पिंपरी, थेरगावात वाहनांची तोडफोड 

पिंपरी, थेरगावात वाहनांची तोडफोड 

पिंपरी - एकाच रात्री शहरात दोन ठिकाणी 16 वाहनांची तोडफोड करण्यात आली. पिंपरीत सात मोटारींच्या काचा फोडल्या. तर, थेरगाव येथील अशोक सोसायटी परिसरात नऊ वाहनांची तोडफोड केली. यामुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे. 

पिंपरीचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर म्हणतात... 
संत तुकारामनगर परिसरातील महापालिकेच्या राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन परिसरात नागरिक वाहने उभी करतात. रविवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी तेथील वाहनांच्या काचा फोडल्या. दोन संशयितांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. 

स्थानिकांचा मद्यपींवर संशय 
सांस्कृतिक भवन परिसरात काही मद्यपी बसलेली असतात. त्यांनीच हे कृत्य केले असावे, अशी शक्‍यता स्थानिकांनी व्यक्‍त केली. 

पंधरा दिवसांपूर्वी गवताला आग 
सांस्कृतिक भवन परिसरातील सुकलेल्या गवताला 15 दिवसांपूर्वी कोणीतरी आग लावली होती. अग्निशामक दल पोचल्याने आगीची झळ वाहनांना बसली नव्हती. 

थेरगावात सहा जणांविरुद्ध गुन्हा 
तोडफोडीची दुसरी घटना थेरगाव परिसरातील अशोका सोसायटी ते आनंद हॉस्पिटलदरम्यान घडली. याप्रकरणी दीपक राजपूत (वय 43, रा. वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. पाच-सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. 

घटनांत वाढ; पोलिस अपयशी 
गेल्या वर्षभरात तोडफोडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. घरकुल परिसर, चिंचवडगाव, नेहरूनगर, संतनगर- भोसरी, साने चौक, थेरगाव, सांगवी परिसरात यापूर्वी वाहन तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. अशा घटना रोखण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत. 

"मोका'अंतर्गत कारवाई 
डॉ. बसवराज तेली यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी नेहरूनगर परिसरात तोडफोडीची घटना घडली होती. त्यानंतर आणखी तोडफोडीच्या घटना घडल्या. यामुळे डॉ. तेली यांनी तोडफोड करणाऱ्यांवर "मोका'न्वये कारवाई केली होती. त्यामुळे तोडफोडीच्या घटना कमी झाल्या होत्या. मात्र त्यानंतर जरब बसावी, अशी कारवाई होत नसल्याने तोडफोडीच्या घटना वाढत आहेत. 

गस्तीवरील पोलिसांना कळले नाही 
रात्री प्रत्येक पोलिस चौकीच्या हद्दीत बीट मार्शल गस्त घालतात. तसेच, टू मोबाईल आणि पीटर मोबाईल अशा वाहनांद्वारे अधिकारीही गस्त घालतात. मात्र, मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड झाल्याची माहिती सकाळपर्यंत पोलिसांना समजले नाही, याबाबत आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. तर तपास सुरू असल्याचे ठेवणीतील उत्तर पोलिसांकडून मिळत आहे. 

थेरगाव परिसरात गेल्या आठ महिन्यांत वाहन तोडफोडीच्या तीन घटना घडल्या आहेत. पोलिसांना बंदोबस्त करता येत नसेल, तर स्थानिक नागरिकांच्या मदतीने आम्ही गुंडांचा बंदोबस्त करू. 
- कैलास बारणे, नगरसेवक 

पिंपरी आणि थेरगाव परिसरात झालेल्या वाहनांच्या तोडफोड प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू आहे. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. 
- गणेश शिंदे, पोलिस उपायुक्‍त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com