स्थायी समितीत भाजपचे नवे चेहरे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

स्थायी समितीतील भाजपच्या सर्व अकरा सदस्यांनी राजीनामे पक्षाकडे दिले आहेत. पक्षाच्या सर्व सदस्यांना स्थायी समितीत काम करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा सदस्यांनी व्यक्त केली. त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलून पिंपरी- चिंचवड महापालिकेसाठी हा निर्णय घ्यावा, असे त्यांनी सुचविले. त्यामुळे पक्षाच्या ५० ते ५५ नगरसेवकांना संधी मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी चर्चा करून राजीनाम्याबाबत पुढील निर्णय घेऊ.
- आमदार लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष, भाजप

पिंपरी - महापालिका स्थायी समितीच्या १६ सदस्यांपैकी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांच्यासह भाजपच्या सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांची नावे बुधवारी लॉटरी पद्धतीने वगळण्यात आली. समितीतील भाजपच्या दहा नगरसेवकांचे आणि त्यांना पाठिंबा दिलेल्या एका अपक्ष नगरसेवकाचे स्थायी समितीच्या सदस्यत्वाचे राजीनामे आज पक्षाने घेतले. नवीन सदस्यांच्या निवडीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर घेण्यात येणार आहे.

सीमा सावळे, कुंदन गायकवाड, उषा मुंढे, कोमल मेवानी, हर्षल ढोरे, आशा शेंडगे (सर्व भाजप); तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा वैशाली काळभोर आणि अनुराधा गोफणे (राष्ट्रवादी काँग्रेस) या आठ नगरसेवकांच्या नावाच्या चिठ्ठ्या लॉटरी पद्धतीने निघाल्या. त्या सर्वांचे २८ फेब्रुवारीपर्यंत स्थायी समितीचे सदस्यत्व राहील. त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत २० फेब्रुवारी रोजी होईल. 

स्थायी समितीचे सदस्यत्व राजकीय पक्षांच्या महापालिकेतील नगरसेवकांच्या संख्याबळावर निश्‍चित करण्यात येते. त्यामुळे ज्या पक्षांचे जेवढे नगरसेवक स्थायी समितीतून वगळण्यात आले आहेत, तेवढ्या जागा संबंधित पक्षातर्फे भरण्यात येतील. भाजपतर्फे सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दोन नगरसेवकांची नावे पक्षाचे गटनेते सर्वसाधारण सभेत महापौरांकडे देतील. महापौरांनी त्या नवीन आठ सदस्यांची नावे जाहीर केल्यानंतर, ते सर्वजण एक मार्चपासून स्थायी समितीचे सदस्य होतील. विद्यमान समितीतील आठ आणि नवीन आठ अशा स्थायी समितीच्या सोळा सदस्यांची पहिली बैठक सात मार्चला होणार असून, त्या दिवशी नवीन अध्यक्षांची निवड होणार आहे. 

स्थायी समितीतील लक्ष्मण उंडे, उत्तम केंदळे, माधुरी कुलकर्णी, निर्मला कुटे (सर्व भाजप), कैलास बारणे (अपक्ष- भाजप सहयोगी), राजू मिसाळ, मोरेश्‍वर भोंडवे (दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस), अमित गावडे (शिवसेना) या विद्यमान सदस्यांचे सभासदत्व कायम राहिले. मिसाळ आणि भोंडवे आज बैठकीला अनुपस्थित होते.

भाजपअंतर्गत घडामोडी
महापालिकेत भाजपचे ७७ नगरसेवक निवडून आले आहेत; तर पाच अपक्षांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. त्या सर्वांना संधी मिळावी, या हेतूने स्थायी समितीच्या सदस्यांची मुदत दोन वर्षांऐवजी एक वर्ष करण्याविषयी गेले काही दिवस पक्षात चर्चा सुरू होती. भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आज दुपारी महापालिकेत आले. त्यांच्यासह महापौर नितीन काळजे, स्थायी समितीतील पक्षाच्या सर्व सदस्यांची बैठक स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांच्या दालनात झाली. त्यामध्ये स्थायी समितीतून कोणाचीही नावे वगळली, तरी समितीतील पक्षाच्या सर्व अकरा सदस्यांनी राजीनामे द्यावेत, असे या वेळी ठरले. सर्वांनी त्यांचे राजीनामे जगताप यांच्याकडे दिले. ही बैठक सुरू असल्याने, स्थायी समितीच्या बैठकीला उशीर झाला. स्थायी समितीची बैठक दोनऐवजी पावणेतीन वाजता सुरू झाली.

अशी झाली निवड प्रक्रिया
समितीच्या बैठकीत सर्व सोळा सदस्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या वाचून दाखविण्यात आल्या. प्रत्येक चिठ्ठी वाचल्यानंतर एका चेंडूत भरण्यात आली. नवीन चेंडू तेथेच कापून सर्वांच्या चिठ्ठ्या भरण्यात आल्या. चिकटपट्टी लावून चेंडू बंद करण्यात आला. सर्व चेंडू एका काचेच्या षटकोनी बॉक्‍समध्ये टाकण्यात आले. तो बॉक्‍स कुलूपबंद करून फिरविण्यात येत होता. स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी पत्रकारांच्या हस्ते चेंडू काढण्यास सांगितले. पहिली चिठ्ठी निघाली ती सावळे यांचीच. त्यानंतर क्रमाक्रमाने सात चिठ्ठ्या काढण्यात आल्या. दहा-बारा मिनिटांत ही निवड प्रक्रिया संपली. नावे जाहीर झालेल्या सदस्यांना स्थायी समितीतून वगळण्यात आले. ही प्रक्रिया क्‍लोज सर्किट पडद्यावर दाखविण्यात येत होती.

राष्ट्रवादीने मागविले अर्ज
स्थायी समितीतून निवृत्त झालेल्या दोन सदस्यांच्या जागी निवड करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविले आहेत, अशी माहिती विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी दिली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri news pune news standing committee member bjp politics