पवना धरणातून 3680 क्‍युसेकने विसर्ग 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

पवनानगर - पवना धरण परिसरात शनिवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणाचे सहा दरवाजे रविवारी अर्ध्या फुटाने उघडावे लागले. त्याच्या सांडव्यातून 3680 क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे. 

पवनानगर - पवना धरण परिसरात शनिवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणाचे सहा दरवाजे रविवारी अर्ध्या फुटाने उघडावे लागले. त्याच्या सांडव्यातून 3680 क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे. 

मावळसह पिंपरी-चिंचवडकरांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या वर्षी पवना धरण परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. पवना धरण 100 टक्के भरले आहे. रविवारी दुपारी एक वाजता पवना धरणाचे चार दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून सांडव्यातून 1472 क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले; परंतु पावसाचा जोर कायम राहिल्याने पुन्हा पाटबंधारे विभागाने दुपारी साडेतीनला विसर्ग वाढवून 2208 क्‍युसेक करण्यात आला. एकूण 3680 क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती पवना धरणाचे अभियंता मनोहर खाडे यांनी दिली. 

रविवारी दिवसभरात धरण परिसरात 60 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. चोवीस तासांत 82 मिलिमीटर पाऊस झाला. धरणात 8.51 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस गायब झाला होता. त्यामुळे पिके वाया जाण्याची शक्‍यता होती; परंतु आताच्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Web Title: pimpri news rain Pavana Dam