पिंपरी पोलिस बक्कलविनाच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

...ही खरी ओळख
पोलिस दलात हवालदार, नाईक, शिपाई या पदाच्या कर्मचाऱ्यांना बक्कल क्रमांक दिले जातात. हे नंबर संबंधित आयुक्तालय, जिल्हा मुख्यालय यांच्या अंतर्गत असतात. हा क्रमांक संबंधित पोलिस कर्मचाऱ्याची ओळख मानली जाते.

पिंपरी - पोलिस कर्मचाऱ्याची महत्त्वाची ओळख ही बक्कल क्रमांकावर असते. मात्र, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यान्वित होऊन सव्वा वर्षे उलटले. येथे नेमणूक झालेल्या पोलिसांना अद्यापही बक्कल क्रमांक देण्यात आलेले नाहीत. 

पिंपरी-चिंचवड शहरासाठी १५ ऑगस्ट २०१८ पासून स्वतंत्र पोलिस आयुक्तालय सुरू झाले. यामध्ये पुणे शहरासह ग्रामीण पोलिस दलातील कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला. यासह नंदुरबार, गडचिरोली, लातूर, जळगाव, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, ठाणे, मुंबई या पोलिस दलातील कर्मचारीही नवीन आयुक्तालयात दाखल झाले. मात्र, कर्मचाऱ्यांना अद्यापही क्रमांक देण्यात आलेला नाही. हे कर्मचारी पूर्वी ज्या ठिकाणी कार्यरत होते. आताही त्यांच्याकडे त्याठिकाणचेच बक्कल क्रमांक आहेत. त्यामुळे सध्या आयुक्तालयात एकाच क्रमांकाचे एकापेक्षा अधिक कर्मचारी असल्याचे पाहायला मिळते. अनेकदा बंदोबस्तासाठी अथवा इतर कार्यालयीन कामकाजात त्याचा उपयोग केला जातो. मात्र, तो नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही गफलत होत आहे.  

पोलिसांकडे ओळखपत्रदेखील नाही. हे कर्मचारी पूर्वी ज्या ठिकाणी कार्यरत होते, त्या ठिकाणी त्यांची ओळखपत्रे जमा करण्यात आली आहेत. त्यामुळे सध्याचे या आयुक्तालयातील कर्मचारी ओळखपत्राविनाच वावरत आहेत. तपास पथकात अथवा गुन्हे शाखेत कार्यरत असणारे कर्मचारी पोलिसाच्या गणवेशात न राहता साध्या गणवेशात असतात. मात्र, त्यांच्याकडे ओळखपत्रच नसल्याने संबंधित व्यक्ती पोलिसच आहे, याबाबतची निश्‍चितता काय, असाही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri police without belt bakkal