क्रीडानगरीचे स्वप्न हवेतच

क्रीडानगरीचे स्वप्न हवेतच

पिंपरी - शहराच्या क्रीडा क्षेत्राला दिशा देणाऱ्या महापालिकेच्या क्रीडा विभागाची पुरती दुर्दशा झाली आहे. वाढत्या क्रीडा सेवा-सुविधांच्या तुलनेत मनुष्यबळ अपुरे आहे. खेळाडू घडविण्याचे काम जवळपास ठप्प झाले असून चांगल्या प्रशिक्षकांचीही उणीव जाणवत आहे. प्रत्येक मैदानासाठी जादा ग्राउंडस्‌मन, सुरक्षा कर्मचारी, जलतरण तलावांसाठी जादा जीवरक्षकांचीही गरज आहे. आजही क्रीडा शिक्षक निवडणूक विभाग कार्यालयात वर्षानुवर्षे नियुक्तीस आहेत. त्यामुळे, साधन संपत्ती असूनही या विभागाचे कामकाज विस्कळित असून शहराची क्रीडानगरी करण्याचे स्वप्न हवेतच आहे.

क्रीडा संकुले, स्टेडियम, मैदाने 
कै. अण्णासाहेब मगर स्टेडियम, नेहरुनगर
संत ज्ञानेश्‍वर महाराज क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर
मेजर ध्यानचंद पॉलिग्रास हॉकी स्टेडियम, नेहरुनगर
मदनलाल धिंग्रा मैदान, प्राधिकरण
१२ बहुद्देशीय मैदाने 
१४ बॅडमिंटन हॉल
४ स्केटिंग रिंक
७ लॉन टेनिस कोर्ट
१२ जलतरण तलाव
८० व्यायामशाळा 
आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल, भोसरी (प्रगतिपथावर)
नेमबाजी केंद्र, कृत्रिम प्रस्तरारोहण भिंत (बंद), भारोत्तलन केंद्र, मुष्टियुद्ध प्रशिक्षण केंद्र सुरू. 

क्रीडा विभागाचे कामकाज 
क्रीडांगणे, मैदाने भाड्याने देणे
क्रीडा सेवा पुरविणे
क्रीडा सुविधांची देखरेख करणे
आवश्‍यक दुरुस्तीसाठी स्थापत्य विभाग अथवा संबंधित विभागांकडे पाठपुरावा करणे
७० ते ८० शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडणे
५ ते १० महापौर चषक क्रीडा स्पर्धा भरविणे 

सध्याचा अधिकारी, कर्मचारी 
सहायक आयुक्त (क्रीडा), प्रशासन अधिकारी (वर्ग-२)
क्रीडा अधिकारी, पर्यवेक्षक, लिपिक यांची एकूण संख्या ९० (वर्ग-३)
व्यायामशाळा मदतनीस, जीवरक्षक, शिपाई, मजूर यांची संख्या १०० (वर्ग-४)
कार्यालयीन कामकाजासाठी मनुष्यबळ
मुख्य लिपिक, उपलेखापाल, १० लिपिक (तलाव व्यवस्थापक)

आवश्‍यक पदे, सामग्री, कर्मचारी 
प्रत्येक मैदानासाठी प्रत्येकी ३ पाळ्यांकरिता ४२ सुरक्षा रक्षक
१२ जलतरण तलावांसाठी १९ जीवरक्षक, ९ मदतनीस. आणखी ५६ जीवरक्षकांची गरज.
मैदाने सुस्थितीत ठेवण्यासाठी ग्राउंडस्‌मन नाहीत. २८ ग्राउंडस्‌मनची गरज. 
मैदानावरील गवत काढण्यासाठी मशिन्स नाहीत.
पिंपळे गुरव, सांगवी येथील तलावांवर लिपिक नाहीत. तेथे जीवरक्षकच व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. 

