सरकारी कार्यालयांना अवैध धंद्यांचा विळखा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

पिंपरी - चिंचवड स्टेशन येथील गुलजार बिल्डिंगमध्ये असलेल्या दुकाने निरीक्षक कार्यालय आणि पिंपरी-चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाच्या कार्यालयाला घाणीचे साम्राज्य व अवैध धंद्यांनी विळखा घातल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस व महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे त्याचा नागरिक व अधिकाऱ्यांना त्रास होत आहे. 

पिंपरी - चिंचवड स्टेशन येथील गुलजार बिल्डिंगमध्ये असलेल्या दुकाने निरीक्षक कार्यालय आणि पिंपरी-चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाच्या कार्यालयाला घाणीचे साम्राज्य व अवैध धंद्यांनी विळखा घातल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस व महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे त्याचा नागरिक व अधिकाऱ्यांना त्रास होत आहे. 

दुकाने निरीक्षक कार्यालयात शहरासह मावळ, खेड तालुक्‍यातील व्यावसायिक, नागरिक; तसेच माथाडी कार्यालयात कामगार संघटना, कामगार कामासाठी येतात. मात्र, कार्यालयाच्या इमारतीत तळीरामांनी केलेली घाण, इमारत परिसरात विष्ठा व लघुशंकेमुळे दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे; तसेच इमारतीच्या जिन्याचे लोखंडी पाइपही चोरून नेले आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका आहे.

खुलेआम मटका व मद्यविक्री 
पोलिसांच्या आशीर्वादाने रस्त्यालगत असलेल्या कार्यालयाच्या इमारतीला चिकटूनच मटक्‍याचा अड्डा सुरू असून, अवैध मद्यविक्री जोरात आहे. कार्यालय सुटल्यानंतर तळीरामांची कार्यालयाच्या इमारतीत मैफल भरलेली असते. कार्यालयाच्या एका बाजूला बाटल्यांचा खच साचला आहे; तसेच मटका खेळण्यासाठी येणाऱ्यांची वाहने अस्ताव्यस्त लावलेली असतात. 

परिसरात घाणीचे साम्राज्य 
कार्यालयाच्या इमारतीला चिकटूनच असलेल्या कचराकुंडीच्या आजूबाजूला कचरा टाकलेला असतो. प्रवेशद्वाराजवळच विष्ठा व लघुशंका केल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून साफसफाई होत नाही.

ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा भाग येत आहे आणि ते पोलिस कारवाई करत नसतील तर गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश देणार आहे.
- रवींद्र कदम, पोलिस सहआयुक्त, पुणे

संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांना सांगून तत्काळ साफसफाई करण्याच्या सूचना देणार आहे. तसेच परिसर कायमस्वरूपी स्वच्छ राहील, यासाठी उपाययोजना केल्या जातील. 
- डॉ. प्रवीण आष्टीकर, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Web Title: pimpri news pune news government office illegal business