वायसीएम रुग्णालयाची सुरक्षा वाऱ्यावर

संदीप घिसे 
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

पिंपरी - रुग्णालयात घुसून टोळक्‍याची हाणामारी, डॉक्‍टरांवर होणारे हल्ले आणि मूल चोरी या प्रकरणांमुळे वायसीएमच्या सुरक्षेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णालयाच्या दुसऱ्या, तिसऱ्या, सहाव्या आणि सातव्या मजल्यावर अद्यापही सीसीटीव्ही कॅमरे लावलेले नाहीत. यामुळे वायसीएम रुग्णालय प्रशासन सुरक्षेबाबत अजिबात गंभीर नसल्याचे दिसून आले.

पिंपरी - रुग्णालयात घुसून टोळक्‍याची हाणामारी, डॉक्‍टरांवर होणारे हल्ले आणि मूल चोरी या प्रकरणांमुळे वायसीएमच्या सुरक्षेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णालयाच्या दुसऱ्या, तिसऱ्या, सहाव्या आणि सातव्या मजल्यावर अद्यापही सीसीटीव्ही कॅमरे लावलेले नाहीत. यामुळे वायसीएम रुग्णालय प्रशासन सुरक्षेबाबत अजिबात गंभीर नसल्याचे दिसून आले.

हाणामारीच्या घटनेतील आरोपी उपचार घेण्यासाठी वायसीएम रुग्णालयात आला. मात्र, प्रतिस्पर्धी टोळक्‍याने रुग्णालयात घुसून हाणामारी केली. रुग्णालयात डॉक्‍टरांवर हल्ल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. निर्मनुष्य असलेल्या दुसऱ्या मजल्यावर आणि अत्यंत गर्दी असलेल्या तिसऱ्या मजल्यावर सीसीटीव्ही  कॅमरे लावलेले नाहीत. ज्या मजल्यावर डॉक्‍टर राहतात, त्या मजल्यावरही कॅमरे नाहीत. यामुळे या मजल्यांवर काय चालले आहे, हे सुरक्षारक्षकांना माहितीच नसते.

प्रत्येक कर्मचाऱ्याने कामावर येताना ओळखपत्र लावणे बंधनकारक आहे. मात्र, काही कर्मचारी ओळखपत्र लावत नाहीत. याबाबत विचारणा एखाद्या नवीन सुरक्षारक्षकाने विचारणा केली असता ‘मला ओळखत नाही का?’ असा प्रतिप्रश्‍न करून दादागिरी करतात. अशाच प्रकारचे वर्तन नगरसेवकांचे कार्यकर्ते करतात.

महिला सुरक्षारक्षकांचीही कमी
वॉर्ड नंबर ६७, ७०, ४०३, ५०१, ५०३ आणि एनआयसीयू महिला व लहान मुलांच्या वॉर्डासाठी तीन पाळ्यांमध्ये २१ महिला सुरक्षारक्षकांची आवश्‍यकता आहे. मात्र, सध्या दहाच महिला सुरक्षारक्षक उपलब्ध आहेत; तर पुरुष सुरक्षारक्षकांची संख्या ६१ असून २७ खासगी सुरक्षारक्षक आहेत. यापैकी सहा सुरक्षारक्षक अपंग आहेत. मजबूत सुरक्षाव्यवस्था करण्यासाठी आणखी ४० सुरक्षारक्षकांची आवश्‍यकता आहे.

सुरक्षारक्षकांना इतर कामेही
तातडीक विभागात वॉर्डबॉय असल्याने प्रवेशद्वारावर असलेल्या सुरक्षारक्षकाला वाहनातून आलेल्या रुग्णाला स्ट्रेचरवरून न्यावे लागते. डॉक्‍टर, कर्मचारी यांना गणवेश नाही. माहिती कक्ष नसल्याने नवीन नागरिक सुरक्षारक्षकांनाच माहिती विचारतात. एखादा रुग्ण हिंसक झाला तर त्याला बांधण्याचे कामही सुरक्षारक्षकांना सांगतात.

...म्हणून रुग्ण पळून जातात
वायसीएम रुग्णालयातील रुग्णांना कोणत्याही प्रकारचा गणवेश नाही. यामुळे रुग्ण कोण आणि नातेवाईक कोण, हे सुरक्षारक्षकांना समजत नाही. यामुळे औषध आणायला जातो, असे सांगून अनेकदा रुग्ण बिल न देता पळून जातात. पोलिसांनीही सुरक्षा काढून घेतली. राज्यात ठिकठिकाणी डॉक्‍टरांवर हल्ले झाल्याची घटना लक्षात घेता वायसीएम रुग्णालयात चार पोलिसांची नियुक्‍त केली होती. यामुळे समाजकंटकांना वर्दीचा धाक होता. मात्र, गणेशोत्सवाच्या अगोदर ही सुरक्षा काढून घेतली आहे.

आम्ही माणूस नाही का?
सध्या स्वाइन फ्लूची साथ जोरात आहे. रुग्णालयातील कर्मचारी व डॉक्‍टरांना स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. मात्र, दिवस-रात्र रुग्णालयात असणाऱ्या सुरक्षारक्षकांना ही लस देण्यास प्रशासनाने नकार दिला आहे. यामुळे सुरक्षारक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. माणूस म्हणून आमचाही विचार व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली आहे.

Web Title: pimpri news YCM hospital Security doctor