आता आमचीही मुलं इंग्रजी बोलणार

आता आमचीही मुलं इंग्रजी बोलणार

झोपडपट्टीतील मुलांसाठी स्नेह फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

पिंपरी - आपल्या मुलाने इंग्रजी शाळेत जावं, फाडफाड इंग्रजी बोलावं, अस प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असत. मात्र, इंग्रजी शाळांची फी सर्वांनाच परवडणारी नसल्याने अनेकजण नाईलाजास्तव मुलांना महापालिकेच्या मराठी शाळेत घालतात. मात्र झोपडपट्टीत राहणाऱ्या काही आई-वडिलांचे हे स्वप्न स्नेह फाउंडेशनमुळे सत्यात उतरले आहे. भोसरीतील शांतीनगर झोपडपट्टीत त्यांनी मोफत प्री-प्रायमरी स्कूल सुरू केले आहे.

भोसरीतील शांतीवन आणि लांडेवाडी झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब मुलांसाठी इंग्रजी माध्यमाची प्री-प्रायमरी स्कूल सुरू करण्याचा निर्णय स्नेह फाउंडेशनने घेतला. यासाठी झोपडपट्टी भागातून अर्ज मागविण्यात आले. १७० अर्ज आल्यावर संस्थेचे स्वयंसेवक श्रृतिका बाग-मुंगी, रवींद्र आंबोरे, सारंग चौधरी यांनी घरोघरी जाऊन पाहणी करीत ५० गरीब विद्यार्थ्यांची शाळेसाठी निवड केली. या सर्व विद्यार्थ्यांना स्नेहकडून गणवेश, बूट, मोजे, दप्तर, पुस्तके, वह्या आदी शालेय साहित्य मोफत दिले.

स्नेह फाउंडेशनने सुरू केलेली शाळा ही फक्‍त प्री-प्रायमरी असल्याने पुढील शाळेकरिता आरटीईच्या माध्यमातून नामांकित शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. येथील महिलांना स्वावलंबी करण्यासाठी त्यांना बॅंक खाते कसे उघडायचे व हाताळायचे, पोलिस ठाण्यात तक्रार कशी द्यायची याबाबत प्रशिक्षित केले जाणार आहे. याशिवाय आकर्षक पणती आणि आकाशकंदील तयार करणे, ज्या महिला साक्षर आहेत त्यांना संगणक प्रशिक्षण अशा स्वरूपाचे याच ठिकाणी शिक्षण दिले जाणार आहे. या शाळेत कुसूम विश्‍वकर्मा, सुवर्णा धावटे या शिक्षिकांची निवड करतानाही त्यांना असलेली गरज लक्षात घेऊन नियुक्‍ती केली आहे. आयटी क्षेत्रात काम करणारे अनेक तरुण स्नेह फाउंडेशनशी जोडले आहेत. ते एका विद्यार्थ्यांचा वार्षिक खर्च उचलतात. त्यांना त्या मुलाची सर्व माहिती व प्रगतीबाबत अहवाल दिला जातो. पंकज बोरा, डॉ. प्रमिला पानसरे आणि विजय थेरोकर यांची या प्रकल्पास मोलाची मदत होत आहे.

इच्छा नसतानाही आम्ही मुलाला मराठी शाळेत घालणार होतो. मात्र आता स्नेह फाउंडेशनमुळे मुलांना इंग्रजी शाळेत शिकविण्याचे स्वप्न साकार झाले आहे.
- आशा पवार, पालक

आम्ही जशी मोलमजुरी करतो तशी आमच्या मुलांना करायला लागू नये, अशी आमची इच्छा होती. मात्र आता त्याला इंग्रजी शाळेत टाकल्यामुळे आमच्या स्वप्नांकडे पहिले पाऊल टाकले आहे.
- सुषमा नाडे, पालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com