पिंपरी रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जुलै 2017

पिंपरी - सुमारे दीड कोटी रुपये खर्चून थिसेनक्रूप कंपनीमार्फत ‘सीएसआर’अंतर्गत पिंपरी रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा बदलला जात आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याची कामे पूर्ण झाली असून, दुसऱ्या टप्प्यातील कामे येत्या चार महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकारे एखाद्या खासगी कंपनीकडून पिंपरी-चिंचवड परिसरात प्रथमच रेल्वे स्थानक विकसित केले जात आहे. 

पिंपरी - सुमारे दीड कोटी रुपये खर्चून थिसेनक्रूप कंपनीमार्फत ‘सीएसआर’अंतर्गत पिंपरी रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा बदलला जात आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याची कामे पूर्ण झाली असून, दुसऱ्या टप्प्यातील कामे येत्या चार महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकारे एखाद्या खासगी कंपनीकडून पिंपरी-चिंचवड परिसरात प्रथमच रेल्वे स्थानक विकसित केले जात आहे. 

पिंपरी रेल्वे स्थानकावर रेल्वे रूळ ओलांडताना अनेक प्रवाशांचा अपघाती मृत्यू होत असल्याने याच स्थानकाजवळील थिसेनक्रूप इंडस्ट्रीजमार्फत तेथील दोन्ही रुळांच्या मधोमध लोखंडी जाळ्या बसविण्याचा प्रस्ताव कंपनीकडून रेल्वे प्रशासनाला पाठविण्यात आला होता. त्यानंतर ‘सीएसआर’ अंतर्गत रेल्वे स्थानकांचेच नूतनीकरण करण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला. त्यानुसार तेथील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. 

कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र नागेशकर म्हणाले, ‘‘नोव्हेंबर २०१६ पासून या स्थानकाचा दोन टप्प्यांत विकास केला जात असून, पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली आहेत. त्यामध्ये छताला पत्रे बसविणे, सीमा भिंत दुरुस्ती, रंगरंगोटी, प्रवाशांच्या सोयीसाठी २० हजार लिटर्सची पाण्याची टाकी बसविणे यासारखी कामे केली आहेत. याखेरीज अंध-अपंग आणि वयोवृद्धांना चढ-उतार करण्यासाठी ‘रेलिंग्ज’ बसविण्यात आली आहेत. महिला आणि पुरुषांसाठी दोन स्वच्छतागृहे बांधण्यात येत असून, त्यातील एका स्वच्छतागृहाचे काम पूर्ण झाले आहे. तर दुसऱ्याचे काम प्रगतिपथावर आहे. या सर्व कामांसाठी रेल्वे प्रशासनाचेही चांगले सहकार्य लाभत आहे. पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक पट्ट्यात या प्रकारे प्रथमच रेल्वे स्थानक विकसित केले जात आहे’’

दुसऱ्या टप्प्यात तेथे एलईडी दिवे, पादचारी पुलासाठी वॉक-वे, लिफ्ट किंवा ‘एक्‍सकलेटर्स’ बसविणे, उद्यान विकसन आणि वृक्षारोपण यासारखी कामे केली जाणार आहेत. उद्यान विकासासाठी स्थानकातील पाण्याचा पुनर्वापर करण्याचे प्रस्तावित आहे. 

पिंपरी रेल्वे स्थानकावर थिसेनक्रूप इंडस्ट्रीजमार्फत विविध सुधारणा केल्या जात आहेत. त्यांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली ही कामे केली जात असून, आमच्याकडून आवश्‍यक सहकार्य केले जात आहे. 
- अधिकारी, पिंपरी रेल्वे स्थानक

लोखंडी जाळ्या प्रस्तावित !
रूळ ओलांडतानाचे अपघात टाळण्यासाठी लोखंडी जाळ्या बसविण्याचे काम प्रस्तावित आहे. परंतु, दोन्ही रेल्वे मार्गातील अंतर कमी आहे. जाळ्या बसविल्यास कदाचित रेल्वेतील प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. या कारणास्तव या प्रस्तावाला अजून तांत्रिकदृष्ट्या मान्यता मिळालेली नाही. 

Web Title: pimpri news pimpri railway station