‘बोचलं म्हणून’ सोशल मीडियावर व्हायरल झाली कविता

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

पिंपरी -  महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या भोसरी येथील कार्यक्रमात एका तरुणाने शेतकऱ्याची व्यथा आणि देशातील राजकारणावर सादर केलेली कविता सध्या सोशल मीडियावर भलतीच व्हायरल झाली आहे. या कवितेला खूप लाइक मिळत असून ती शेअरदेखील केली जात आहे.

पिंपरी -  महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या भोसरी येथील कार्यक्रमात एका तरुणाने शेतकऱ्याची व्यथा आणि देशातील राजकारणावर सादर केलेली कविता सध्या सोशल मीडियावर भलतीच व्हायरल झाली आहे. या कवितेला खूप लाइक मिळत असून ती शेअरदेखील केली जात आहे.

 भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागहात १२ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा गदिमा कविता महोत्सव हा कार्यक्रम झाला. गदिमांचे वारसदार म्हणून राज्यभरातील सात कवींच्या काव्य वाचनाचा हा कार्यक्रम होता. त्यामध्ये अंकुश आरेकर यांनी ‘बोचलं म्हणून’ ही कविता सादर केली. या कवितेतून शेतकऱ्यांची व्यथा मांडत राजकीय नेत्यांच्या भूमिकेवर आपल्या कवितेत मार्मिक शब्दात चिमटे घेतले. अंकुशच्या या कवितेला सोशल मीडियात खूप दाद मिळत आहे. अंकुशची ही कविता फेसबुक, ट्‌विटर, व्हॉट्‌सअपवर खूपच फॉरवर्ड होत आहे.
 ‘लाख टन तुरीच्या खरेदीला मान्यता दिली म्हणून,
आम्हाला ‘साला’ म्हणायला यांची जीभ रेटतेच कशी,
  मला तुम्हाला विचारायचंय,
 अशा ‘दानवां’ना माणसात राहण्याची संधी भेटतेच कशी?’

अशा शब्दात कवितेची सुरवात केली. कवितेच्या प्रत्येक कडव्याला श्रोत्यांकडून टाळ्या आणि शिट्ट्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता. 

 ‘अहो ५६ इंच काय, माझा बाप ११२ इंच छाती फुगवतो,
 करतो काय तर इमानदारीने जगतो आणि इमानदारी शिकवतो
 चहावाला सांगून लाखोंचा कोट घालतात मोदी
अहो विकला असेल चहा, म्हणून देश विकायचा असतो का?’

या त्याच्या सवालाने तरुण श्रोत्यांनी अंकुशला अक्षरश: डोक्‍यावर घेतलं. अंकुश आरेकर हा पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात राज्यशास्त्र विभागात शिकतो. तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्‍यातील भांबेवाडी गावचा आहे. लहानपणापासूनच कवितेची आवड असलेल्या अंकुशने अनेक कविता लिहिल्या आहेत, मात्र भोसरीतील कार्यक्रमात सादर केलेल्या ‘बोचलं म्हणून’ या कवितेमुळे तो प्रकाशझोतात आला आहे. त्या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड झाल्यानंतर अंकुशची कविता सर्वांसमोर आली.

Web Title: pimpri news social media viral poem