आधारविना निराधार

आधारविना निराधार

पिंपरी - केंद्र सरकारने बॅंका, पॅन कार्ड, एलआयसी, मोबाईल कंपन्या आदी ठिकाणी आधार कार्ड ‘लिंक’ करणे सक्तीचे केले आहे. मात्र शहराची लोकसंख्या बावीस लाखांवर असताना आधार केंद्रे केवळ ३१ आहेत. त्यांची अपुरी संख्या आणि कुचकामी यंत्रणा यामुळे शहरातील नागरिक, महिला आणि सेवानिवृत्त नागरिक हवालदिल झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात गेल्या वर्षी १५० आधार मशिन उपलब्ध होत्या. त्या अपडेट न केल्याने निम्म्याहून अधिक बंद पडल्या आहेत. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ज्येष्ठांची संख्या सुमारे साडेतीन लाख आहे. प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी आधार कार्ड ‘लिंक’ करणे केंद्र सरकारने बंधनकारक केले असले, तरी तुटपुंज्या यंत्रांमुळे आधार केंद्रावर गर्दी पाहायला मिळते. मात्र प्रशासनाने ९१ टक्के आधार कार्डाचे काम पूर्ण केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा गोंधळ होत आहे.

महापालिका भवनात...
‘एनएसडीएल’ संस्थेद्वारे आधार केंद्र सुरू आहे. सकाळी सातपासून नागरिकांची केंद्रावर गर्दी होते. दुरुस्ती व ‘लिंक’साठी दररोज केवळ ४० जणांना कूपन देण्यात येते. त्यातील क्रमांकानुसार प्रत्येक जण तासन्‌तास रांगेत थांबतो. यामुळे अनेकांना रोजंदारी बुडवावी लागत आहे. 

‘सकाळ’ची पाहणी
मोबाईल कंपनी असो की बॅंकांशी आधार लिंक करणे अथवा पुनर्पडताळणी (री-व्हेरिफेकेशन) यासाठी आधार कार्डची झेरॉक्‍स आणि ज्येष्ठांच्या बोटांचे ठसे घेतले जातात. मात्र काहींचे ठसे जुळत नाहीत. अशा वेळी महापालिका इमारतीतील आधार केंद्रात जाऊन माहिती द्या आणि आधार कार्डबाबतची पुढील कार्यवाही करा, असे अनेकांना सांगण्यात येते. बॅंकांमध्ये गेलेल्या निवृत्ती वेतनधारकांनाही (पेन्शनर) असा अनुभव येतो. त्यांच्या बोटांचे ठसे न जुळल्यास आकुर्डी अथवा पुण्यातील पीएफ कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. यामुळे पेन्शनर वैतागले आहेत. मोबाईल सीम कार्डसाठी आधार ‘लिंक’ करतानाही हाच अनुभव अनेकांना आला आहे.

ठसे उमटत नसलेल्यांना प्राधान्य
वयोवृद्ध नागरिक, महिला आणि बालकांच्या हातांचे ठसे व्यवस्थित येत नसल्याच्या तक्रारी आहेत. अशा व्यक्तींच्या स्लिपा जमा करून युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडियाकडे (यूआयडीएआय) पाठविण्यात येणार आहेत. त्यांचे आधार कार्ड विशेष प्राधान्याने काढून दिली जातील.

आधार कार्ड दुरुस्तीसाठी
जुन्या आधार कार्डमध्ये बदल करण्यासाठी आवश्‍यक मूळ कागदपत्रांची सत्यप्रत. (उदा. नावात बदल असल्यास पॅन कार्ड, जन्म तारखेत बदल करायचा असल्यास शाळेचा दाखल, जन्म दाखला, तत्सम कागदपत्रे) 

शासकीय शुल्क २५ रुपये 
आधार कार्ड ‘लिंक’साठी सरकार कोणतेही शुल्क आकारत नाही. मात्र जुन्या आधार कार्डातील स्पेलिंग मिस्टेक, वयात बदल, पत्ता बदल यासाठी फक्त २५ रुपये शासकीय शुल्क आकारले जाते. आधार नोंदणीचा अर्जही मोफत आहे. नवीन आधार काढण्यासाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही.

विशेष मुलाला त्रास
डोळ्यांच्या समस्येमुळे सांगवीतील श्रीपाद राजेंद्र निगडे या मुलाची आधार नोंदणी सुरवातीला योग्य झाली नाही. प्रशिक्षित केंद्रचालक नसल्याने दोन वेळा नावात दुरुस्ती करावी लागली. मात्र योग्य दुरुस्ती न झाल्याने तिसऱ्यांदा दुरुस्ती अर्ज घेऊन आला होता.

