पोलिसांचे ‘ऑल आउट’ अभियान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी ‘ऑल आउट’ अभियान सुरू केले आहे. पहिल्याच दिवशी शहरातील नऊ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील ३३४ सराईत गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला. गुरुवारी (ता. २८) रात्री नऊ ते बारा असा तीन तासांच्या कारवाईत ३८९ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यात २२ संशयितही आहेत. कारवाईत ५० अधिकारी आणि ४०० कर्मचारी सहभागी झाले होते.

परिमंडळ तीनमधील निगडी, पिंपरी, चिंचवड, एमआयडीसी, भोसरी, सांगवी, वाकड, हिंजवडी आणि चतुःशृंगी या पोलिस ठाण्यांत ही मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये ३१ तडीपार गुंडांना चेक केले. त्यापैकी एक जण आढळून आला असून, त्याच्यावर तडीपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. गुन्हेगारी स्वरूपाच्या ४४ सराइतांपैकी १५ जण पोलिसांच्या हाती लागले. माहीतगार १५२ गुन्हेगारांपैकी ५० जण मिळून आले. रेकॉर्डवरील व इतर ५७ गुन्हेगारांपैकी २० जणांवर कारवाई करण्यात आली. वॉरंट बजावण्यात आलेल्या २९ आरोपींपैकी दोन जणांना अटक करण्यात आली. 

रेकॉर्डवरील आणि फरारी गुन्हेगारांचा शोध घेत मैदाने आणि मोकळ्या जागेत विनाकारण जमाव करून थांबणाऱ्या मुलांच्या टोळ्या, वेगात गाडी चालणाऱ्यांना तपासण्यात आले. मोहिमेसाठी शहरातील ठराविक परिसर निश्‍चित केला होता. 

आगामी काळात होणारे पालखीचे आगमन आणि विविध सण या पार्श्‍वभूमीवर पोलिसांकडून ‘ऑल आउट’ हे अभियान राबविण्यात आले. गुन्हेगारांवर वचक राहावा, हा या कारवाई मागील हेतू आहे. शहराच्या इतर भागातही कोणत्याही वेळी अशी कारवाई करण्यात येईल.
- गणेश शिंदे, पोलिस उपायुक्‍त, परिमंडळ तीन

Web Title: pimpri news Police All Out campaign