सात वर्षांपासून भरती नाही
पालिकेचा क्रीडा विभाग १९९६ मध्ये अस्तित्वात आला. त्यावेळेस ४ ते ५ कर्मचाऱ्यांची नेमणूक. १९९९ मध्ये १२ जणांची भरती. २०११ मध्ये ३ प्रकल्पग्रस्त सेवेत. 

वेतन क्रीडा विभागाचे...
क्रीडा विभागात पूर्वी ४० क्रीडा शिक्षकांची टप्प्या-टप्प्याने भरती झाली. त्यांच्यापैकी ११ शिक्षकांची क्रीडा पर्यवेक्षक पदांवर नियुक्ती झाली. मात्र, एकूण १५ शिक्षक चिंचवड, भोसरी, पिंपरी विधानसभा मतदारसंघ (निवडणूक) कार्यालयांत सेवेत आहेत. त्यापैकी काही जण ८ ते १० वर्षांपासून तेथे कामकाज करत आहेत. मात्र, त्यांची सेवा पुस्तके, वेतन-भत्ते, रजा-हजेरी यासर्व प्रकारचे काम क्रीडा विभागामार्फत केली जातात. उर्वरित १३ शिक्षकांच्या माध्यमिक शाळांवर नेमणुका झाल्या असून त्यांच्याकडे विषय शिक्षक म्हणूनही जबाबदारी देण्यात आली आहे. 

काय करता येईल ?
महाराष्ट्र ऑलिंपिक संघटना (एमओए) मान्यता प्राप्त राज्य क्रीडा संघटनांना प्रमुख क्रीडा संकुले सकाळ-संध्याकाळ दोन तासांसाठी विनामूल्य चालविण्यास दिल्यास त्याचा योग्य वापर होऊन खेळाडू घडतील. मैदानाची देखभाल-दुरुस्ती, साधन-सामग्री हाताळण्यास कर्मचारी नाहीत. प्रत्येक पदानुसार कर्मचारी नेमणुका झाल्या पाहिजेत. निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांच्या क्रीडा विभागात फेरनियुक्‍त्या होणे गरजेचे आहे. 

महापालिकेच्या क्रीडा सेवा-सुविधांमध्ये वाढ होत आहे. मात्र, त्या तुलनेत मनुष्यबळ अपुरे ठरत आहे. सध्याच्या कर्मचाऱ्यांमध्ये ७० ते ८० शालेय जिल्हास्तरीय स्पर्धा, ५ ते १० महापौर चषक क्रीडा स्पर्धा, इतर कामकाज करावे लागते.
- रज्जाक पानसरे, क्रीडा अधिकारी, महापालिका 

दरवर्षी उन्हाळ्यात जीवरक्षकांची कमतरता भासते. परंतु, कोणीही चार महिन्यांसाठी कामावर येत नाही. त्यासाठी ११ महिन्यांचे कंत्राटी कामगारांचे करार करावे लागतील. तसेच ठराव संमत करावा लागेल. मैदाने-क्रीडा संकुलांच्या सुरक्षेसाठी पालिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना पत्रे दिली आहेत. ग्राउंडस्‌मनचीही आवश्‍यकतेनुसार भरती केली जाईल. निवडणूक विभागातील क्रीडा शिक्षकांना परत क्रीडा विभागात सेवेत रुजू करून घेण्यासाठी आयुक्तांना पत्र दिले जाईल.
- लक्ष्मण सस्ते, क्रीडा सभापती, महापालिका 

खेळाडू तयार होण्यासाठी क्‍लब संस्कृती रुजणे गरजेचे आहे. तसेच खेळासाठी योगदान देणारे शिक्षक व संघटनांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना आखाव्यात. शहरातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमून योग्य नियोजन, पालिका क्रीडा विभाग प्रशासनाची योग्य रचना आवश्‍यक.
- मनोज देवळेकर, प्रशिक्षक, माजी राष्ट्रीय खेळाडू, ॲथलेटिक्‍स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com