तिसऱ्या ट्रॅकचा अहवाल अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

पिंपरी - पुणे ते लोणावळादरम्यान प्रस्तावित असणाऱ्या उपनगरीय लोकल कॉरिडॉरचे काम मार्गी लागण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. या मार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकचे काम प्रस्तावित असले, तरी रेल्वे प्रशासनाकडून त्याचा अंतिम अहवाल तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. मार्चअखेरीस तो केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात येणार आहे. 

पिंपरी - पुणे ते लोणावळादरम्यान प्रस्तावित असणाऱ्या उपनगरीय लोकल कॉरिडॉरचे काम मार्गी लागण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. या मार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकचे काम प्रस्तावित असले, तरी रेल्वे प्रशासनाकडून त्याचा अंतिम अहवाल तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. मार्चअखेरीस तो केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात येणार आहे. 

अहवाल हातात पडल्यानंतर त्यावर अधिक वेळ न घालवता केंद्र सरकारने त्याला पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. या कामाला तत्काळ गती मिळणार आहे. पुणे ते लोणावळादरम्यान प्रस्तावित असणारा लोकल कॉरिडॉर स्वतंत्र राहणार असल्याने या मार्गावर दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी ते अधिक सोईस्कर राहणार आहे. सध्या पुणे ते लोणावळा या मार्गावर दोनच ट्रॅक आहेत. एक्‍स्प्रेस, मालगाड्या, लोकल त्यावरून धावत असतात.

बऱ्याचदा एक्‍स्प्रेस गाड्यांना मार्ग काढून दिला जातो. त्यामुळे लोकल उशिराने धावतात आणि त्याचा फटका प्रवाशांना बसताना दिसतो. 

रेल्वेने उपनगरीय लोकल कॉरिडॉरसाठी तयार केलेल्या अहवालामध्ये हॅरिस ब्रिज आणि संगम पुलावर उभारावे लागणारे नवीन पूल, याबरोबरच काही ठिकाणी छोटे पूल उभारावे लागणार असल्याचे नमूद केले आहे. रेल्वे प्रशासनाने या कामासाठी आतापर्यंत दोन सर्वेक्षण केले असून, त्यात सध्याच्या कामशेत स्थानकाच्या जागेत बदल करण्याचे सुचविले आहे. दरम्यान, उपनगरीय लोकल कॉरिडॉर ही काळाची गरज असून, हा प्रकल्प वेगाने मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची आवश्‍यकता असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. 

खोळंबा नेमका कशामुळे
राजस्थानमधील गंगानगर ते तिरुचिरापल्लीदरम्यान हमसफर एक्‍स्प्रेस धावते. ही गाडी नेहमीच्या वेळेपेक्षा तीन तास उशिराने आली. पुढे या गाडीला उशीर होऊ नये, म्हणून रेल्वे प्रशासनाने तळेगावमध्ये लोकल थांबवून ही गाडी सोडली. त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांचा खोळंबा झाला.

देखभालीच्या कामांना प्राधान्य
गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात रेल्वेचे दोन ते तीन मोठे अपघात झाले आहेत. त्यामुळे रेल्वे बोर्डाने अपघाताच्या घटना होऊ नयेत, म्हणून सर्व लोहमार्गाची दररोज देखभाल करण्याच्या कामाला प्राधान्य दिले आहे. पुणे ते लोणावळा मार्गावर दररोज देखभालीचे काम प्राधान्याने करण्यात येत आहे. काही वेळा या कामाला उशीर लागतो. त्यामुळे लोकल गाड्यांना उशीर होण्याचे प्रकार होतात. प्रवाशांच्या सुरक्षेसाठीच लोहमार्गाची देखभाल महत्त्वाची असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

Web Title: pimpri news pune news third track report