अनेकांनी केले घरांचे ‘स्पॉट बुकिंग’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

पिंपरी - ‘सकाळ’तर्फे ऑटो क्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटर हॉलमध्ये गृहविषयक भरविण्यात आलेल्या ‘सकाळ-वास्तू’ प्रदर्शनाचा रविवारी (ता.११) समारोप झाला. पिंपरी चिंचवडकरांनी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रदर्शनस्थळी परवडणाऱ्या दरातील गृहप्रकल्पांचे काहींनी ‘स्पॉट बुकिंग’ही केले. 

पिंपरी - ‘सकाळ’तर्फे ऑटो क्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटर हॉलमध्ये गृहविषयक भरविण्यात आलेल्या ‘सकाळ-वास्तू’ प्रदर्शनाचा रविवारी (ता.११) समारोप झाला. पिंपरी चिंचवडकरांनी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रदर्शनस्थळी परवडणाऱ्या दरातील गृहप्रकल्पांचे काहींनी ‘स्पॉट बुकिंग’ही केले. 

‘फास्ट लाइफ स्टाईल’मध्ये सर्वसामान्यांची ‘मनातले घर’ शोधताना दमछाक होऊ नये, या उद्देशाने चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटर हॉलमध्ये गृहविषयक ‘सकाळ - वास्तू’ प्रदर्शन आयोजन केले. पन्नासहून अधिक नामवंत बांधकाम व्यावसायिकांनी सादर केलेले १२५ हून अधिक उत्कृष्ट गृहप्रकल्प खरेदीदारांना पाहता आले. रविवार असल्याने सकाळपासूनच नागरिकांनी प्रदर्शन पाहण्यास गर्दी केली. दिवसभरात फ्लॅट आणि एन. ए. प्लॉटचे स्पॉट बुकिंग प्रदर्शनस्थळी करण्यात आले. या एक्‍स्पोत शहरातील मध्यवर्ती ठिकाणांसह हिंजवडी, वाकड, रावेत, चिखली, चिंचवड, चाकण, मोशी गृहप्रकल्पांचे पर्यायही खरेदीदारांच्या पसंतीस उतरले. अनेक नागरिकांनी ‘स्वप्नातील घर’ साकारले. अनेकांनी कुटुंबासमवेत प्रत्येक स्टॉलला भेट देऊन गृहप्रकल्पांविषयी माहिती जाणून घेतली. 

नागरिक म्हणतात...
नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध झाली. बजेट होम्सची उत्कृष्ट माहिती मिळाली. प्रदर्शनातून सर्वोत्तम गृहखरेदीचा पर्याय उपलब्ध झाला. अशा प्रदर्शनामुळे ग्राहकांची धावपळ थांबते आणि सर्व गृहप्रकल्पांची माहिती एकाच ठिकाणी मिळते, हे ग्राहकांच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे.
- रिंकी नेमा, चिंचवड

‘सकाळ’ वास्तू प्रदर्शनामुळे सामान्यांना स्वप्नातील घर साकारणे सोपे झाले आहे. यामध्ये शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या ‘वन बीएचके फ्लॅट’पासून ते लक्‍झरियस रो-हाऊसपर्यंत सर्व काही विविध सवलतींसह उपलब्ध आहे.’’
- शैलेश कांबळे, थेरगाव

गृहकर्ज आणि बजेट होमपासून लक्‍झरी, अल्ट्रा लक्‍झरी होम्सपर्यंतचे विविध पर्याय या प्रदर्शनात उपलब्ध आहेत. त्यामुळे अनेक उत्कृष्ट गृहप्रकल्पांची शृंखला पाहायला मिळाली. बहुतांशी बिल्डरांनी चांगल्या ऑफर्स देऊ केल्या आहेत. आम्हाला अपेक्षित परिसरातील गृहप्रकल्पांची चांगली माहिती मिळाली.
- डॉ. लावण्या पासलकर, निगडी 

या प्रदर्शनातील प्रकल्पांतील घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्‍यातील आहेत. साइट व्हिजिटची सोय उपयुक्त आहे. एकाच ठिकाणी अनेक गृहप्रकल्पांची माहिती मिळाली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या प्रदर्शनात नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या विविध प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने सर्वसामान्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. 
- स्वप्नील तावरे, शाहूनगर 

वास्तू उत्कृष्ट असणे आवश्‍यक - जुमानी
‘‘वास्तूचा संबंध दिशांवर अवलंबून असतो. प्रत्येक दिशा एका ग्रहाचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे ती वास्तू घरात राहणाऱ्या व्यक्तीला प्रभावित करत असते. घर लहान असो वा मोठे, लक्‍झरी असो की सामान्य, तेथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रगतीसाठी वास्तू उत्कृष्ट असणे आवश्‍यक आहे.’’ असे मत प्रसिद्ध अंकशास्त्र तज्ज्ञ श्‍वेता जुमानी यांनी रविवारी (ता. ११) व्यक्त केले. 

चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटरमध्ये ‘सकाळ’ आयोजित ‘वास्तू प्रॉपर्टी एक्‍स्पो’ प्रदर्शनात त्या  ‘अंकशास्त्र आणि वास्तू’ विषयावर त्या बोलत होत्या. 

जुमानी म्हणाल्या, ‘‘अंकशास्त्र १ ते ९ अंकांवर आधारित असून, हे ज्योतिषशास्त्र नवग्रहांचे प्रतीक आहे. त्यामुळे प्रत्येक अंकावर एक ग्रह प्रभावित असतो. व्यक्तीची जन्म तारीख, त्याच्या मूल्यांक निर्णायक असतो. आपली जन्मतारीख काहीही असो. येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी आपल्या, दुकानात, कामाच्या ठिकाणी ‘२४’ क्रमांक लिहून ठेवावा. आपल्या कमाईतील काहीभाग दान करा. त्याने निश्‍चित फायदा होईल.’’

त्या म्हणाल्या, ‘‘आपली वास्तू व्हावी, म्हणून आपण खूप धडपडतो. पण व्यवहार मार्गी लागत नाही. कारण त्यावेळी योग आलेला नसतो. प्रत्येकाने निळ्या रंगाला प्राधान्य द्यावे. ९ ग्रहांची ९ संख्या व्यक्तिमत्त्वे, वागणूक नियंत्रित करतात आणि यश, अपयशाचेही कारण बनतात. आपली जन्म तारीख आपल्या हातात नसते. मात्र नेमकेपणाने नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल केल्यास तो लकी ठरू शकतो आणि आपले भाग्य बदलू शकतो.

अंकशास्त्र तज्ज्ञ असे मानतात, की अंकशास्त्राचे योग्य अनुकरण केल्यावर यश मिळते. मात्र बहुतांशी लोक असे समजतात, की अंकशास्त्र म्हणजे केवळ नावात बदल. तो बदल केल्यावर खात्रीशीर यश मिळणार. परंतु प्रत्यक्षात तसे नाही. नावात बदल केल्याने जीवन बदलत नाही, तर त्याबरोबर मंत्र, दान, उपवास, लकी स्टोन्स, नंबर, रंग यांवरही लक्ष ठेवले पाहिजे. आपल्या जन्मांकानुसार रंगसंगती जपली पाहिजे.’’ 

Web Title: pimpri news pune news sakal auto cluster spot booking home