आठ महिन्यांत १५ बालकांचा मृत्यू

आठ महिन्यांत १५ बालकांचा मृत्यू

पिंपरी - औंध येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या आठ महिन्यांत (एप्रिल ते सप्टेंबर) १५ अर्भकांचा मृत्यू झाला. मात्र, राज्याच्या तुलनेत हा आकडा सर्वांत कमी असल्याचा दावा रुग्णालयाने केला आहे. रुग्णालयाकडे सध्या १२ वॉर्मर असून, त्यांची संख्या २४ वर नेण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. के. शेळके यांनी सांगितले. त्यासाठी रुग्णालयातील ‘सिक न्यूबॉर्न केअर युनिट’चे (एसएनसीयू) नुकतेच नूतनीकरणही करण्यात आले असल्याचेही ते म्हणाले.

बारा बालकांची क्षमता असलेल्या या एसएनसीयू विभागात जन्मापासून २८ दिवसांच्या बालकावर उपचार केले जातात. जे बाळ जन्मल्यानंतर रडत नाही, दोन किलोपेक्षा कमी वजनाच्या, व्यंग असलेल्या, कावीळ, सेल्फिसेमिया, हायपोथर्मिया, जंतुसंसर्ग अशा विविध वैद्यकीय समस्या असलेल्या बालकांना या विभागात दाखल केले जाते. या उपचारांसाठी लागणारे वॉर्मर, ऑक्‍सिजन, सिरींज पंप अशी अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे या विभागात आहेत. सबंध जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांत जन्मलेली व उपचाराची आवश्‍यकता असलेली बालके येथे दाखल होतात, त्यामुळे हा विभाग संदर्भ सेवा केंद्र म्हणून ओळखला जातो. सध्या येथे १२ वॉर्मर असले, तरी अत्यावश्‍यकता लक्षात घेऊन एकाच वेळी २० ते २२ बालके दाखल करून घेतली जातात. 

मात्र, येथील प्रशिक्षित व अनुभवी डॉक्‍टर व परिचारिका बालकांची योग्यरीत्या काळजी घेत असल्याने येथील अर्भक मृत्यूचे प्रमाण तुलनेने अत्यल्प आहे. एन्क्‍यूबेटरअभावी बालकाचा मृत्यू झाल्याची घटना रुग्णालयात घडली नसल्याचा दावा रुग्णालयाने केला. वॉर्मरबरोबरच एसएनसीयूमध्ये विविध प्रकारच्या सोयीसुविधा असून, बालकांची केएमसी, आरओपी, ऑप्चूरेटरच्या माध्यमातून काळजी घेतली जात असल्याची माहिती वर्षा कुलकर्णी यांनी दिली.

ऑगस्टमध्ये एकही मृत्यू नाही
ऑगस्ट महिन्यामध्ये एकही अर्भक मृत्यू झाला नाही, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. के. शेळके यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘ऑगस्टमध्ये रुग्णालयात एकूण ७५ अर्भके दाखल झाली. ही सर्व बालके बरी होऊन घरी परतली. त्यातील एक किलो वजनाच्या बालकाचेही प्राण वाचविण्यात आम्हाला यश आले.’’

एप्रिल ते ऑगस्टअखेर एसएनसीयूत दाखल झालेली बालके    ३१९
मृत्यू    १५ 
मृत्युदर    ४.७ टक्के
एसएनसीयूतील वैद्यकीय तज्ज्ञ    चार
परिचारिका    १२
रुग्णालयात एप्रिल ते ऑगस्टदरम्यान झालेल्या प्रसूती    ६२०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com