पूर्व-पश्‍चिम भागासाठी बसगाड्यांचा अभाव

ज्ञानेश्‍वर बिजले
सोमवार, 26 जून 2017

पिंपरी - पिंपरी-चिंचवड परिसरातून महामार्गाने पुण्याकडे जाण्यासाठी म्हणजेच शहराच्या दक्षिण-उत्तर मार्गावर जादा बसगाड्या आहेत. तुलनेने पूर्व-पश्‍चिम भाग जोडण्यासाठी बसगाड्यांची संख्या अपुरी असल्याची प्रवासी व लोकप्रतिनिधींची तक्रार आहे. विशेषतः विद्यार्थी, कामगार आणि महिलांसाठी त्यांच्या वेळेनुसार आणि पुरेशा बस असाव्यात, अशी अपेक्षा आहे.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड परिसरातून महामार्गाने पुण्याकडे जाण्यासाठी म्हणजेच शहराच्या दक्षिण-उत्तर मार्गावर जादा बसगाड्या आहेत. तुलनेने पूर्व-पश्‍चिम भाग जोडण्यासाठी बसगाड्यांची संख्या अपुरी असल्याची प्रवासी व लोकप्रतिनिधींची तक्रार आहे. विशेषतः विद्यार्थी, कामगार आणि महिलांसाठी त्यांच्या वेळेनुसार आणि पुरेशा बस असाव्यात, अशी अपेक्षा आहे.

पुणे-मुंबई महामार्ग हा शहराच्या मध्यातून जातो. त्या मार्गावरून पुण्याकडे जाण्यासाठी गाड्या असल्या, तरी पिंपरी-चिंचवडच्या अंतर्गत भागात पुरेशा गाड्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना किमान दोन वेळा बस बदलावी लागते किंवा शेअर रिक्षातून महामार्गापर्यंत यावे लागते. भोसरीकडून पिंपरीच्या आतील भागात, तसेच चिंचवड परिसरातून महामार्ग ओलांडून महापालिकेच्या हद्दीतील दुसऱ्या भागात जाण्यासाठी गाड्या नाहीत, अशी प्रवाशांची तक्रार आहे. शेअर रिक्षातून प्रवासी दाटीवाटीने जात असतील, तर त्या भागात पीएमपीला प्रवासी मिळत नाहीत, हे म्हणणेच चुकीचे ठरते, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

महिलांसाठी स्वतंत्र बस हवी
महिलांसाठी स्वतंत्र गाडीची मागणी करण्यात येत आहे. तीच स्थिती विद्यार्थ्यांसाठीच्या गाड्यांची. अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी जातात. त्यांच्यासाठी सकाळी अथवा त्यांच्या महाविद्यालयाच्या वेळेपूर्वी गाड्या हव्या आहेत. पिंपरी-चिंचवड भागातही काही अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. त्यांनाही बससेवा हवी आहे. मात्र, तशा गाड्या अथवा नवीन बसमार्ग सुरू केले जात नसल्याची तक्रार आहे. लोकप्रतिनिधींनी त्या बाबत विचारणा केल्यानंतरही पीएमपी प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही. महिलांना विशेषतः महाविद्यालयीन युवतींना पीएमपी बसमधून प्रवास करताना अनेकदा गर्दीच्या वेळी धक्काबुक्कीला सामोरे जावे लागते. त्यामुळे काही मार्गांवर महिलांसाठी स्वतंत्र बसगाड्या सुरू करण्याची मागणी महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत केली आहे. या गाड्यांना तोटा झाल्यास तो भरून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. पुण्यातील अनेक महाविद्यालयांत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थिनींना त्यांच्या महाविद्यालयांच्या वेळांनुसार स्वतंत्र बससेवा सुरू केल्यास त्याला प्रतिसादही चांगला मिळेल, असे लोकप्रतिनिधींनी पीएमपी प्रशासनाला सुचविले आहे. 

कामगारांचाही विचार व्हावा
पिंपरी-चिंचवड, भोसरी येथील औद्योगिक वसाहतीत तसेच चाकण आणि शहरालगतच्या भागात अनेक ठिकाणी लघुउद्योग आहेत. तेथे कामगारांच्या वेळेनुसार बससेवा सुरू करावी. सध्या सकाळी मुख्य रस्त्यावरून औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या रस्त्यांवर कामगारांचे लोंढेच्या लोंढे चालत जाताना दिसतात. एमआयडीसी परिसरात कामगारांच्या वेळापत्रकानुसार त्या-त्या वेळा अंतर्गत भागात शटल बससेवा सुरू केल्यास त्याचा कामगारांना उपयोग होईल, तसेच पीएमपीचे उत्पन्न वाढेल, असे मत कामगार प्रतिनिधींनी व्यक्त केले.
(क्रमश:)

Web Title: pimpri news pmp bus