सर्व नगरसेवकांना न्याय देण्याचे भाजपचे धोरण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

पिंपरी - भारतीय जनता पक्षाने येत्या चार वर्षांत महापौरपदासह स्थायी समिती, विषय समिती आणि आठ प्रभाग अध्यक्ष व सदस्यांपर्यंत आपल्या सर्व म्हणजे ७७ नगरसेवकांना संधी देण्याचे धोरण निश्‍चित केले आहे. त्यामुळे स्थायी समितीची नव्याने निवड करताना भाजपच्या विद्यमान सर्व दहा स्थायी सदस्यांचे राजीनामे घेऊन त्या ठिकाणी पक्षाच्या अन्य दहा सदस्यांना संधी दिली जाणार असल्याचे समजते.

पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ता हाती घेऊन भाजपला मार्च महिन्यात एक वर्ष पूर्ण होत आहे. पक्षाच्या पालिकेतील पदाधिकाऱ्यांकडून आपल्या कारकिर्दीतील दुसरा अर्थसंकल्प येत्या १५ फेब्रुवारीला मांडला जाईल, त्यानंतर स्थायीचे आठ सदस्य आणि नवा अध्यक्ष निवडला जाणार, अशी चर्चा असतानाच भाजपने आपल्या कोट्यातील स्थायीच्या सर्व विद्यमान सदस्यांचे राजीनामे घेऊन त्या जागी नव्या नगरसेवकांना संधी देण्याचे ठरविल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. या धोरणानुसार महापौरपदासाठी सव्वा वर्ष आणि अन्य समित्या व प्रभागांसाठी एक वर्षाचे रोटेशन ठरविण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

सध्या भाजपचे महापालिकेत ७७ निवडून आलेले व तीन स्वीकृत सदस्य आहेत. शिवाय पाच अपक्ष नगरसेवकांनीही भाजपला पाठिंबा दिला आहे. पक्षाने या सर्व नगरसेवकांना उर्वरित चार वर्षांत कामाची संधी मिळावी, यासाठी वेगवेगळ्या समित्यांवर सदस्य व अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याचे ठरविले आहे. महापौर पदासाठीही प्रत्येकी सव्वा वर्षांचा कालावधी निश्‍चित केला असून, पाच वर्षांत चौघांना महापौर होता येणार आहे, तर स्थायीच्या अध्यक्षांसह १६ सदस्य असतात, त्यापैकी सत्ताधारी भाजपचे दहा सदस्य आहेत. म्हणजे स्थायी समितीवर पाच वर्षांत ५० सदस्यांना संधी मिळू शकते. 

सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न
सहा विषय समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्य तसेच आठ प्रभागांचे अध्यक्ष याप्रमाणे सर्वच ठिकाणी भाजपच्या प्रत्येक नगरसेवकाला ही संधी मिळणार आहे. या माध्यमातून सर्वांनाच न्याय देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

Web Title: pimpri news pune news corporator justice bjp