५० हजार जणांना श्‍वानदंश

संदीप घिसे 
गुरुवार, 20 जुलै 2017

पिंपरी- शहरातील भटक्‍या कुत्र्यांनी नागरिकांना सळो की पळो करून सोडले आहे. गेल्या चार वर्षांत ५० हजार जणांना भटक्‍या कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेकडेही सर्वाधिक तक्रारी या भटक्‍या कुत्र्यांच्या येत आहेत. शहरात भटक्‍या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे.

पिंपरी- शहरातील भटक्‍या कुत्र्यांनी नागरिकांना सळो की पळो करून सोडले आहे. गेल्या चार वर्षांत ५० हजार जणांना भटक्‍या कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेकडेही सर्वाधिक तक्रारी या भटक्‍या कुत्र्यांच्या येत आहेत. शहरात भटक्‍या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे.

 चार वर्षांच्या कालावधीत भटक्‍या कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयात ३९ हजार ८५३ जणांनी रेबीज प्रतिबंधात्मक लस घेतल्याची नोंद आहे; तर २० टक्‍के खासगी रुग्णालयांत उपचार घेतात. महापालिका रुग्णालयात मोफत मिळणाऱ्या अँटीरेबीज सिरमकरिता खासगी रुग्णालयात तीन ते चार हजार रुपये मोजावे लागतात. रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरिता प्रत्येक इंजेक्‍शनकरिता ४०० रुपये याप्रमाणे सुमारे दोन हजारांचा खर्च येतो. 

श्‍वानदंश झाल्यानंतर सर्वप्रथम ज्या ठिकाणी दंश झाला आहे ती जखम वाहत्या नळाखाली साबणाने धुवावी. यामुळे रॅबिजचा धोका ५० टक्‍क्‍यांनी कमी होतो. त्यानंतर लगेच डॉक्‍टरांशी संपर्क साधून रेबीज प्रतिबंधात्मक लस घ्यावी; तसेच चावा घेतलेल्या कुत्र्यास मारून टाकू नका. त्याच्यावर दहा दिवस लक्ष ठेवा. कुत्रा मरण पावल्यास त्याबाबत उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांना सांगा.
- डॉ. लक्ष्मण गोफणे, वैद्यकीय अधिकारी, महापालिका

पावसाळ्यातील साचलेल्या पाण्याचाही कुत्र्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. पावसाळ्यात कुत्र्यांचा प्रजनन काळ असतो. यामुळे कुत्री आक्रमक होतात.
-  डॉ. सतीश गोरे, पशुवैद्यकीय अधिकारी

भटक्‍या कुत्र्यांमुळे होणारा त्रास
 घाबरून पळणाऱ्या मुलांच्या मागे कुत्री लागतात
 रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांच्या अंगावर झेप घेतात
 भटकी कुत्री अंगावर आल्याने अनेकांचे अपघात
 समूहाने अंगावर आल्याने दहशतीचे वातावरण
 रात्री अपरात्री भुंकण्यामुळे नागरिकांची झोपमोड

महालिकेकडून होत असलेले प्रयत्न
 एका कुत्र्यावर शस्त्रक्रियेकरिता ६५० रुपये खर्च
 वर्षभरात दहा हजारांहून अधिक श्‍वानांवर शस्त्रक्रिया
 श्‍वान पकडण्यासाठी सध्या फक्‍त एकच वाहन उपलब्ध
 वर्षभरात ६५ लाख रुपये श्‍वानावरील शस्त्रक्रियेकरिता खर्च

भटकी कुत्री वाढण्याची कारणे
 चौकाचौकांत मटण, चिकन, मच्छीची दुकाने, चायनीज वेस्टेज हे भटक्‍या कुत्र्यांचे खाद्य उपलब्ध 

 ६० दिवसांच्या प्रजनन काळामुळे एका मादी श्‍वानामुळे ३ वर्षांत ५०० श्‍वानांची पैदास 

 सर्वाधिक तक्रारी भटक्‍या कुत्र्यांच्या 
 भटक्‍या कुत्र्यांबाबत चार वर्षांत महापालिकेकडे ४ हजार ८४१ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी चार हजार ६३६ तक्रारींचे निराकरण केले. एखादे श्‍वान पकडल्यावर त्याच्यावर शस्त्रक्रिया करून पुन्हा त्याच परिसरात सोडले जाते. यामुळे पुन्हा-पुन्हा त्याच तक्रारी येतात, असे पशुवैद्यकीय विभागाचे म्हणणे आहे.

Web Title: pimpri news Stray dogs pimpri