थेरगाव-काळेवाडी रस्त्यावर बेकायदा पार्किंग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

पिंपरी - थेरगाव फाटा ते काळेवाडी मुख्य रस्त्यावर जड वाहनांचे दिवस-रात्र बेकायदा पार्किंग होत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. वाहनांत व आडोशाला तळीरांमाची मैफल बसते. त्यामुळे पादचारी महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत प्रशासनाने डोळ्यावर पट्टी बांधली असल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण आहे.  

पिंपरी - थेरगाव फाटा ते काळेवाडी मुख्य रस्त्यावर जड वाहनांचे दिवस-रात्र बेकायदा पार्किंग होत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. वाहनांत व आडोशाला तळीरांमाची मैफल बसते. त्यामुळे पादचारी महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत प्रशासनाने डोळ्यावर पट्टी बांधली असल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण आहे.  

थेरगाव फाट्यावरून काळेवाडीतील तापकीर चौकाला जोडणारा हा मुख्य रस्ता असल्याने या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. या रस्त्यालगत महापालिका प्राथमिक, माध्यमिक; तसेच काही खासगी महाविद्यालये आहेत. क्षेत्रीय कार्यालय व कर संकलन केंद्र असल्याने नागरिकांची सतत ये-जा असते. मात्र, रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिवस-रात्र अवजड वाहने, कंपनीच्या बस, ट्रॅव्हल, स्कूलबस पार्किंग केल्या असतात. त्यामुळे शाळेतील मुली व महिलांना पायी जाणेही जिकिरीचे झाले आहे. रात्री या वाहनांच्या आडोशाला तळीरामांच्या दारूच्या पार्ट्या होतात. दारूच्या बाटल्या रस्त्यावर व पदपथावर फोडल्या जातात. तसेच लघुशंकाही याच ठिकाणी केली जाते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. अनेक रात्री या भागात पादचाऱ्यांना अडवून मारहाण केली जाते. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासन व परिवहन प्रशासनाला सांगूनही याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण आहे.

वाहनांच्या खाली चिरडतात रोपे
या रस्त्यावर दरवर्षी महापालिकेच्या वतीने वृक्षारोपण केले जाते. रोपांच्या भोवती लोखंडी जाळ्याही लावल्या जातात. मात्र, जाळ्या गायब होऊन रोपे या वाहनांच्या खाली चिरडली जातात. अशाच पद्धतीने यंदाही मोठ्या थाटात वृक्षारोपण करण्यात आले; परंतु आता या मार्गावर रोपे गायब आहेत.

थेरगाव गावठाण ते तापकीर चौकदरम्यान सम-विषम पार्किंगचा प्रस्ताव वाहतूक उपायुक्त कार्यालयाला दिला आहे. उपायुक्त कार्यालयातून कायदेशीर आदेश आल्यानंतर या रस्त्यावर त्याबाबतचे फलक लावण्यात येणार आहेत. तसेच मोठ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी त्या आकाराचे जॅमर नाहीत. लवकरच ते उपलब्ध होणार असल्याने या मार्गावर सतत कारवाई केली जाणार आहे. 
- दत्तात्रेय पाटील, पोलिस निरीक्षक, हिंजवडी वाहतूक विभाग.

या रस्त्यावरच्या बेकायदा पार्किंगमुळे दोन जणांचा जीव गेला असून, वाहने लावून चालक निघून जातात. त्यामुळे सकाळी सफाई कर्मचाऱ्यांना स्वच्छता करता येत नाही. पाण्याच्या व्हॉल्व्हवर वाहने लावल्याने काही भागातील नागरिकांना पाणीही मिळत नाही. गाड्यांमध्ये व आडोशाला अनेक गैर कृत्य चालतात. याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही दखल घेतली जात नाही. 
- अर्चना बारणे, स्थानिक नगरसेविका

Web Title: pimpri news thergaon-kalewadi road Illegal parking