मुलीच्या हत्येनंतर आईची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

पिंपरी - मुलीची गळफास देऊन हत्या केल्यानंतर आईनेही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. 21) सकाळी भोसरीतील इंद्रायणीनगर परिसरात उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. 

पिंपरी - मुलीची गळफास देऊन हत्या केल्यानंतर आईनेही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. 21) सकाळी भोसरीतील इंद्रायणीनगर परिसरात उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. 

कौमुदी इरसपण (वय 25) व देवश्री इरसपण (वय 4, रा. इंद्रायणीनगर, भोसरी, मूळ गाव पॉंडिचेरी) असे मृत्यू झालेल्या माय- लेकींची नावे आहेत. कौमुदी यांचे पती चाकण एमआयडीसीमध्ये एका खासगी कंपनीत कामाला आहेत. त्या पती, मावसभाऊ मणी अय्यनार व चार वर्षांची मुलगी देवश्री यांच्यासोबत राहत होत्या. कौमुदी यांचे पती इरसपण हे बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास नेहमीप्रमाणे मेहुण्यासोबत कामाला गेले. कौमुदी या दररोज सकाळी मुलीला शाळेत सोडविण्यासाठी जातात. जवळच राहणाऱ्या मावशीला शाळेत जाताना भेटतात. मात्र, आज वेळ होऊनही कौमुदी या मुलीला सोडविण्यासाठी न आल्याने तिच्या मावशीने विचारणा करण्यासाठी फोन केला. मात्र, फोन न उचलल्याने त्या विचारपूस करण्यासाठी कौमुदी यांच्या घरी आल्या. त्या वेळी दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी बराचवेळ बेल वाजवूनही आतून काहीच प्रतिसाद आला नाही. यामुळे शेजारच्यांच्या मदतीने त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्या वेळी मायलेकी दोघी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. 

नागरिकांनी त्या दोघींना खाली उतरवले व भोसरीतील खासगी रुग्णालयात नेले. मात्र, त्यांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. 

पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर दोघींचे मृतदेह विमानाने पॉंडिचेरी येथे नेले. कौमुदी व तिच्या पतीमध्ये कसल्याही प्रकारचे वाद नसल्याचे नातेवाइकांनी सांगितले. मुलीला गळफास देऊन कौमुदी यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्‍यता पोलिसांनी व्यक्‍त केली. मात्र, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. भोसरी एमआयडीसी पोलिस पुढील तपास करत आहेत. 

Web Title: pimpri news suicide