दहा वर्षांपासून ८८ व्हिसेरा पडून

संदीप घिसे
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

व्हिसेरा काढल्यानंतर तो त्वरित न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविल्यास अचूक अहवाल येतो. मात्र, उशिराने पाठविलेल्या किंवा खराब झालेल्या व्हिसेराचा अचूक अहवाल देता येत नाही.
- डॉ. श्रीकांत शिंगे, न्यायवैद्यक तज्ज्ञ

पिंपरी - एखाद्या रुग्णाच्या मृत्यूचे नेमके कारण समजले नाही किंवा त्या व्यक्‍तीने कोणते विषारी द्रव्य प्राशन केले की नाही, याबाबत निश्‍चित माहिती मिळविण्यासाठी अनेकदा शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्‍टरांकडून व्हिसेरा राखून ठेवला जातो. मात्र, हा व्हिसेरा वेळेत न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविला नाही, तर तो पूर्णपणे खराब होऊन जातो.

वायसीएम रुग्णालयातही पुणे ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २००९ पासून ते आतापर्यंत तब्बल ८८ व्हिसेरा पडून असल्याची बाब समोर आली आहे.

कोणत्या ठाण्याचा व्हिसेरा
पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील बारामती, आळेफाटा, घोडेगाव, देहूरोड, कामशेत, खंडाळा, पौड, चाकण, खेड, तळेगाव दाभाडे, जुन्नर, मंचर, शिरूर, लोणावळा, आळंदी, नारायणगाव, शिक्रापूर आणि ओतूर या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनेक व्हिसेरा मोठ्या प्रमाणात वायसीएममध्ये पडून आहेत. पुणे जिल्ह्याबाहेरील पारनेर, घारगाव (अहमदनगर) नेरूळ (नवी मुंबई),  उस्मानाबाद, साक्री (धुळे), सातारा, वेळेपूर (सोलापूर), वाशीम या ठाण्यातीलही अनेक व्हिसेरा कित्येक वर्षांपासून पडून आहेत. तर राज्याबाहेरील तिरुपती बालाजी येथील पोलिस ठाण्याचाही एक व्हिसेरा पडून आहे.

व्हिसेरा म्हणजे काय?
मयत व्यक्‍तीचे जठर, फुप्फुस, आतडे, इत्यादीचा भाग बाटलीत काढून रासायनिक तपासणीकरिता पुण्याच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे सीलबंद करून पाठविले जातात. हा अहवाल आल्यानंतरच अंतिम मत दिले जाते.

कोणत्या प्रकरणात व्हिसेरा महत्त्वाचा ?
मयत व्यक्‍तीने कोणत्या गोळ्या, मद्य किंवा विषारी औषध घेतले आहे का, बाळंतपणामध्ये माता मृत्यू प्रकरण, एखाद्याची मादक द्रव्य देऊन हत्या केली आहे का, हे जाणून घेण्यासाठी व्हिसेरा काढला जातो. इंडियन ॲव्हिडंन्स ॲक्‍टनुसार व्हिसेराचा अहवाल पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. एखादी व्यक्‍ती शुद्धीत नसल्याने त्यास जिवे मारण्याच्या वेळी त्याने प्रतिकार केला होता की नाही. हुंडाबळीत सुरवातीला पदार्थातून औषध देऊन बेशुद्ध केले जाते आणि त्यानंतर तिला जाळण्यात येते. अशावेळी व्हिसेरा अहवालातून सत्य माहिती समोर येते.

तो डॉक्‍टरांचा केवळ अंदाज
ज्या प्रकरणात व्हिसेरा खराब होतो किंवा गहाळ होतो. अशावेळी पोलिसांचा तपास आणि शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालाच्या आधारे अंतिम मृत्यूबाबत मत दिले जाते. परंतु ते अचूक असेलच असे नाही.

तीन महिन्यांची मुदत
व्हिसेरा काढल्यानंतर लगेचच तो सडण्याची प्रक्रिया सुरू होते. तो सडू नये म्हणून त्यामध्ये रसायन टाकले जाते. त्यामुळे जास्तीत जास्त तीन महिने तो टिकू शकतो. मात्र, त्यानंतर केलेल्या व्हिसेराच्या तपासणीत काहीच निष्पन्न होत नाही. यामुळे मृत व्यक्‍तीला दगाफटका झाला असल्यास त्याला न्याय मिळणे मुश्‍किल असते. व्हिसेरा वेळेत तपासणीकरिता न देणे म्हणजे पुरावा नष्ट करण्यासारखेच आहे.

एका खोलीत व्हिसेराच्या बाटल्या
वायसीएममधील एका खोलीत व्हिसेरा असलेल्या बाटल्या ठेवल्या जातात. सुमारे १५० बाटल्या ठेवण्याची क्षमता खोलीची आहे. त्या संबंधित पोलिस ठाण्यांनी घेऊन जाणे अपेक्षित असते. नंतर त्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी दिल्या जाण्याची गरज असते. नेमके हेच होत नसल्याचे उघड झाल्याने व्हिसेरा खोलीमध्ये पडून आहेत.

रायगड पोलिस ठाण्यातील पॅटर्न राबविणार - सुवेझ हक
अनेक पोलिस ठाण्यांकडून वेळेवर व्हिसेरा नेला जात नाही. यामुळे मी रायगडमध्ये असताना दर १५ दिवसांतून एक विशेष मोहिमेद्वारे व्हिसेरा गोळा करून तो न्यायवैद्यक विभागाकडे पाठविला जात असे. अशीच मोहीम भविष्यात हाती घेण्यात येईल. कालबाह्य व्हिसेरा नष्ट करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या जातील, असे पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी सांगितले.

Web Title: pimpri pune news 88 viscera in ycm hospital