पिंपरीत खड्डे ठरताहेत जीवघेणे 

पिंपरीत खड्डे ठरताहेत जीवघेणे 

पिंपरी - शहरातील खड्ड्यांमधून प्रवास केल्यामुळे नागरिकांना शारीरिक समस्यांबरोबरच वाहनांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मोठा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. 

सांडपाणी वाहिनी टाकणे, चोवीस तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिन्या टाकणे यांसारख्या कामांसाठी शहराच्या अनेक भागात महापालिकेच्या वतीने खोदकाम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अशा रस्त्यांवरून प्रवास केल्याचा सर्वाधिक त्रास दुचाकीस्वारांना होत आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नातही अपघात होऊन जखमी होणे, पाठदुखीचा त्रास होणे यांसारख्या समस्यांना त्यांना सामोरे लागत आहे. अशा रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे निरीक्षण डॉक्‍टरांनी नोंदविले. यासंदर्भात वायसीएम रुग्णालयातील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अमित स्वामी म्हणाले, ""खड्ड्यातून वेगाने प्रवास केल्यास पाठीच्या मणक्‍यांमधील चकत्यांना हिसका बसून पाठदुखीचा त्रास सुरू होऊ शकतो. असा त्रास असणाऱ्यांनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. हाडांच्या त्रासापासून वाचण्यासाठी आहारात दुधाचा नियमित समावेश करावा. त्यातून हाडांच्या बळकटीसाठी आवश्‍यक कॅल्शिअम मिळेल. त्याचप्रमाणे दुधातून मिळालेले कॅल्शिअम आतड्यांत मुरण्यासासाठी आठवड्यातून किमान तीन दिवस मोड आलेली कडधान्ये खावीत. दूध आणि सामोसे, वडापाव अशा जंकफूडचे सेवन केल्यास घेतलेल्या दुधाचा शरीराला नीट उपयोग होणार नाही. त्याचप्रमाणे आहारात सोयाबीन, राजगिरा, शेवग्याच्या शेंगा, भेंडी, साय काढलेले म्हशीचे दूध घ्यावे. फळांमध्ये सीताफळ, रामफळ, सफरचंद यांचा आहारात समावेश करावा. तसेच पालेभाज्यांचे सेवन करणे फायदेशीर ठरते. पाठदुखीचा त्रास वाढून पायांमध्ये मुंग्या येऊ लागल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा. असा त्रास होत असल्यास रुग्णावर शस्त्रक्रिया करावी लागू शकते.'' 

यासंदर्भात महापालिकेच्या एका कार्यकारी अभियंत्याने सांगितले, ""शहरात विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने खड्डे पडले आहेत. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी निवडणुकीपूर्वी शहरातील खड्डे बुजविण्याचे आदेश कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत.'' 

खड्ड्यांमुळे मोटारींचे सस्पेंशन कमी होते. दुचाकींचे पुढील शॉकऑब्झर्व्हर, ऑइल सील नादुरुस्त होतात. चाकांच्या रीम वाकड्या होतात. तसेच क्‍लचची केबल लवकर खराब होते. वरचेवर ब्रेकचा वापर करावा लागल्याने ब्रेक-शू निकामी होतात. 
- दीपक काची, वाहन दुरुस्ती मेकॅनिक, पिंपरी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com