सतरा नंबर फॉर्मचा गैरवापर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

पिंपरी - दहावीचा निकाल शंभर टक्के लागावा, यासाठी अध्ययनात कमजोर असलेल्या विद्यार्थ्यांकडून १७ नंबरचा फॉर्म भरण्यासाठी पालकांवर सक्ती केली जात आहे. मोरवाडीतील एका नामांकित इंग्रजी शाळेत हा प्रकार उघडकीस आला. या निमित्ताने शंभर टक्के निकाल लावणाऱ्या शाळांमधील १७ नंबरी ‘शाळा’ विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र या विषयाकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

पिंपरी - दहावीचा निकाल शंभर टक्के लागावा, यासाठी अध्ययनात कमजोर असलेल्या विद्यार्थ्यांकडून १७ नंबरचा फॉर्म भरण्यासाठी पालकांवर सक्ती केली जात आहे. मोरवाडीतील एका नामांकित इंग्रजी शाळेत हा प्रकार उघडकीस आला. या निमित्ताने शंभर टक्के निकाल लावणाऱ्या शाळांमधील १७ नंबरी ‘शाळा’ विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र या विषयाकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

चिंचवडगावातील एक विद्यार्थिनी मोरवाडीतील एका नामांकित इंग्रजी स्टेट बोर्डाच्या शाळेत दहावीत शिकत आहे. ती अभ्यासात कमजोर असल्याने ‘या’शाळेने सलग दोन वर्षे तिला दहावीच्या वर्गात बसून ठेवले. यावर्षीदेखील तू अभ्यासात ‘वीक’ आहेस, असे सांगून तिला दहावीचा फॉर्म भरू देत नव्हते.

कारण ही विद्यार्थिनी नापास झाल्यावर शाळेचे ‘मानमरातब’ खराब होईल आणि शाळेचा १०० टक्के निकाल कसा लागणार? संबंधित पालकांनी सामाजिक कार्यकर्ते विजय वाबळे यांच्या कानावर हा प्रकार घातला. वाबळे यांनी ‘या’ शाळेला जाब विचारून उपोषणाचा इशारा दिल्यावर त्या विद्यार्थिनीने फॉर्म भरला. परंतु, या प्रकारामुळे त्या मुलीचे दोन वर्षे वाया गेली. या मुलीचे प्रातिनिधिक उदाहरण असले, तरी सध्या शाळांमध्ये १०० टक्के निकालाची क्रेझ वाढल्याने अनेक मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जात आहे. 

विद्यार्थ्यांचे असेही नुकसान
नववीचा निकाल कमी करून दहावीचा निकाल जवळपास शंभर टक्के लावायचा आणि संस्थाचालक व पालकांकडून शाबासकी मिळवायची असे प्रकार अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापक व शिक्षक करत आहेत. अनेक शाळांमध्ये आठवी आणि नववीच्या दोन तुकड्या आहेत. परंतु दहावीची मात्र एकच तुकडी आहे. अनेक पालकांना विक मुलांचे दाखले काढण्यासाठी सूचना करतात.

फॉर्मचा असाही गैरवापर
एकीकडे १७ नंबर फॉर्मचा उपयोग शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात सामावून घेण्यासाठी होत असताना, मात्र सध्या अनेक शाळा शंभर टक्के निकालाची भूक भागविण्यासाठी या फॉर्मचा गैरवापर करत आहेत. त्यामुळे अनेक शाळा विद्यार्थ्यांना सक्तीने १७ नंबरचा फॉर्म भरण्यास भाग पाडत आहेत. गेल्या वर्षी २ हजार मुलांनी १७ नंबरचा फॉर्म भरला होता.

आठवीपर्यंत परीक्षा नाही 
शिक्षण हक्क कायद्यानुसार ‘आठवीपर्यंत सारे पास’मुळे वरच्या वर्गात ढकलत आलेले विद्यार्थी नववीत काठावर अडकतात. या विद्यार्थ्यांमुळे शाळेच्या दहावीच्या निकालावर परिणाम होऊ नये, म्हणून अशा विद्यार्थ्यांना नववीतच नापास केले जाते. या सर्व प्रकाराची माहिती शिक्षण विभागाला असतानाही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. 

पाल्य अभ्यासात हुशार नसणे हा गुन्हा आहे का? प्रत्येक विद्यार्थ्याचा बुद्ध्यांक सारखा नसतो. त्यानुसार माझ्या एका मित्राच्या मुलीला कमी गुण मिळाल्याने शाळेकडून १७ नंबरचा फार्म भरण्याची सक्ती केली. मात्र मी उपोषणाचा इशारा दिल्याने शाळा नरमली.
- विजय वाबळे, सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक क्षेत्र

Web Title: pimpri pune news 17 no. form missuse