शस्त्रक्रियेसाठी तीन महिने प्रतीक्षा

संदीप घिसे 
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

पिंपरी - मणका आणि मेंदूच्या ऑपरेशनसाठी वायसीएम रुग्णालयात तीन महिन्यांची भलीमोठी प्रतीक्षा यादी आहे. मात्र, शहरातील मान्यवरांच्या दबावामुळे वशिल्यांच्या रुग्णांना प्राधान्य दिले जात असल्याने सर्वसामान्य रुग्णांवर अन्याय होत असल्याची भावना रुग्णांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्‍त केली. 

पिंपरी - मणका आणि मेंदूच्या ऑपरेशनसाठी वायसीएम रुग्णालयात तीन महिन्यांची भलीमोठी प्रतीक्षा यादी आहे. मात्र, शहरातील मान्यवरांच्या दबावामुळे वशिल्यांच्या रुग्णांना प्राधान्य दिले जात असल्याने सर्वसामान्य रुग्णांवर अन्याय होत असल्याची भावना रुग्णांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्‍त केली. 

अपघातामध्ये किंवा बदलत्या जीवनशैलीत अनेकांना मेंदू आणि मणक्‍याचे आजार होतात. यापैकी काही आजार हे औषधांनी बरे होतात, तर काही रुग्णांवर शस्त्रक्रिया करावी लागते. या विभागाकरिता केवळ एकच डॉक्‍टर असून, एका शस्त्रक्रियेसाठी पाच-सहा तास लागतात. त्यांना आठवड्यातून दोन दिवस शस्त्रक्रियेसाठी देण्यात आले असून, प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे दोन रुग्णांवर शस्त्रक्रिया होते. शस्त्रक्रियेच्या दिवशी एखाद्या रुग्णाचा मधुमेह किंवा रक्‍तदाब वाढला तर शस्त्रक्रिया रद्दही करावी लागते. या विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता तीन महिन्यांनंतर शस्त्रक्रियेसाठी तारीख दिली जाते. त्यातही एखाद्या रुग्णाने मान्यवरांची ओळख आणली तर त्याला प्रथम प्राधान्य दिले जाते. यामुळे सर्वसामान्य रुग्णांवर अन्याय होतो, अशी भावना रुग्ण मीना लोणके यांनी व्यक्‍त केली. चंद्रभागा आवाडे या दोन महिन्यांपासून ॲडमिट असून, शस्त्रक्रियेकरिता कधी बोलावणे येते, याची वाट पाहत आहेत.

अनेक विभाग डॉक्‍टरांशिवाय
मेंदू आणि मणक्‍याचे विकार विभागाचे डॉ. किशोर गुजर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर या विभागाकरिता डॉक्‍टरच उपलब्ध नाहीत. या विभागात येणाऱ्या रुग्णांना मेडिसीन विभागाकडे पाठविले जात आहे. याशिवाय अन्को, युरो, किडनी, त्वचा आणि चेस्ट या विभागाचे वरिष्ठ डॉक्‍टर सोडून गेले आहेत. यामुळे हे विभाग जवळपास बंदच पडले आहेत.

...अन्‌ दोन खिडक्‍या सुरू झाल्या
बाह्यरुग्ण विभागाची वेळ संपल्यावर केसपेपर काढण्यासाठी फक्‍त एकच खिडकी होती. यामुळे अपघात किंवा अतिगंभीर रुग्णांच्या नातेवाइकांना केसपेपर काढण्यासाठी तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत होते. याबाबत रविवारी (ता. १०) ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले. त्याची दखल वायसीएम रुग्णालय प्रशासनाने घेतली. सोमवारपासून (ता. ११) तातडीच्या रुग्णांकरिता आणखी एक खिडकी सुरू करण्यात आल्याची माहिती डॉ. यशवंत इंगळे यांनी दिली. याशिवाय कर्मचारी आणि डॉक्‍टरांना पूर्वीपासूनच गणवेश आणि ओळखपत्र अनिवार्य असून, त्याचीही कडक अंमलबजावणी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: pimpri news YCM hospital Surgery