सौरऊर्जेचा वाढतोय वापर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

दृष्टिक्षेपात सोलर एनर्जी पॅनल 
- सौरऊर्जेमुळे वीजबिलात बचत 
- सोलर एनर्जी पॅनलचा खर्च लाखावर 
- तीन ते चार वर्षांत खर्च वसूल 
- बंगल्यामधील नागरिकांची पसंती 
- गृहनिर्माण संस्थांकडून प्रतिसाद नाही 
- प्राधिकरणाच्या सात मजली इमारतीसाठी सौरऊर्जेचा वापर 
- गेल्या वर्षीपासून महावितरणला वीज देण्याची सुरवात 

पिंपरी - सौरऊर्जा साठवून ती "महावितरण'ला देण्याबाबत नागरिकांत जागृती होऊ लागली आहे. नवनगर विकास प्राधिकरणासह 30 नागरिकांनीही सोलर एनर्जी पॅनल बसविले असून, त्याद्वारे निर्माण होणारी वीज महावितरणला देण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे वीजबिलात मोठी बचत होत आहे. 

सोलर एनर्जीमधून निर्माण होणारी वीज "महावितरण'च्या ग्रीडला दिली जाते. सोलर एनर्जी आणि महावितरणकडील वीज या दोन्हीचा किती वापर होतो, याची माहिती होण्यासाठी प्राधिकरणाने स्वतंत्र मीटर बसवले आहेत. यामुळे दरमहा पंधरा ते साडेपंधरा हजार रुपयांपर्यंत वीजबिल येते, असे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सोलर एनर्जी साठवून ठेवण्यासाठी बॅटरी लावावी लागायची. त्यात सुमारे 50 लाख रुपये खर्च व्हायचे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

सोलर एनर्जी महावितरणच्या ग्रीडला देण्यासाठी स्वतंत्र मीटर व्यवस्था बसवावी लागते. महावितरणच्या भोसरी येथील प्रयोगशाळेत ते तपासणीसाठी पाठवण्यात येते. तिथल्या तपासणीनंतर हे मीटर बसवण्यासाठी योग्य आहे का, हे संबंधित ग्राहकाला सांगितले जाते. मीटरच्या तपासणीला वेळ लागत असल्यामुळे ही यंत्रणा कार्यान्वित होण्यास थोडासा वेळ लागतो, असे "महावितरण'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. घरातील वीजवाहिनीच्या मेगावॉट क्षमता पाहून सोलर एनर्जी यंत्रणा बसविली जाते. किमान एक मेगावॉटपासून सोलर यंत्रणा बसवता येऊ शकते, असेही त्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

सोलर एनर्जी महावितरण ग्रीडला देण्यास प्राधिकरणाने गेल्या वर्षापासून सुरवात केली आहे. यामुळे प्राधिकरणाची विजेच्या बिलात मोठी बचत होत आहे. प्राधिकरणाकडून याठिकाणी बसवण्यात आलेल्या सोलर पॅनलची देखभाल योग्य पद्धतीने करण्यात येत असल्याने त्याचा सर्वाधिक फायदा होत आहे. 
- प्रभाकर वसईकर, उपअभियंता, प्राधिकरण 

Web Title: pimpri news solar plant