सेवानिवृत्तांचे हाल
सेवानिवृत्ती वेतनधारकांनाही (पेन्शनर) आधार लिंक सक्तीचे आहे. आधार लिंकशिवाय पेन्शन मिळणार नाही. मात्र काही वर्षांपूर्वी दिलेले अंगठ्यांचे ठसे वयोमानामुळे आता जुळत नाहीत. त्यामुळे अनेक सेवानिवृत्तांना बॅंकेत हेलपाटे मारावे लागतात. त्यातही विकलांग अथवा इतरांच्या आधाराशिवाय फिरू न शकणाऱ्यांनी आधार लिंक कसे करायचे, हा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे.  - नारायण सोनार, सेवानिवृत्त

बॅंकांनी सहकार्य करावे
अनेक ज्येष्ठ नागरिक तासन्‌तास बॅंकांच्या रांगेत थांबलेले असतात. बहुतांश बॅंकांमध्ये योग्य मार्गदर्शन मिळत नाही. ज्येष्ठांना केवळ ‘डेडलाइन’ची भीती घातली जाते. कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी परत पाठविले जाते. असे प्रकार थांबविण्यासाठी बॅंकेबाहेर माहिती फलक लावावेत. ज्येष्ठांसाठी ‘एक खिडकी’ योजना राबवून त्याद्वारे केवळ ज्येष्ठांना आधार लिंक विषयी स्पष्ट मार्गदर्शन केले पाहिजे. 
- सूर्यकांत मूथियान, ज्येष्ठ नागरिक

लोकसंख्या 22 लाखांवर
59 आधार नोंदणी प्रस्तावित केंद्रे
ज्येष्ठ 3.50 लाखांवर
31 कार्यान्वित केंद्रे

येथे मिळते ‘आधार’ 
महापालिका क्षेत्रीय कार्यालय
    ‘क’, नेहरूनगर, पिंपरी    ९९२२५०१९४२
    ‘इ’, पांजरपोळ, भोसरी    ९५५२५७८७०१
    ‘ग’, करसंकलन कार्यालय इमारत, थेरगाव    ९८२२०१२६८७
    ‘ह’, महिला आयटीआय, कासारवाडी    ७८८७८९३०४५

इतर सरकारी संस्था (एनएसडीएल)
    महापालिका मुख्य इमारत, पिंपरी    ८८५५८८३०८७
    टिन दापोडी गगनगिरी संकुल, दापोडी    ८००७२७४८६४

नागरी सुविधा केंद्र (सीएफसी)
    कुणाल पार्क, केशवनगर, चिंचवड    ९९२२४३०४४५
    जिजामाता माँसाहेब सेवा संघ, चिंचवड-आकुर्डी    ९४२२०१४५०२
    हॉटेल विश्‍वविलास बिल्डिंग लांडेवाडी, भोसरी    ९८५०३९२९१९
    एच विंग, जयगणेश साम्राज्य, इंद्रायणीनगर    ९७६४२५७७८५
    संभाजीराजे चौक, दिघी    ९६५७७५७५००, ९९७०५६८९८०
    तळवडे टॉवरलाइन जवळ, त्रिवेणीनगर    ९८८१३७१२४४
    जीएमसी राज पॅलेस, साने चौक, मोरेवस्ती    ९८९०३८०९९३
    एकता चौक, रुपीनगर, तळवडे    ७७७४०३१५९०
    काटे पेट्रोलपंपाजवळ, पिंपळे गुरव रस्ता, दापोडी    ९८२२०४१२८
    राहुल जाधव संपर्क कार्यालयाजवळ, जाधववाडी    ९०२८२८८९६५
    मोरेवस्ती, चिखली    ९८८१५८२४५३ 

महा-ई-सेवा केंद्र
    गंगानगर चौक, जुनी सांगवी    ७७०९७९७९००
    इंगवले पार्क विठ्ठल मंदिराशेजारी, पिंपळे निलख    ९०२१५३६०४१
    महा-ई-सेवा केंद्र, पुणे-मुंबई महामार्ग, कासारवाडी    
    नर्सेस ब्युरो, फुगेवाडी    ८६०५१४३४४७ 
    रामनगर, पिंपळे गुरव    ७०५८९२४९७५
    जय गणेश व्हिजन थिएटर, आकुर्डी    ९०९६८८६७०६
    चिखली रस्ता, आकुर्डी    ९६६१६१२२४३

आधारसाठी कागदपत्रे
    पॅन कार्ड
    निवडणूक ओळखपत्र
    रेशन कार्ड
    पासपोर्ट
    ड्रायव्हिंग लायसन्स
    तीन महिन्यांचे वीज, पाणी किंवा दूरध्वनी बिल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com