स्नेहसंमेलनांचा खर्च आवरा हो...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

पिंपरी - जूनपासून शालेय वर्ष सुरू होते आणि शालेय कार्यक्रम साजरे होता होता दिवाळीच्या सुटीनंतर वेध लागतात ते वार्षिक स्नेहसंमेलनाचे. मात्र, गेल्या काही वर्षांत स्नेहसंमेलनात अनेक बदल होऊन त्याला भपकेबाज स्वरूप आले आहे. पूर्वी शाळेच्या मैदानावर होणारी ही संमेलने आता मोठमोठ्या सुसज्ज सभागृहांमध्ये होऊ लागली आहेत. मागील वर्षी तर एका शाळेचे स्नेहसंमेलन थेट बालेवाडी स्टेडियममध्ये झाल्याचे काही पालकांनी सांगितले. 

पिंपरी - जूनपासून शालेय वर्ष सुरू होते आणि शालेय कार्यक्रम साजरे होता होता दिवाळीच्या सुटीनंतर वेध लागतात ते वार्षिक स्नेहसंमेलनाचे. मात्र, गेल्या काही वर्षांत स्नेहसंमेलनात अनेक बदल होऊन त्याला भपकेबाज स्वरूप आले आहे. पूर्वी शाळेच्या मैदानावर होणारी ही संमेलने आता मोठमोठ्या सुसज्ज सभागृहांमध्ये होऊ लागली आहेत. मागील वर्षी तर एका शाळेचे स्नेहसंमेलन थेट बालेवाडी स्टेडियममध्ये झाल्याचे काही पालकांनी सांगितले. 

सभागृह, स्टेडियमपुरते ठीक, पण आपल्याच पाल्याचा कलाविष्कार पाहण्यासाठी पालकांना तिकीट काढण्यास भाग पाडले जाऊ लागले आहे. हा तिकीटदरही अव्वाच्या सव्वा असून त्यावर नियंत्रण आणणे आवश्‍यक असल्याच्या पालकांच्या भावना आहेत. शहरातील एका शाळेने यंदाच्या स्नेहसंमेलनासाठी पालकांकडून प्रतिव्यक्ती ८० रुपये दर आकारला. त्या व्यतिरिक्तही ड्रेपरी, मेकअप साहित्य, पादत्राणांचा खर्चही पालकांच्या माथी मारला आहे. या अतिरिक्त खर्चामुळे पालक हैराण झाले असून ‘स्नेहसंमेलनाचा खर्च आवरा’ अशी त्यांची मागणी आहे. 

भपक्‍याचा आर्थिक बोजा
एखादा व्यावसायिक कार्यक्रम शोभावा अशा प्रकारे भपकेबाजपणावर भर देण्याचा शाळांचा प्रयत्न असतो. पालकांच्या भावनिकतेचा गैरफायदा घेत स्नेहसंमेलनांची आर्थिक गणिते मांडली जातात. पुणे शहरातील एका शाळेने मागील वर्षी वाचनालय विकासाच्या नावाखाली स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून पालकांकडून तब्बल प्रतितिकीट पाचशे रुपये लाटल्याचे उदाहरण एका पालकाने दिले. एवढेच नाही तर, त्याची छायाचित्रे आणि व्हिडिओ सीडी घेण्याची सक्तीही करून त्याचेही वेगळे पैसे घेतले जात असल्याचे फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशनचे उपाध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सांगितले. 

शिक्षकांनाही राबविले जाते
पालकांकडून केवळ पैसे उकळण्यासाठी अनेक शाळा स्पोर्टस डे आणि स्नेहसंमेलनांवर विशेष लक्ष केंद्रित करत असल्याचा दावा पालक संघाने केला. दोन ते तीन महिने अगोदरच संमेलनाचे नियोजन केले जाते. शिक्षणापेक्षाही त्याला महत्त्व दिले जात असून कार्यक्रमांच्या निमित्ताने शाळा राबवून घेत असल्याच्या तक्रारी शिक्षकांनीच केल्याचा अनुभव सहाय यांनी सांगितला. 

रिॲलिटी शोची भुरळ 
दूरचित्रवाणीवरच्या गायन-वादनाच्या ‘रिॲलिटी शो’ कार्यक्रमांमुळे पालकांनाही आपली मुले एखाद्या कलेत पारंगत असावीत, अथवा त्यानेही वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये चमकावे, असे वाटू लागले आहे. त्यामुळे पालकही हे अवास्तव शुल्क देण्यास सहजपणे तयार होतात. मात्र, या कार्यक्रमांमध्ये औपचारिकता येऊन कलाशिक्षणाऐवजी आर्थिक लूटच अधिक होते. 

काय सांगतो कायदा
‘फी रेग्युलेशन ॲक्‍ट २०१५’नुसार ज्याप्रमाणे शालेय प्रवेश शुल्क निश्‍चितीसाठी पालक-शिक्षक संघाची परवानगी घेणे आवश्‍यक आहे, त्याप्रमाणे स्नेहसंमेलनांसारख्या कार्यक्रमाच्या शुल्कासाठीही पालक संघाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, काही मोजक्‍या शाळा कायद्याची अंमलबजावणी करताना दिसतात. उर्वरित मनमानी पद्धतीने स्नेहसंमेलनाचे शुल्क आकारतात.

अधिकाधिक पालकांकडून पैसा उकळण्यासाठी सर्व मुलांना सहभागी करून घेण्याचा शाळांचा अट्टहास असतो. अनेक शाळा तर सहभागी नसलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडूनही सक्तीने शुल्क आकारतात. रंगीत तालमीसाठी गरज नसतानाही ड्रेपरी वापरली जाते व त्याचे वेगळे भाडेही घेतले जाते. ही लूट थांबविण्यासाठी पालकांनी जागरूक होणे आवश्‍यक आहे. 
- ॲड. अनुधा सहाय, कार्यकारिणी सदस्या, पेरेंट्‌स ऑफ प्रायव्हेट स्कूल ऑफ महाराष्ट्र

स्नेहसंमेलने साध्या पद्धतीने साजरी करण्यास शाळेची कोणतीही हरकत नाही. मात्र, ते सुनियोजित, व्यावसायिक स्वरूपाची असावीत, असा पालकांचाच आग्रह असतो. काही शाळा या कार्यक्रमांचे शुल्क प्रवेश शुल्कासोबतच एकत्रित घेतात. त्यामध्ये स्नेहसंमेलन व्यवस्थापन, ड्रेपरी, स्नॅक्‍स, वाहतूक, छायाचित्र-सीडी खर्चाचाही समावेश असतो. आम्हीदेखील याचप्रकारे शुल्क आकारतो.
- प्रियम गुंजाळ, प्राचार्य, शिष्य स्कूल, वाकड

Web Title: pimpri news pune news annual gathering expenditure