प्राधिकरणातील भूखंडांना 'डिमांड'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 मार्च 2018

पिंपरी - नवनगर विकास प्राधिकरणाच्या निवासी भूखंड सोडतीला मोठा प्रतिसाद मिळाला. ३८ भूखंडांपैकी पहिल्या टप्प्यात विविध पेठांमधील २३ भूखंडांसाठी तब्बल ७१९ इच्छुकांनी लिलावात भाग घेतला. त्यांच्या अर्जांची छाननी शुक्रवारी सुरू झाली. मात्र, कोणी कोणत्या भूखंडासाठी किती रक्कम भरली याची माहिती मंगळवारी (ता. २१) कळणार आहे.

पिंपरी - नवनगर विकास प्राधिकरणाच्या निवासी भूखंड सोडतीला मोठा प्रतिसाद मिळाला. ३८ भूखंडांपैकी पहिल्या टप्प्यात विविध पेठांमधील २३ भूखंडांसाठी तब्बल ७१९ इच्छुकांनी लिलावात भाग घेतला. त्यांच्या अर्जांची छाननी शुक्रवारी सुरू झाली. मात्र, कोणी कोणत्या भूखंडासाठी किती रक्कम भरली याची माहिती मंगळवारी (ता. २१) कळणार आहे.

प्राधिकरणाने २०११ नंतर आताच शिल्लक निवासी भूखंडाचा लिलाव आयोजित केला आहे. याबाबत प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके ‘सकाळ’शी बोलताना म्हणाले, ‘‘प्राधिकरणासाठी जमिनी दिलेल्या, मात्र, पुरेसा मोबदला न मिळालेल्या शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. परंतु, पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध नसल्याने प्राधिकरणाने सरकारकडे चिखली येथील गायरान जमिनीचा प्रस्ताव दिलेला आहे. प्राधिकरणाकडे सध्या दोनशे हेक्‍टर जागा विकासासाठी उपलब्ध आहे. त्यातीलच काही अविकसित निवासी भूखंड प्राधिकरणाने लिलावाद्वारे ९९ वर्षांच्या भाडेकराराने देण्याचा निर्णय घेतला आहे. या भूखंडांसाठी साडेबारा टक्‍क्‍यातील पात्र शेतकरी आग्रही होते. परंतु, तांत्रिक कारणांमुळे प्राधिकरणाने असमर्थता दर्शविली होती.

आरक्षणाच्या भूखंडांच्या मुद्यावरून निवासी भूखंड देण्यास न्यायालयानेही स्थगिती दिली होती. ती उठविल्यानंतर सुमारे दीड वर्षाने प्राधिकरणाने लिलाव आयोजित केले आहेत. यासाठी काही भूखंड मागास घटकांसाठी राखीव आहेत.

पहिल्या टप्प्यात लिलाव
पेठ १, २, ४, १८, १९, २५ व २७ अ मधील २३ आणि पेठ १८ मधील १४ भूखंडांचा लिलाव होणार आहे. प्लॉट क्रमांक ६८६ साठी सर्वाधिक ७२ इच्छुकांनी आणि प्रभाग एक मधील ३६८ क्रमांकाच्या भूखंडाला अवघ्या दोन जणांनी लिलाव अर्ज (बीड फॉर्म) भरले आहेत. पहिल्या टप्प्याचा लिलाव २१ मार्चला जाहीर होईल. त्यानंतर पुढच्या टप्प्याचा लिलाव जाहीर केला जाईल, असे प्राधिकरणाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत पाटील यांनी सांगितले.

रेडीरेकनरनुसार लिलावातील सर्व ३८ भूखंडांची मूळ किंमत सुमारे २२ कोटी आहे. मात्र, सध्याचा बाजारभाव पाहता लिलावात सहभागी झालेल्यांनी तिप्पट, चौपट दराने मागणी केली आहे. यातून चाळीस ते पन्नास कोटींच्या आसपास महसूल मिळेल अशी अपेक्षा आहे.
- सतीशकुमार खडके, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राधिकरण

Web Title: pimpri news pradhikaran land demand