले जात नाहीत. त्याचा नागरिक व वाहनचालकांना त्रास होतो. त्यातून मार्ग काढण्यासाठी स्वतंत्र धोरण आखण्यात आले आहे. 

असे आहे धोरण
महापालिकेच्या धोरणानुसार सर्व क्षेत्रीय कार्यालये व बीआरटी विभाग यांनी खोदलेले रस्ते पूर्ववत करण्यासाठीच्या खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात करावी. रस्ते खोदाईपोटी मिळालेले शुल्क त्याच क्षेत्रीय कार्यालयास रस्ते दुरुस्तीसाठी द्यावे. सर्व विभागांचे ‘ना हरकत’ दाखले महापालिकेच्या तांत्रिक विभागास प्राप्त झाल्यानंतरच परवानगी मिळेल. विनापरवाना खोदाई करणाऱ्यांकडून खोदाई शुल्काच्या दुप्पट रकमेचा दंड वसूल करावा किंवा गुन्हे दाखल करावेत. खोदकामाच्या ठिकाणी माहिती फलक लावावा. त्यावर संपर्क क्रमांकासह सविस्तर माहिती द्यावी. संबंधित व्यक्ती वा संस्थांनी वाहतूक पोलिसांचे परवानगी पत्र सादर करावे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड, महावितरण, एमआयडीसी, बीएसएनएल यांनाही परवानगी आवश्‍यक असेल.

अधिकाऱ्यांकडून होणार पाहणी
रस्ते खोदाईचे काम सुरू करण्यापूर्वी कनिष्ठ अभियंत्यांना कळवावे. त्यांनी कामाची पाहणी करून छायाचित्रे व चित्रीकरण करून दैनंदिन अहवाल तयार ठेवावा. तातडीच्या कामांसाठी शहर अभियंत्यांच्या परवानगीने केवळ १०० मीटरपर्यंतच रस्त्याची खोदाई करता येईल. त्या पुढील कामांसाठी आयुक्तांची परवानगी आवश्‍यक असेल.

Web Title: pimpri news Penalties on unauthorized roads