वायसीएममध्ये ‘दुकानदारी’

संदीप घिसे 
सोमवार, 2 जुलै 2018

पिंपरी- वायसीएम रुग्णालयात आलेल्या रुग्णांना खासगी दवाखान्यात येण्यास सांगणे, अतिदक्षता विभागात जागा नसल्याचे सांगून खासगी रुग्णालयात पाठविणे, बाहेरील औषध ठराविक मेडिकलमधून घेण्यास सांगणे आणि रुग्णवाहिका चालकाच्या मदतीने रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठवून कमिशन उकळणे, हे प्रकार सध्या जोरदार सुरू आहेत. ज्यांना खासगी रुग्णालयातील उपचार परवडत नाहीत असेच रुग्ण वायसीएममध्ये येतात. मात्र डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांकडून त्यांची लूट सुरू आहे. प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केले आहे.

जुन्नर आणि लोणावळ्यापासूनचे नागरिक स्वस्तात आणि खात्रीशीर उपचार मिळत असल्याने वायसीएम रुग्णालयात येतात महागड्या उपचारांमुळे खासगी रुग्णालय डावलून आलेल्यांना येथील डॉक्‍टर पुन्हा खासगी रुग्णालयाची वाट दाखवत आहेत. यातून डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांना दरमहा हजारो रुपयांचे कमिशन मिळत आहे. मात्र सामान्य नागरिकांना आयुष्याची पुंजी खर्च करावी लागत आहे. कधी  कधी तर कर्त्या पुरुषाला वाचविण्यासाठी शेती आणि घरही गहाण ठेवावे लागत आहे.

रुग्णांसाठी ‘वाघ’
वायसीएम रुग्णालयात आलेल्या गरीब रुग्णांना आपल्या खासगी रुग्णालयात चांगले उपचार होतील, असे सांगत वैद्यकीय सेवेत ‘वाघ’ हा डॉक्‍टर चांगलाच तरबेज शिकारी झाला आहे. या डॉक्‍टरच्या ओपीडीच्या टेबलच्या खणामध्ये खासगी रुग्णालयाच्या व्हिजिटिंग कार्डचा गठ्ठा ठेवला आहे. 

मेडिकलवाल्याचीही दुकानदारी
हाडांच्या उपचारासाठी वायसीएममध्ये आलेल्या जी. प्रदीप या रुग्णाला बाहेरील ठराविक मेडिकलमधून औषधे घ्या, असे सांगून हा डॉक्‍टर परस्पर निघून (गुप्ता) गेला. वायसीएम रुग्णालयात सर्व प्रकारची औषधे मिळत असताना, अशी सक्‍ती का, असा प्रश्‍न रुग्ण विचारत आहेत.

वायसीएममधील एक कर्मचारी रुग्णालयाच्या परिसरात अगदी सुटीच्या दिवशीही फिरत असतो. येथे तुम्हाला चांगले उपचार मिळणार नाहीत, अशी खतरनाक (खत्री) भीती तो रुग्णांना दाखवतो. रुग्णवाहिका चालकांना तो त्याने सांगितलेल्या रुग्णालयात नेण्यास सांगतो.

हजारो रुपयांचे कमिशन
वायसीएममध्ये आलेल्या रुग्णास तातडीने अतिदक्षता विभागाची गरज आहे. पण आमच्याकडे बेड उपलब्ध नसल्याने तुम्ही त्वरित ससून रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला सीएमओ (कॅज्युअल्टी मेडिकल ऑिफसर) नातेवाइकांना देतात. मात्र एवढ्या लांब जाऊनही तुम्हाला अतिदक्षता विभाग मिळण्याची खात्री नाही. तुम्हाला जर अतिदक्षता विभाग पाहिजे असल्यास तुमच्यासाठी मी प्रयत्न करतो, असे सांगत येथे आलेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठवून हजारो रुपयांचे कमिशन उकळले जाते.

रुग्णांना अशी वागणूक कोणी देत असेल आणि वायसीएम रुग्णालयास बदनाम करीत असतील, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
- डॉ. पवन साळवी, अतिरिक्त मुख्य वैद्यकिय अधिकारी, वायसीएम

Web Title: pimpri news YCM hospital