पावसाच्या हजेरीने शेतकरी सुखावला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

वडगाव मावळ - मावळ तालुक्‍यात सर्वदूर शनिवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असून, दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरीवर्ग सुखावला आहे. 

वडगाव मावळ - मावळ तालुक्‍यात सर्वदूर शनिवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असून, दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरीवर्ग सुखावला आहे. 

मावळ तालुक्‍यात यंदाच्या पावसाळ्यात खऱ्या अर्थाने शनिवारी संध्याकाळपासून मॉन्सूनचे आगमन झाले. शनिवारी रात्रभर पावसाची संततधार सुरू होती. रविवारी सकाळपासूनच सरीवर सरी कोसळत होत्या. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत लोणावळा येथे १५० मिलिमीटर, पवना धरण परिसरात ९८ मिलिमीटर, वडगाव येथे ६२ मिलिमीटर, तळेगाव दाभाडे येथे ४८ मिलिमीटर, कार्ला येथे ९८ मिलिमीटर, खडकाळा येथे ७८ मिलिमीटर, शिवणे येथे ४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. तालुक्‍यात भाताची सुमारे अकरा हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पवना व इंद्रायणी नदीकाठच्या शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच भात पेरणी केली होती व नदीच्या पाण्यावर भातरोपे तयार केली होती. रोपांची जोमदार वाढ व भात लागवडीसाठी शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा होती. पाण्याची व्यवस्था नसलेल्या शेतकऱ्यांनी धूळवाफेवर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भात पेरणी केली होती. रोपांची उगवण झाल्यानंतर पावसाने ओढ दिल्याने शेतकरी वर्ग चिंतेत होता. पूर्व मावळ भागातील सोयाबीन, भुईमूग, कडधान्ये आदी खरीप पिकांनाही पावसाअभावी धोका निर्माण झाला होता. मात्र शनिवारी संध्याकाळपासून तालुक्‍यात सर्वदूर पावसाला सुरवात झाल्याने बळिराजा सुखावला आहे.

Web Title: pimpri news wadgaon maval rain farmer