कानपिचक्‍या अन्‌ स्टंटबाजी

मिलिंद वैद्य
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी झाला. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या कल्पनेनुसार भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृहात इलेक्‍ट्रॉनिक कळ दाबून सर्व कार्यक्रमांचा प्रारंभ त्यांनी केला; परंतु श्रेयवादाच्या हट्टातून राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपळे सौदागर येथील नटसम्राट निळूभाऊ फुले नाट्यगृहाच्या उद्‌घाटनाची स्टंटबाजी करून रडीचा डाव खेळला... तर इकडे महापालिकेचे पैसे वाचविल्याचा दावा करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे कान धरून मुख्यमंत्र्यांनी आणखी पारदर्शक कारभार करण्याच्या कानपिचक्‍या दिल्या...

पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकल्यानंतर गेल्या सहा महिन्यांत मुख्यमंत्र्यांनी शहरासाठी वेळ दिला नव्हता; पण विकासकामांचे निमित्त साधून गेल्या शनिवारी त्यांनी पहिल्यांदा भेट दिली. पिंपरी-चिंचवड शहर पुण्यापेक्षा झपाट्याने विकसित होत आहे. येथे विकासाला आणखी मोठा वाव आहे. शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. शहरातील रस्ते, तीनमजली उड्डाण पूल, ग्रेडसेपरेटर मेट्रो, स्वतंत्र पोलिस आयुक्तालय याचा त्यांनी उल्लेख केला. 

वाचवलेला निधी कोणता?
राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर असताना वाढीव खर्चाचा बोजा महापालिकेवर पडत असे. त्याला कात्री लावत गेल्या सहा महिन्यांत महापालिकेने अडीचशे ते तीनशे कोटी रुपये वाचविल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला; मात्र हे तीनशे कोटी रुपये कशात वाचविले याचा खुलासा ना मुख्यमंत्र्यांनी केला, ना महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी. एवढी रक्कम खरंच वाचविली असेल तर, आयुक्तांसह सर्व पदाधिकाऱ्यांचे खरोखर अभिनंदन केले  पाहिजे. एक बाब मात्र नक्की की, भोसरीतील अंकुशराव लांडगे सभागृहातून ई-उद्‌घाटनाची संकल्पना राबवून पालिकेने चार ते पाच लाख रुपये निश्‍चित वाचविले. त्यालाही मुख्यमंत्री स्वत: कारणीभूत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार या शहरातही मुख्यमंत्र्यांनी ई-उद्‌घाटनाचा नवा पायंडा पाडला; पण ही बचत म्हणजे समंदर मे खसखस नाहीतर प्रत्येक भूमिपूजन, उद्‌घाटनाच्या ठिकाणी चार-पाच लाख रुपयांचा चुराडा नक्कीच झाला असता. नव्या उपक्रमाचा आग्रह यापुढे महापालिकेनेच धरायला हवा. 
 
मुख्यमंत्र्यांच्या कानपिचक्‍या
मुख्यमंत्र्यांनी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांना महापालिकेत यापेक्षाही अधिक पारदर्शी कारभार करण्याच्या कानपिचक्‍या दिल्या. खरं तर त्यांनी लांडगे सभागृहात येताना बैलगाडीचा वापर केला. बैलांची वेसण (कासरा) स्वत:च्या हातात घेतली; पण महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची वेसणही त्यांनी ओढायला हवी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्याबाबत मुख्यमंत्री काही बोलले नसले, तरी आमदारद्वयांना पारदर्शक कारभाराचा दिलेला सल्ला म्हणजे ‘समझनेवालोंको इशारा कांफी है!’ भाजपला सत्तेवर येऊन सहा महिने झाले; पण अजून भरीव कामगिरी दाखविता आलेली नाही. त्या अर्थाने कारभार आणखी गतिमान व पारदर्शी करण्याची मुख्यमंत्र्यांची अपेक्षा आहे.

नाराजीवर उपाय नाही
जुन्या कार्यकर्त्यांत असलेली नाराजी दूर करण्यासाठी आयोजित केलेली कोअर कमिटीची बैठक ऐनवेळी रद्द केली. मुख्यमंत्र्यांना तेवढा वेळ नव्हता. आता ही बैठक मुंबईत येत्या १७ तारखेला होणार आहे. त्या वेळी जुन्या कार्यकर्त्यांच्या नाराजीवर उपाय सुचविला जाण्याची शक्‍यता आहे. शिवाय ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संघ परिवाराची पुण्यात (मोतीबागेत) बैठक होणार आहे. त्यासाठी केंद्रीय रस्तेविकासमंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीच्या वेळी भाजपच्या स्थानिक मुद्यांवर चर्चा अपेक्षित आहे. 

राष्ट्रवादीची स्टंटबाजी
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळूभाऊ फुले नाट्यगृहाचे उद्‌घाटन करण्यात आले. हे नाट्यगृह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात मंजूर झाले. त्याचे कामही त्याच काळात सुरू झाले. त्यामुळे आपला हक्क दाखवत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दुपारीच नाट्यगृहस्थळी जाऊन उद्‌घाटनाचा बार उडवून दिला. खरं तर ही स्टंटबाजीच आहे. सत्ताधाऱ्यांनी नाट्यगृहाचे अर्धवट काम पूर्ण करून उद्‌घाटनासाठी मुख्यमंत्र्यांना बोलावले असताना राष्ट्रवादीने परिपक्वता दाखवायला हवी होती. उद्‌घाटन पत्रिकेवर राष्ट्रवादीच्या नेत्यांसह महापालिकेतील विरोधी पक्षनेते योगेश बहल यांचेही नाव होते. या कार्यक्रमाला हजेरी लावून त्यांना खिलाडूपणा दाखविता आला असता. या कार्यक्रमाला गैरहजेरी लावून त्यांनी ही संधी मात्र गमावली. दस्तुरखुद्द निळू फुले यांच्या कन्या उद्‌घाटनासाठी उपस्थित होत्या. त्यांच्या हजेरीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी परिपक्वता दाखविण्याची गरज होती. विरोधी पक्ष म्हणून सत्ताधाऱ्यांवर जो अंकुश असायला हवा तो अजूनही दिसत नाही आणि नुसत्या स्टंटबाजीने ते शक्‍यही नाही, याची खूणगाठ राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बांधायला हवी.

Web Title: pimpri news politics PCMC NCP devendra fadnavis